पाणकळा

मानसी चिटणीस

यंदा पावसानं जरा लैच ताण दिला. वैशाक निम्मा झाला तवा कुटं वळवाचा उलूसाक सडा पडला. जरा भिजल्यावानी झालं तेवडंच पर म्हनतात ना..नाव सोनुबाई आन हाती कथलाचा वाळा. तसलंच कायतर म्हनायचं..या पावसानं कुटं दडी मारलीती त्याची त्यालाच दक्कल..

नामाच्या खांद्यावरल्या कावडी काय उतराय तय्यार नवत्या. दुपारच्या तलकीनं कावलेला नामा थितल्याच येका धुवटाच्या दगडावं बसला आन् आटत चाललेल्या नदीकडं बगत त्यानं पान्यात घागर बुडीवली. तवर,

” धनी,वो धनी..”

अशा हाळ्या मारत येनारी शांती त्याला दिसली. कावडीच्या घागरी भरायच्या सोडून नामा शांतीच्या बधीरल्या तोंडाकडं बगत ऱ्हायला..

“काय गं? कशाला येवड्या उनातानाचं धापा टाकत याच? मी येतच हुतो घरला. येवडी पाटलाकडली खेप झाली की येतूच.” “आवं धनी,आदी पटशिरी चला घरला.लैच आकरीत समोर हुबं रायलय..चला बिगीन.” 

शांती डोळ्यांत पाणी आनत बोलली.आन तशीच तरातरा माघारी घराकडं धावली. वरनं ऊन चटाटा तापत असूनबी डोईवरनं खांद्यावं आलेल्या पदराचं बी तिला समजलं न्हाई. हिकडं आता नामाच्याबी जिवाला घोर लागला.

” काय झालं आसंल? शांती कशापायी भाकर थापतेल्या खरकट्या हातानं आल्ती? जावंच घराकडं..बगून तं यू काय झालं?” 

असा ईचार करत करत घागरी पान्यानं भरून नामानं कावडीत ठिवल्या आन् त्यो पाटलाच्या वाड्याकडं निगाला.

गावातल्या तालेवारांच्या घरात पानी भरनं ह्येच नामाच काम हुतं.सारा गाव तेला पानक्या म्हनूनच वळकत हुता. आपली कारबारीन शांती आन पोरगी सुली यांच्यासंग गावकुसातल्या येका खोपटात त्यो ऱ्हात हुता. सक्काळपास्न हरेक मोट्ट्या वाड्यात कावडीच्या खेपा करून पानी भरायचं त्याचं काम सुरू व्हयाचं ते पार दिस मावळतीला जाईपत्तूर चालायंच.त्याची बायकू शांती देशमुकाच्या शेतावं रोजंदारीला जायाची आन् पोरगी सुली गावातल्याच साळंत म्हराटी चवथीत शिकत व्हती. सुली, लै गुनाची आन शाणी पोर. साळंत बी पैला लंबर काडत व्हती. येकंदर बरं चाललं हुतं नामाच. यंदा मातूर मिरगाचं कडूसं पडाय आलं तरी पावसानं काई तोंड दाकवलं न्हाई. कुटं घुळ्ळणमिठ्ठा घालून बसलावता कुना ठावं? पर नामाच्या कावडीच्या फेऱ्या मातूर वाडल्यावत्या. आत्तापन देशमुकांच्या घागरी त्यानं पोचिवल्या आन पाटलांकडल्या घागरी घ्यून त्यो नदीवं आल्ता की लगालगा यून शांतीन तेला घरला बोलीवलं.

“मायला..या बायकांची जात लैच भितरी. जरा कुटं खुट्ट न्हाई झालं तं लागलं यांच काळीज धपापा कराया..”

 नामाच्या डोस्क्यात ईचारांच चरपाट सुरू झालं. खांद्यावरल्या हिनकळणाऱ्या कावडीसंगट त्याचं ईचार बी वरखाली हुयाला लागलं..घागरीतलं पानी मातूर उचंबळून मातीत सांडत व्हतं.वरली सूरव्याची तलकी घामाच पाट वाहात व्हती.

नामा पाटलाच्या वाड्यात पोचला. लगबगीन चौकातल्या डेऱ्यात घागरी रिकाम्या करून तसाच मागारी घराकडं निगाला.पाटलीन बाईंनी रोच्च्यासारकं तेच्यासाटी ठ्येवल्यालं ताकाच भांड बी घ्यायला त्यो इस्सरला. वाड्याच्या भायेर पडतानाच हलगी- वाजंत्रीचं आवाज त्यानं ऐकलं.

 ” मायला ही काय लगनाची वखूत हाय व्हय? लोकंबी आजकाल येलबाडल्यागत झाल्यात जनू. शेतीच्या कामाची उसाबर करायच्या वक्ताला कुनाचा पाट लावायल्यात काय दक्कल?”
 नामाच्या इचारांची घुंगरं परत नाचाय लागली.

उनाळा सप्पायची काय चिन्नं दिसनांत.गावातल्या समद्या हिरी बी तळ गाटाय लागल्या.नदीचं पानीबी निम्म्याला आलं व्हतं.झाडं,जित्राबं पाक झिरमाळली व्हती. पाकरांची तोंड बी शिवल्यागत झाल्ती. समदी मान्सं उनाच्या कायलीनं घाईला आल्ती. लोन्यागत म्हऊ माती बारीक खड्यावानी टोचाय लागली व्हती..उनाचा वणवा काय सपायचं नाव घिना. गावात पावसाच्या वडीची चरचा सुरू झाली आन त्यावरल्या युगतीच्या बाता रंगू लागल्या.त्यातच टूम निगाली ब्येडकाचं लगीन लावायची.जबरी जालीम उपाय..पावसानं लैच वड दिली तर गावातल्याच  ‘ न्हानं ‘न आलेल्या पोरीसंग ब्येडकाच लगीन लावायच..लग्गेच पाऊस पडतोय म्हनं..निस्ता कडीला ऊत न् काय !! नामाच्याबी कानावर आल्ती कुनकून ; पर काय दक्कल म्हून त्यानं शाप डोळेझाक केल्ती. पारावरच्या गावगप्पा त्यो जातायेता गप गुमान आयकू लागला. तशातच देशमुकांनी टाकोटाक वाड्यावं यून जायचा सांगावा धाडला तसा नामा येलबाडला,

“त्ये न्हवं नामा..माजं येक काम हाय. लै पुण्याचं काम. आसं करूया आपन,तुज्या पोरीचं लावू ब्येडकासंग लगीन. तुलाबी पुण्य लाभंल बग. पाऊस पडला तर सारा गाव तुला दुवा दिलं..चला लागा तयारीला.”

आपली नजर नामावर रोकत देशमुक बोलले तसं नामाला बदिरल्यागतं झालं. जिभ टाळ्याला चिकटल्यावानी झालं.कसबसं अवसान गोळा करत नामा खालमानंनच बोलला,

” तसं न्हाई धनी..पोर न्हान हाय माजी. दुसरी बगा की कोनतर.येकच लेक हाय जी मला. गरीबावर दया करा.”

 नामा आजिजीनं बोल्ला पर देशमुकांची घुळ्ळणमिट्टी तेला बरच काय सांगून गेली.

दोनच दिसात गावात पंचायत भरली. तिथंबी ह्योच लगनाचा आन नामाच्या पोरीचा विषय. सगळी लैच हमरीतुमरीवर आल्ती. काही नामाच्या बाजूनं तर काही त्याच्या समोरच्या गटात.पाटलानं नामाची आन देशमुकानं गावाची बाजू घ्येतली.लै राडा झाला.पार लठ्ठालठ्ठीवर गेलं सगळं. नामा तावातावान भांडला व्हता साऱ्या गावासंगती.नामानं त्याचा जिगरी दोस्त,  गुरवाच्या शरणाप्पासंगट बी वाद घातला.येवडं झालं की शरणाप्पा काटी घ्यून नामावर धावला तवा मग देशमुकांनीच मद्यस्ती करत विषय मिटीवला. पर धुम्मस चालूच ऱ्हायली.गावातलं सारं वातावरनच काळवांडलं. दुदात मिटाचा खडा पडल्यावानी सारे गावकरी नामाशी फारकत घ्यून वागायलेते. जसंकाई नामान, पोरीचं ब्येडकाशी लगीन लावायं न्हाई म्हनून मोटं पापच केल्तं जनू.. आगदी त्याचे दोस्तलोग बी त्याच्यासंगट बोलना झाले. ब्येडकाचं लगीन ह्योच सगळ्यात म्हत्वाचा ईषय हून ऱ्हायला होता..

गुरवाची शेवंताक्का,यल्लमाची सकू अशा साऱ्या जाणत्या बाया त्याच्या घराकडं फेऱ्या मारू लागल्या. तर कदी शांतीच्या कानाला लागून दोगा नवरा,बायकोत भांडाण लाऊन दिऊ लागल्या..नामाचं हसतं खेळतं खोपटं उदासलं..आपले आई,बा का भांडाल्यात ?,गावातल्या बाया सारकं सारकं आपल्या घरला का येत्यात?,आपल्या आलाबला का घेत्यात?..सुलीला कायच कळतं न्हवतं.ती अजाण पोरं समद्या बायांना काकी,मामी,मावशी म्हनून चिकटत व्हती. नामानं बगूबगू येक दिस साऱ्या बायास्नी शिव्या दिऊन आपल्या घराकडं याचं न्हाई म्हनून बजावलं आन् मग शांतीला दमात घ्यून तीला बी शाणपणाचे बोल सुनावले.,

” ह्ये बग शांते,ही करनी काय बरोबर न्हाई. पाऊस पडायचा तवा पडलंच..त्यासाटी आपली पोरगी कशाला पनाला लावायची?”

मागल्या म्हैन्यात तालुक्याच्या गावी आईकल्येलं ” दाबोळकर” बाबाच भाषानं बी त्यानं शांतीला बोलून दाकीवलं. 

“दाबोळकर बाबा म्हनलेते की ही सगळी अंदश्रद्दा आस्ती. पोरीचं ब्येडकासंगट लगीन लावून कंदीच पाऊस पडत न्हाई..शांते पयलं आन शेवटचं सांगायलोय म्या माज्या पोरीला आसल्या कंच्याच बडग्यात अडकीवनार न्हाई..लै वंगाळ हाय ह्ये समदं.बगतोच मी बी कोन माज्या सुलीला आसलं वंगाळ काम कराया वापरतूया..मी हाय तवर आसलं काय बी हू द्येनार न्हाई. आपन सुलीच्या गुर्जीस्नी भ्येटूया. त्यास्नी समदा गुत्ताप्पा सांगूया आन त्यास्नीच सांगू गाववाल्यांशी बोलाया. न्हाईतर आसं करतो उद्या सांच्यालाच गुर्जीस्नी भ्येटतो. मंग बगू पुडंच काय त्ये..” 

शांतीलाबी नाम्याचं बोलनं पटलं. आन तिनं त्याच्या सांगन्यापरमानं वागायचं ठरीवलं.म्होरल्या दिवशी सक्काळी कामावं जाताना आन येतानाबी ती उगी ऱ्हायली.कोनासंगटबी बोलली न्हाई की उगा कुटं रेंगाळली न्हाई. शेजारच्या आक्कीच्या दारातबी रोजच्यावानी घडीभर टेकली न्हाई. उरल्याला सगळा येळ तीनं सुलीसंगट खोपटातच घालीवला..सुलीला कनभरबी नदरेआड हून दिल न्हाई तीनं. दिस आला तस्सा गेला.नामालाबी मास्तर काय भ्येटले न्हाई…

आज मातुर सकाळच्यान गदमदत हुतं. वारं पन गपगार झाल्तं. झाडांची पान मान टाकल्यागत दिसायलीती..आच्चा दिस कायलीचाच होता जनू..शरीराच्या आन् मनाच्याबी. सक्काळीच शेवंताक्का पुन्यांदा यून सुलीला बगून ग्येली.” शांते, गावच्या भल्यासाटी येवडं दान टाक बाई गावच्या पदरात..” 

शेवंताक्का जाता जाता बोलून ग्येली. ती जात न्हाई तवर गुरवाचा शरनाप्पा वाजंत्रीवाल्यास्नी घ्यून आला आन् त्यानं शांतीला न जुमानता सुलीला गावच्या बायांच्या हवाली क्येलं. शांती आराडली,रडली,भेकली पर काय उपेग झाला न्हाई. सारी बदिरल्यागंत झालती. कसंतरी सवताला सोडून घेत शांती संचारल्यागत नदीकडं धावली..इतक्यात पिवळीनं माकल्याली; लिंब नेशीवल्याली सुली पाहून तिज्या पायातलं तरानचं गळाटलं.आन् ती थितंच माटकन खाली बसली..पर सुलीच्या तोंडाकड पायल्यावं उरल्यासुरल्या जिवानं ती पुन्यांदा नदीकडं धावत सुटली. नामा ह्योच तिचा येकमेव आदार व्हता..

घराकडं जाता जाता नामानं चंची खोलली तं तमाकू सपलीती.त्यो तायशेट्ट्याच्या दुकानाम्होरं रेंगाळला. समोर साळंत पोरांचा कालवा उटलावता.नामानं उगा सुली कुटं दिसती का पायलं आन सवताशीच हासत तेन रुप्पायची गायछाप आन चुन्ना घ्येतला. पुडीतली चिमूटबर तमाकू हातावं घ्यून चुन्यासंगट बयाजवार मळली आन तोंडात बार भरून त्यो घराकडं निगाला. मदीच तेला काय वाटलं कुना ठावं? त्यो मागारा दुकानाशी आला आन त्यानं रुप्पायचं चिरमुरं-फुटानं घ्येतलं.सुलीचा साजरा चेऱ्हा त्याच्या डोळ्यांम्होरं आला. आज आपल्याला काय झालयं नामाला कळंना. जसजसा नामा घराजवळ पोचला तसा वाजंत्रीचा आवाज आजून जोरात याय लागला. कुटंतरी काळजात लकाकलं तसा नामा भरारा पावलं टाकाय लागला. 

गल्लीच्या तोंडाव वाजंतरीलाले वाजंतरी जीव खाऊन फुकत व्हते आन हलगीच्या तालावं गल्लीतली पोरं सोरं नाचत व्हती. समदी गल्ली बाया-बाप्यांनी भरून गेल्ती.सारी त्याच्या तोंडाकडंच बगत व्हती,कायतर कुचकूच बोलत व्हती. शांती आन सुली जवा त्याला दिसनात तवा नामा कावरला.समद्यास्नी ढकलत त्यो आपल्या खोपटाकड धावला. खोपटाच्या दारात शांती भकास नदरेनं बसली व्हती.रडून रडून तिचं डोळं लालीलाल झाल्तं.बाजूला सुली कोकरागंत हमसत उबी व्हती. हळद माकल्याली,लिंब नेसल्याली सुली बा ला बगताच त्याज्याकडं धावली. नामाच्या कमरला तिडा मारून तिनं हंबरडा फोडला..,

” बा…कुटं व्हतास तू? बग की रं ब्येडकासंगट लगीन लावलं यांनी माजं.गल्लीतली सारी पोर चिडवतेल आता मला..बा..कुटं व्हतास तू?”

नामाच्या हातातल्या पुडीतलं सारं चिरमुरं फुटानं सुलीच्या डोईवर सांडाय लागलं आन गदमदल्येल्या आबाळासंग नामाच्या डोळ्यांतलं धुम्मसल्यालं आबाळ…

पानकळा सांडू लागलं….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: