नोटबंदी

दिप्ती सुर्वे-जाधव

एव्हाना कौलाच्या फटीतून पाऊस आत शिरायला लागला होता. टपटप गळणारे अश्रू पुसत आक्की गळत्या जागी टोपं मांडायला लागली. मोडकळीस आलेल्या वाश्याकडे एकटक पाहणाऱ्या अण्णाचे डोळे स्थिर झाले होते.
“लक्ष्मे…SSS… मी चाल्लो गं…SSS…” बोलताना आण्णाला धाप लागली.
“धनीSSS.. सांच्याला वंगाळ बोलू नगासा.” चुलीवरच्या भाताच्या उकळीत काविलता फिरवत आक्की बोलली.
“आक्के… आण्णा असं काय करायलाय. डोळं झाकत नाय बघ.”  शेजारचा गुंड्या येऊन बोल्ला.
“तसंच करायलाय काल धरनं. म्हातारं वंगाळ वंगाळ बोलू लागलाय.”
“डागटरला बोलवू काय ?”
“नगं. डागटरचे आदीचंच ३०० बाकी हायेत द्यायचं. आता येणार नाय मुडदा.”
“आक्के, पुढं तुझं घर कसं चालायचं गं ?”
“पांडुरंग हाय की. त्यो बघल काय त्ये. आजवर चालवलं. पुढं बी त्योच चालवंल.” 
आक्का मागे आलेला विस्तव पुढं सरकवत बोलली.
“आक्के, तू शिरपतीच्या कानावं घाल की.”
“नगं. त्याचं नि ह्येंचं कदीच पटलं नाय. गावातली नटवी केल्याव जो उलगलाय ह्येंच्याशी भांडून. तवाधरनं त्येचा पत्त्याच न्हाय. आयस बापूस जिते हायत की मेलेत त्ये बी बगाया आला न्हाई मुडदा. ववाळून टाकलंय त्या पोरीवं समदं. जाऊंदे. तू दोन घास खाऊन घे पोरा..”
“नगं आक्के. मी जिवून आलोय.”
वाश्याकडे एकटक पहाणारी अण्णाची नजर अजून तशीच होती. आक्कीच्या काळजात कालवाकालव झाली. तरी धीराने ती त्याच्याजवळ वाकत वाकत पातळ पेज घेऊन गेली.
ओठातल्या भेगेत चमच्याने पेज ओतताच अण्णाला ठसका गेला.
आक्की सुरकुतलेल्या ओठातून उरलेले चार दात काढून खुसकन हसली.
“हायस व्हय मेल्या. मला वाटलं उलगलास. काय रं म्हाताऱ्या. कवाधरनं त्या सासूबाईंच्या फोटूकडं बगतोय तू. ती आनि कशानं आठवाय लागली रं तुला ?. कालधरनं जास्तच बघायलायस. जितेपणी नाय सोडलं त्या महामायेने, आता मरतानाबी पाठ सोडं नाय. “
“कशाला शिव्या घालायलीस गं आक्के.”
“आरं, माह्या शिव्या ऐकल्याबिगर कदी घास न्हाई उतरला म्हाताऱ्याच्या घशाखाली. आता ही पेज उतराय हवी ना.. म्हनून..” 
डोळ्यांच्या कडा टिपत आक्की बोलली.
“आक्के…” गुंड्याची जोराने हाक.
“काय रं मुडद्या.”
“आक्के, एक शिक्रेट हाय. जाताना आबा सांगून गेलाय मला. मला म्हनला व्हता, अण्णा मेल्याबिगर बोलू नगं कुनाला.”
झारकन त्याच्याकडे वळून. त्याच्या दिशेला झाडू फेकत आक्की ओरडली. 
“मुडदा बशिवला तुजा.. तुह्या आवशीन खाल्लन कांदे. सांगतोस गप गुमान. की जळकं लाकूड घालू घशात तुह्या. शिक्रेट म्हणे.”
“आक्के, थंड घे. शांत ऐक. त्या म्हातारीच्या फोटुमागे ना अण्णानं वरच्या अंगाची जागा इकून मिळालेले पन्नास हजार ठिवले हायेत. तू तुह्या सासूचा राग राग करते, मंग तिच्या फोटूकडे कधी फिरकायची नाय, म्हनून तिथंच टाकून ठिवलेत.”
“हरामखोरा. ह्ये आता सांगतोस व्हय रं कुत्र्या. आता घालतेच घशात तुह्या निखारा. म्हातारा मराय टेकलाय आनि तू गप गुमान बसलाय इतके दिस. फुकनीच्या.”
आक्कीला धाप लागली.
“आक्के. तुझी शपथ घातलेली अण्णानं आबाला. आन आबानं त्याची मला. अण्णा गेल्याव तुह्यासाठी कायतरी हवं पाठीशी म्हनून ठेवलेलं अण्णानं आनि त्याच्या आजारासाठी तू समदे खर्च करशील म्हनून तो बोल्ला नव्हता आनि आमालाबी गप केलं व्हतं. आयच्यान आक्के.”
“काय रं गुंड्या, शिरप्याचे खोडरबर कधी चोरायचे सोडले नायस. आनि पन्नास हजार बरं सोडलंस.”
गुंड्याचा चेहरा पडला.
“आक्के, मला काय बोलायचं नाय हा. ह्या घरचं मीठ खाल्लय म्या आनि आता अकलेनं बी मोटा झालोय… हां”
वळून आक्की अण्णाकडे बघत ओरडायला लागली.
“आणि तू रं मुडद्या, तुह्या पाठून मी कशाला राहीन मरायला इथं. कुत्रा डसलाय व्हय मला.”
“गुंड्या ऐक, उद्या सकाळच्याला बेगिन ये.. उद्याच्यालाच हास्पिटलात घेउन जाऊ म्हाताऱ्याला..पोरा डोस्क्यावरचा ताण हल्का झाला बग..आणि ऐक वांदरा…मध्येच माझं काय झालं तर अण्णाचं समदं डागटरचं तू बगायचं. त्यातले धा ठिव तुला पायजे तर..”
“आक्के.. कशाला वंगाळ बोलती.. चल..मी जातो आता. उद्याच्याला सकाळच येइन..”
भांडखोर आक्कीच्या डोळ्यातून एव्हाना पाऊस बरसायला लागला होता. 
“बहिदवार जा रं पोरा, वाटा निसरड्या झाल्याती”… आक्कीच्या बोलण्यातून काळजी सांडत होती.
तो गेल्यावर आक्की सासूच्या फोटोकडे बघत नुसती हसत राहिली.. हात उंचावून फोटो सरकवला..
हाताला एकदम पाचशेच्या एवढ्या नोटा लागल्यावर ती वेडीपिशीच झाली..पण… अचानक तिला धस्स झालं..शेवटी डोळे विस्फारून इतकच बडबडली..
“नोटबंदी..”
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला जायच म्हणून गुंड्या सकाळी लवकरच आक्कीच्या घरी आला..
“आक्के.. चल बेगिन. रिक्षा आणलिया..”
माजघरात गेला आणि स्तब्धच झाला.
पाऊस ह्याआधी कधीच त्याच्या अंगावर इतक्या जोरात कोसळला नव्हता. गळत्या छपरातल्या पाण्याने सगळी टोप तुडुंब भरून वाहत होती. घरात सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आणि त्या पाण्यात अण्णाच्या उशाला बसलेली आक्की खाली कोसळली होती. 
दोघांचे श्वास एकत्रच थांबले होते..
सासूच्या फोटोची फ्रेम कलंडली होती..

घरात साचलेल्या पाण्यावर पाचशेच्या जुन्या नोटा तरंगत होत्या..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: