पोटगीचा दावा

          सचिन बेंडभर     

गाव तसं लहान, पण लई करामती. गावातल्या लोकांना उठा बसाया एकच चौक. चौकात कडुनिंबाच्या पारावर सावलीला दहा – पाच रिकामटेकडी बसल्याली, शेजारी बाबू न्हाव्याचं सलून म्हंजी टारगट पोरांचा अड्डाच. बाबू नाव्ह्याच्या अगदी समोर,पण त्याच्या पड्याल भिवा थोरातांचा वाडा, आकाशवाणीपेक्षा पारावर बातमी सुटली की, गावातल्या घराघरात पोचायची. रातच्याला गावात काही घडलं की दिवस उगवायच्या आत समद्या गावात बातमी  लिक. आज पारावरली टवाळ एकमेकांकडे बघून नुसनी गालात हसायची, तवा भिवा थोराताचा जळफळाट व्हायचा. पण ही गडी आडवाट म्हणून कधीच कुणी सहसा त्याच्या नादाला लागत नव्हता. नजर बेरकी, मिशीचा झुपका. आज्यापासून घरी दुधाचा धंदा. आठ-दहा म्हशी अन दावणीला भला मोठठा टोणगा असायचा गोठ्यात, टोणायाच्या नाकात पितळाचं कडं. त्या कड्याला कासरा बांधून भिवा टोणगा घेऊन नदीवर धुवायला निघाला की, गावातल्या टवाळ पोरांना त्याच्यात अन् टोनग्यात फक्त शेपटाचाच फरक दिसायचा. भिवाला दोन मुलगे अन एकच लेक. दोन्ही पोरं तशी मेंगळीच, पण लेक खड्या आवाजाची.चालली तरी इगल्यागत चपाळ. घरापुढे तीशी दिवस गावातली बिनकामी टवाळ जमायची पण कामलीकड बघायचं अवसान चार वर्षात कोणी लावले नाही. कमलीला पाहिल की गावातल्या कार्टून व्हायचं.

कमळीचं लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी तीन – चार महिने सासरी नांदली. तिचं लग्न झालं अन् पहिल्याच वर्षांच्या जत्रंला तिचा सासरा आला. कमळीच्याबापानी त्यालाबी झकास बेत करून माणुसकी दावली,पण घडलं उलटंच. दोघा व्याह्यांनी एकाच बैठकीत एक एक खंब्या रिचवला आन् बोलता बोलता दोघभी पागल झाली. कमलीचा सासराबी कमी नव्हता. बैलाच्या बाजारात दलाली करायचा कितीबी चवसार माणूस त्याच्यापुढे गेला की गार व्हायचा. उंचीनी बुटकाच, पण तोंडात लईच अवसान त्याच्या. अंगात हिरव्या काड्याचं जाकीट, मोठ्या घडीची टोपी,तोंडात सदानकदा पानाचा तोबरा. बोलायला लागला की एक सोन्याचा दात मधीच चमकायचा

आज व्याह्याच्या जत्रंत जरा जास्तच झाल्याली. आला एकेरीवर बाजारात आल्यावनी. शिवाय पोराचा बाप असल्यानी अवसान आणखीच वाढलं, दारूच्या नशेत दलाली भाषा झिरपाया लागली.

आर तुझ्यापाशी काय व्हतं; पण मीच मोठं मन करून तुझी लेक पदरात घेतली.

तसा कमळीचा बाप गरजला,”मेहेरबानी माझीच म्हणून तुझा ल्योक उजवला.

तसा कमळीचा सासरा शॉक बसल्यागत ताडकन उठला.

“तुझी मेहेरबानी नको, ठेव लेकीला कणगीत घालून. अन् खऱ्या बापाचा असलं तर लेकीला घेऊन नाक घासीत माझ्या दारात येऊ नकोस.

भिवाला शिव्याची लाखोली वहात तरातरा रातच्यालाच निघून गेला.

दोन्ही गडी तालेवार. चार – पाच सालात कुणीच माघार घेतली नाय. उलट कमळीच्या बापानी तिचा पोटगीचा दावा लावला. दोन-चार वेळा पोटगीची तारीख असली की तिचा बाप तिच्यासंगं जायाचा. पण आता कमळीला एकटीलाच पाठवू लागला.

अशीच एका तारखेला कमळी एकटीच गेली. कोर्टाच्या पुढं झाडाखाली टेकली अन् तिची नजर किस्न्याकं गेली. त्योबी आज एकटाच आला व्हता. दोघं नवराबायकू एकमेकाकं बघायची. नजरेला नजर भिडली की पुन्हा खाली बघायची. कमळीनी किस्न्याकं बघितलं तसं किसनानी तिला डोळ्यांनीच ये म्हणून खुणावलं .बराच इचार करून कमळी उठली आन् किसनाशेजारी हाताच्या अंतरावर बसली. बराच वेळ दोघंबी मुकीच.

तसा किसना बोलला, 

“कमळे,मी कधी तुला हाणलं -मारलं? कधी शिवी दिली? डोळ्यांनी तरी दापली तुला? मग हे डोक्यात खूळ काय म्हणून.

कमळीचा बांध फुटला. मुसमुसून तिनं रडून घेतलं.

आन् म्हणाली, मला बाच्या घरी शेण भराया का म्हणून ठेवलं? मी काय नांदाया तयार नाय व्हय? दोघा याह्यांचं पिऊन झालं आन् माझ्याच कसं नशिबी आलं. कमळी बोलली…

तसा किसना हाराकला. कमळीसंग तो बोलत व्हायला आन् कमळी ते ऐकून मनातल्या मनात खूष झाली. दोघांना एका इचाराने जवळ आणलं हे त्यांच्याबी लक्षात आलं नाय. ठरल्याप्रमाणे दोघंबी उठली, तशी कमळी बोलली,”आजची तारीख?” दोघंबी एकमेकाकं बघून खुषीत हसली अन् तारखेला बाल्या मारून कोर्टाच्या बाहेर पडली. त्याच रातीला ठरलं तसंच घडलं.

दिवस उगवायच्या आत गावात बोंब झाली.कमळी रातच्याला पळून गेली. भिवाची चांगली जिरली म्हणून देवळात, पारावर,बाबू न्हाव्याच्या दुकानात जमलेल्या सगळ्याच्या गालात हसू पण आडवाट गडी म्हणून कुणीच बोलाना. भिवाच्या सुतकी थोबाडाकं बघून सगळ्यांनाच आतून गुदगुल्या व्हायच्या.

तरीबी दम न निघाल्यानी बाबू न्हावी बोललाच, 

“गेली,गेली म्हणत्यात,पण कुणासंग?” 

तसा काळ्याचा सद्या कोकलला, 

“कुणासंग काय? आरं तिच्या नवऱ्यासंग.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: