हुंकार

डॉ. राजश्री पाटील

गेल्या चार दिवसापासून तुलसी ‘ती ‘ची वाट पाहत होती. आज किती तारीख ?..चौदा ना! मग एव्हाना यायला हवी होती ‘ती’ बारालाच !दोन दिवस आधी येते नेहमी! पण तिचा काही भरवसा नाही, महिन्यातून नक्की येते ‘ती’ पण एक-दोन दिवस मागे किंवा पुढेही होते कधीकधी. या दोन दिवसात येईल कदाचित…

अरेच्या…सोळा तारीख संपली, अजूनही कशी नाही आली ही ? येण्यापूर्वीच्या काही नोटीसा असतात…. त्यांचा ही पत्ता नाही. सहजासहजी कुठे येते बया ! आपल्या येण्याच्या तांडव करतच येते. तिच्या पूर्वसूचना असता ना! अद्याप नाही सिग्नल. कदाचित…. तसे काही ? ..नाही ..कसे शक्य आहे ? या महिन्यात फक्त दोनदा तिमिर घरी होता .नाही तर जवळजवळ संपूर्ण महिना बाहेरच गेलाय .त्याचा त्या चळवळीतील सक्रिय सहभाग. आपल्या खांद्यावर हाॅस्पिटलचे ओझे टाकून हा खुशालचेंडू झालाय, मनमौजी…. बीएचएमएस डिग्रीला हा’ जू’ सांभाळताना काय त्रास होतोय याची कल्पना गायनाकॉलॉजिस्ट तिमिरला आहेच कुठे? प्रॅक्टिस ची राहूदे आपली तरी खबर कोठे आहे ? अंगावरची रजई दूर फेकत मनातले विचारही तिने दूर फेकून लावले …कामांच्या धास्तीने तिने उठायचा प्रयत्न केला पण शरीराला आलेला सुस्तपणा तिला उठू देत नव्हता. मात्र गळ्याशी आलेली गुळणी थुंकण्यासाठी तिला उठावेच लागले. तिने बेसिन गाठले… तसे आंबट-तुरट पाणी पोटातून प्रचंड कालवाकालव करत बाहेर पडले. हे काहीतरी सुचवत आहे ..पूर्वकल्पना देत आहे. ..’ति’च्या येण्याची कोणतीच लक्षणे नाहीत पण’ न’ येण्याची मात्र दिसत आहेत .या विचाराने मात्र ती चिंतीत झाली .टेस्ट करावी का? नको इतक्या लवकर ..कधीकधी चुकीची येते. दोन दिवसांनी करू…

आज अठरा तारीख…काय ? टेस्ट पॉझिटिव्ह!ओं गाॅड! आपन सांगत होतो तिमीरला काहीतरी युज कर.. ऐकेल तर ना? म्हणे सेफ पिरियड आहे. बघ आता…! तुझे काय तू नामानिराळा. आता मलाच निस्तरायला हवे हे! किती दिवस अजून आॅपरेशन लांबणीवर टाकणार आहेस? आता डिंप्या आठ आणि रिंकी सुद्धा चार वर्षाची झाली. आपण तर काय त्याचे ऐकतोय? गेल्या चार वर्षात ही तिसऱ्यांदा प्रेग्नेंसी राहतेय आपल्याला. एक डॉक्टर असून हा निष्काळजीपणा !.. काय करणार आपण तरी..? कॉपर टी ने हेवी बिल्डींग होऊ लागले तर टॅबलेट घेतल्या तर उभे राहणेही अशक्य झाले. राहिला एकच उपाय फक्त तिमिर च्या हाती. पण युज करायला किती आळशीपणा करतो. आता म्हणेल घे टॅबलेट अन् करून टाक फेल. मागच्यावेळी किती त्रास झाला पिशवी धुतल्यावर…. आणि एकदा टॅबलेट घेतल्यावर झालेले ते बिल्डिंग ! जाऊदे आता विचार करून उपयोग नाही. पुढचं पाहायला हवं .त्याला सांगावे का नको? नकोच… आपणच घेऊन टाकू टॅबलेट. पण इथून पुढे त्याला अनसेफली जवळ नाहीच येऊ द्यायचे…

असे किती वेळा ठरवतेस पण जमतं का तुला…? आणि तुला जमलं नकार देणे तरी त्याला जमतं का स्वतःला आवरणं..? असाच भटकत असतो.. कधी चार दिवसांनी ,कधी आठवड्यांनी तर कधी पंधरा दिवसांनी भेटतो मग आपल्याही त्याला नाराज करणे जीवावर येते….. तुटून पडतो… सगळे ठरवलेलं त्याच्या आक्रमणापुढे मातीमोल होते. पावसाने ढेकुळ विरघळावे तसे आपण विरघळून जातो त्याच्यात..पण आता नाही हे वादळ-पाऊस थोपवायचेच… काही निश्चय करून ती ठामपणे उठली… तिने गोळ्याचे पाकीट फोडले… आज एक… उद्या सोडून परवा दोन…. त्यानंतर दोन… मग येईल ‘ती’… तिचे नेहमीचे येणे पण इतके कष्टप्रद !आता तर ‘ती’ रुजलेली…. ठाण मांडून बसलेली… निसर्गाच्या विरोधात जाऊन तिला हुसकावतो आहे. तिच्या घरातून…किती त्रास देते देव जाणे…? तुलसी विचारांच्या आवर्तातच पेशंट, घर ,मुले,गाडा ओढत होती. प्रचंड कंबरदुखी,तोंडाला येणारे आंबट पाणी ,डोकेदुखी, शरीराचा सुस्तपणा, गळून गेलेले हात-पाय आणि या सर्वात ‘ती ‘ची प्रतीक्षा…! तीन दिवस गेले आणि चौथ्या दिवशी तिचे आगमन झाले ते आक्रमकपणेच‌… उसातून रस पिळून काढावा तसे तिच्या शरीराला शोषून ती वहात होती. ‌तुलसी पुरती गलितगात्र झालेली. एक..दोन…तीन दिवस तिचे अव्याहतपणे वाहणे सुरू होते .या दरम्यान एक छोटीशी गाठ पडली…. आणि तिने सुटकेचा नि:श्वास टाकला .थोडी रेस्ट ,थोडे काम आणि तिचं वाहनं सुरूच होते.

सकाळी उठून ती दात ब्रश करत असताना एकदम खाली कोसळलीच. झाडूवाल्या मावशी, मुले धावली. डॉ. मैत्रीणिने येऊन चेक केले…. बीपी लो…. ती पूर्ण निस्तेज… गरंगळूनन गेलेले तिचे शरीर! प्रसंगावधान राखून मैत्रिणीने सुरू केलेले सलाईन आणि तिमीरला खडसावून केलेला फोन…! नशीब खेड्यात जवळपासच होता. तो आला. तुळशीला सांगावेच लागले मैत्रीण आणि तिमिरला.. गोळी विषयी.. ‘ती ‘च्याविषयी….खालून सुरू असलेल्या धबधब्याविषयी… अर्जंट सोनोग्राफी केली. निष्कर्ष निघाला… अजून काही तुकडे आत शिल्लक आहेत. तिला थिअटर मध्ये घेतले. त्याच्यासाठी फक्त पाच- सात मिनिटाचे काम शाॅर्ट जीए खाली पिशवी स्वच्छ. पूर्ण स्वच्छ.. पण तुलसीचे मन मलिन….मलिन…. धबधबा थांबला.. पण सुरू होता चूकार पाझर…. आता सर्व नॉर्मल होते. हळूहळू आली ती शुद्धीवर शरीर शक्तीहीन…. आणि गलितगात्र झालेले… गप्प पडून राहिली .थोड्या वेळाने तिला बेडरूममध्येच शिफ्ट केले. ती विचार करत होती … किती सहज घेतले हे सर्व तिमीरने..! जणू एक पेशंट हँडल करतोय! त्याच्याशी आपला काही संबंध नाही… हे व्हायला नको होते …काही खंत नाही ..त्याच्या नजरेत ,कृतीत. या विचारांच्या कडवटपणातच तिला डोळा लागला .

रात्री कोणाच्या तरी चाहुलीने ती जागी झाली. तिमिर जवळ बसलेला. पंधरा दिवसांनी त्याला डोळे भरून पाहणारी ती. तिला बरे वाटले त्याच्या स्पर्शाने. त्याने तिचा हात धरला तसा सागळा राग कुठेतरी हवेत विरून दूरवर गेला. त्याला घट्ट धरून बिलगून झोपावे‌…त्याच्या आश्वासक मिठीत …झालेला प्रचंड शारीरिक त्रासाचा परिहार व्हावा असे तिला वाटले. तोही काही वेळ बसून राहिला तिच्या केसातून हात फिरवत .नि:शब्द शांतता. तुलसीला भरून आले. असेच रात्रभर तिमिर शेजारी असावा…. त्याच्या फक्त सहवासात आपण लहान मुलासारखे त्याला बिलगावे… त्याने थोपटत रहावे… त्यांच्या उबदार स्पर्शात रात्र जावी… या कल्पनेनेही संपूर्ण अंग चांदन झुला झाले. अशीच पाच.. दहा मिनिटे गेली. तिला बाथरूम आल्याची जाणीव झाली ..तसेच पॅड पण बदलायचे होते. ती हलकेच उठली बाथरूम कडे जाऊ लागली .बाथरूम आणि बेड पाच-सहा पावलावर. चार पावले गेली आणि तिथेच बसली मटकन्. थोडीशी चक्कर आली तिला.तिमीरने उठून आधार दिला तशी उठुन ती बाथरूम पर्यंत गेली.पाचेक मिनिटात सगळं संपवून भिंतीचा आधार घेत सावकाशीने ती बाहेर आली .तसा तिमिर लगबगीने सामोरा गेला. त्याने तिला अलगद उचलले… तिच्या अंगभर मोरपीस फिरले. तिने त्याच्या मानेभोवती हात गुंफले. त्याच्या खांद्यावर डोके ठेवताना इतके दिवस हॉस्पिटलचे वाहिलेले ओझे कापूस झाले… तिने डोळे मिटून घेतलेले… सावकाशीने त्याने हलकेच गालावर ओठ टेकवले. तो तसाच तिला घेऊन आला आणि अलगद त्याने तिला बेडवर झोपविले. तिने त्याला पकडले होते.. हलकीशी मिठी सोडवत तो दुसऱ्या बाजूने पलंगावर पडला .तिने त्याला घट्ट पकडून ठेवले. ती त्याच्या छातीत तोंड खुपसून लहान मुलासारखे त्याला बिलगली. .आणि तो ही तिला थोपटू लागला… हळूहळू तिला थोपटणारा त्याचा हात ‌..सर्वांगाने फिरत फिरत अगदी खालपर्यंत जाऊ लागला… एक एक अडथळा दोघांमधला दूर करायचा तो प्रयत्न करू लागला तशी ती बावरली ,घाबरली….तिमिर….तिमीर…काय करतो आहेस…? हे तिचे शब्द त्याच्या ओठानेच त्याने बंद केले आणि आता त्याला ती हवी होती… संपूर्ण…

पंधरा दिवसाच्या उपवासापुढे तिची शारीरिक स्थिती…. मानसिक स्थिती… तीचं अजून खालून चालू असलेलं पाझरणं सगळं सगळं त्याने दृष्टीआड केलं होतं…. हवा होता एक निचरा…. त्यासाठी बाहेर काढला होता त्यांने आपला पुरुषी फणा… ती बंद ओठाआड हुंकारत राहिली‌… दुबळा विरोध करत राहिली‌.. यावेळीही ती अयशस्वी ठरली.‌.. आधीच गळलेल्या हातापायांनी नांगी टाकली आणि तिला शरण जावे लागले… त्याच्यातील उसळून आलेल्या वासनिक भावनेपुढे ….फुत्कारणाऱ्या सर्पागत तो पुढे सरसावला‌‌….. रात्र पुढे सरकत राहिली…. मनातून कडवटपणा ची उतरलेली पुटं परत नव्याने चढत राहिली…..‍ हे प्रेम कि वासना शोधत उशी चिंब चिंब भिजली…. बंद दरवाज्याच्या आत अंधार अंगावर घेत… युगानुयुगे प्रकाशाची वाट शोधत..ती चित्कारत राहिली मिटल्या ओठांनी….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: