भूक

भावना मुळे

दारिद्र्यरूपी भावाला सतत भेडसावणारी बहीण‌ म्हणजे भूक. पोटात भुकेची आग पडली असताना तो तडफडत पाहत राहतो. डोळ्यांत अश्रू येऊन सुकून जातात. दारिद्र्य लाचार होते. विवश होते. जीवघेणी भूक त्यात शांत बसू देत नाही. यातूनच जन्म घेते चोरी. काही जण भीक मागू लागतात. अर्थात सर्वच जण हा मार्ग स्वखुशीने अवलंबत नाहीत. कष्टाचा मार्गही स्वीकारला जातो; पण जेव्हा खाणारी तोंडे भरपूर अन् कमावणारा एकटा अशी गत‌ होते तेव्हा भूक थैमान घालते; आणि घरातले कच्चेबच्चे आशाळभूतपणे दुसऱ्याच्या घरातून शिळंपाकं‌ मिळेल का ते शोधू लागतात. स्वप्नांचे पंख त्यांनाही असतात; पण त्यात बळ नसते. शाळा त्यांनाही खुणावते; पण दप्तर हरवलेलं असतं. सुंदर कपडे घालून मिरवावे असं त्यांनाही वाटतं; पण इथे आभाळच फाटलेलं‌ असतं. खाद्यपदार्थांचा वास‌ त्यांच्याही नाकात शिरतो; पण जणू ते‌ आपल्यासाठी बनलेलेच नाही असं त्यांचं कोवळं‌ पण दुखावलेलं‌ मन बजावत राहतं.त्यांच्याकडे पाहिले की उरलेले अन्न टाकून देताना अपराध्यासारखे वाटत राहते.भीक म्हणून देताना ते कडक तुकडे चविष्टपणे आपल्या समोरच चघळायला लागले की डोळ्यात नकळत पाणी येतं.एखादा चांगला पदार्थ त्यांना द्यावा,असं वाटू लागतं. मग मुलांचा खाऊ किंवा कपडा दिला की ते उसनं दातृत्व ओझं वाटू लागतं.    

शाळेतला रमेश असाच दारिद्र्य रेषेखालील, रोज शाळेत येणारा. खिचडीपण जास्त घेऊन लपविणारा. बाईंच्या डब्यातून काही मिळते का हे बघणारा… केविलवाणा रमेश जेव्हा सकाळी भीक मागायला जातो हे ऐकले तेव्हा फार वाईट वाटले. रमेश शाळा उघडल्यापासून तर ती बंद करेपर्यंत उपस्थित असे. शिक्षकांचे काम करायला अगोदर पुढे असणारा रमेश सदैव हसतमुख राहण्याचा प्रयत्न करी. अठराविश्वे दारिद्र्य असतानाही तो कधीही कोणाची वस्तू घेत नसे. माझ्या मुलांचे नवेच पण आखूड झालेले कपडे दिले तेव्हा तो ते कपडे घेऊन पळतच घरी गेला. छोटया भावाला कोणते कपडे आवडतात, होतात हे त्याने आधी पाहिले. मग स्वत:साठी ड्रेस बाजूला ठेवून दिला. हट्ट करून कपडे मागण्याच्या वयात मोठेपणाचे ओझे खांद्यावर घेऊन तो बालपण हरवून बसला होता. त्याचे बाल्य  करपून गेले होते. काही कळ्या फुलण्याआधीच कोमेजून जातात; तसेच त्याचे झाले होते. शाळेतील खिचडी वाटणाऱ्या बाईंचे बोलणे ऐकून लाचार हसत घेऊन जायचा. आईवडील  शेतात जायचे,पण अशा संसारात व्यसनाचे वरदान असतेच. मग रमेशला त्यांनी अकाली प्रौढ बनविले, यात नवल ते काय?कुठलेही लग्न असो रमेश तेथे हजेरी लावत असे; पण जेव्हा परीक्षेचा पेपर हातात घेतलेला रमेश सरांची पाठ फिरताच गायब झाला, तेव्हा त्याला शोधणाऱ्या मुलांनी लग्नात जेवायला पळाला असेल असे म्हटले तेव्हा वाटलं हद्द झाली; पण त्याच्या दृष्टीने ती पर्वणी होती. कदाचित ही संधी चुकवली तर पुन्हा कधी सुग्रास भोजन मिळते ही काळजी त्या लहानग्या जिवाला लागून‌ राहिलेली असेल.         

powermath-advt-google

हळूहळू त्याच्याविषयी एकेक गोष्टी कळू लागल्या. या रमेशची सकाळ लवकर उगवत‌ असे. तोडकीमोडकी सायकल घेऊन मागे लहान भावाला बसवून फाटके कपडे घालून वायरची पिशवी घेऊन तो जवळच शहरात जात असे. एके ठिकाणी ती सायकल लावून देत असे; आणि भावाला घेऊन प्रत्येक दारी ठरावीक आरोळी, याचना करणारी हाक‌ मारत असे. कुणी दिले तर घ्यायचे अन्   हिडीसफिडीस केले तर ओशाळवाणे हसू चेहऱ्यावर आणून पिशवी छातीशी धरून पुढच्या घराकडे पळत जायचे. कधीकधी पिशवीला खूप ओझं व्हायचं तर कधी पोटापुरतेही मिळायचे नाही. त्यावेळी मग उपाशीपोटी सायकल चालवत आलेल्या रमेशच्या पायातील बळ नष्ट होऊन जायचे. मणामणाचे ओझे मनावर घेऊन तो जड अंतःकरणाने गावाकडे निघायचा. नाकर्तेपणाचे ओझेच जणू तो बाळगत यायचा.रमेशचा शहराकडे येण्याचा मार्ग म्हणजे खूपच रहदारीचा होता. रोजसारखा त्या दिवशीही तो शहराकडून परतत होता. त्याला शाळा डोळ्यांसमोर दिसत होती. महत्त्वाची बाब म्हणजे भीक मागून घरी येताच रमेश स्वच्छ आंघोळ करत असे. जणू स्वत:चे ‘भिकारी’ हे रूप तो नष्ट करू पाहत असे. मग मिळालेला बऱ्यापैकी गणवेश घालून सर्वात आधी शाळेत जात असे. आजही तो नियम त्याला चुकवायचा नव्हता.     

नेहमीपेक्षा त्याला आज जरा वेळच झाला होता. सायकल तो जरा जास्तच वेगाने पळवत होता. गाव दिसू लागले तसा त्याला हुरूप आला. नुसते अवसान आणून सायकल पळविताना त्याला दमायला झाले होते. गाव हळूहळू जवळ येत होते.अचानक सायकलने दगा दिला. दारिद्रयाला कंटाळलेली सायकल ती… तिला तेलपाणीही कधी मिळत नसे. त्या दिवशी तिची सहनशीलता संपली. सायकलचे ब्रेक अचानक तुटले. रमेशला कळेना आता काय करावे? रहदारीचा रस्ता, मागे लहान भाऊ, पुढे पायाचे तुकडे पडेपर्यंत मागून आणलेली भीक ठेवलेली पिशवी… एवढेसे‌ पोर‌ गांगरून गेले. रस्त्याच्या कडेला एक मोटारसायकल उभी होती. रमेशने तिकडे सायकल वळवली. सायकल गाडीला ठोकली गेली. रमेश व त्याचा भाऊ दोघेही खाली पडले, ठेचकाळले, रक्त निघाले. लोक त्यांना उचलायला धावले. त्यांना कुठे लागले हे लोक पाहू लागले.    
 
भीक मागून आणलेल्या पिशवीचे बंद तुटके झाले होते. सगळ्यांच्या हातातून कशीबशी सुटका करून घेत मात्र हे भावंडं तुटलेल्या पिशवीकडे धाव‌ घेत होते. स्वत:चे लागलेले न पाहता रमेश व त्याचा भाऊ गोळा केलेले तुकडे पिशवीत भरू लागले. तेव्हा मात्र बघणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहिले नाही. तसेच स्वत:ला सावरत भावाला घेत सायकल लोटत, डोळ्यांतील पाणी जिरवत रमेश गावाकडे जाऊ लागला. कारण त्याला शाळेत वेळेवर पोहोचायचे होते; आणि आपले डोळे कुणी पुसणार नाही ही त्याला पक्की जाणीव होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: