मोगरा फुलला

शीतल दरंदळे

आज दांडेकर चाळीत परत ओरडण्याचा आवाज येत होता. मुंबईतली दांडेकर चाळ. 3 मजली 25 खोल्या. त्यात 3 ऱ्या मजल्यावरचे शेलार कुटुंब. दोन खोल्यांचं घर. म्हणायला दोन खोल्या पण आतली खोली म्हणजे फक्त एक ओटा आणि मोरी. बाहेर दहा बाय दहाची खोली. या घरात सात
माणसं.

सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेला गोविंद त्याची बायको गंगा. गोविंदचे आई वडील आणि आजी वय असावे. 85 च्या आसपास, अंथरुणाला खीळलेली. गोविंदची एक बहीण सुजाता, विधवा आपल्या मुलासकट कायमची इकडे राहिलेली.

गोविंद माळीकाम करी. एका बंगल्यात कामाला. बाग स्वच्छ झाडून घेणे, रोज पाणी घालणे, फुलांची निगराणी करणे, खत तयार करणे अशी सर्व काम गोविंद अगदी मनापासून करी. त्याच्या हाताने लावलेले एक ही रोप कधी मेले नाही. गोविंदवर मालक ही खूप खुश असत, 6 महिन्यापूर्वी लग्नाला मालकांनी आर्थिक मदतही केली शिवाय उपस्थित राहिले होते.

गंगा ही खूप आनंदी होती. गावाहून पहिल्यांदा ती मुंबई पाहणार होती, इतक्या मोठ्या शहरात राहायला मिळणार होते. गोविंद ही मनानी खूप समंजस होता आणि गंगा ही शांत, सोशिक होती, खूप कष्टाळू होती. लग्न करून दांडेकर चाळीत राहायला आली आणि गंगाची स्वप्न जणू पाण्यात विरघळली. सतत घरात रांधा, वाढा, उष्टी काढा. त्यात आजेसासू सतत टोचून बोलायची. सासूची फूस होतीच. इतर वेळेला गंगा काम आवरून पटकन बाहेर पडत असे. काही काम काढे, कधी मैत्रिणीशी बोलत बसे, कधी मंदिरात जाई. पण हे लॉकडाऊन आल्यापासून ती अडकून पडली. आजेसासू, सासू एकही संधी सोडत नव्हत्या. गंगा ला उबग आला होता, एवढ्या घरात कसे राहू, गोविंद थोडावेळ तरी बागकाम करून येई, पण दोघाना बोलायला उसंतच नव्हती. कसे दुःख हलके करणार? कामाला ती कधीच दमत नव्हती पण सतत होणाऱ्या कटकटीला ती त्रासली होती. कधी बोलली तर अजून गजबच. मग ती शांतच राहायची.

गोविंद सारं पाहत होता. आईला समजवण्याचा प्रयत्न करी पण त्यालाही मग बोल बसे. गोविंदच खूप प्रेम होतं गंगावर पण कळत नव्हते कसे समजवू तिला? सगळे सतत समोर. गंगाला आता वाटू लागले की हे लॉकडाऊन नसून तुरुंगवास आहे. ती रडत रडत झोपून जाई. मालकाचा बंगला फार दूर नसल्याने गोविंद पाणी घालायला का होईना बंगल्यात जात होता. त्याला परवानगी होती. त्या दिवशी बागकाम करताना त्याला त्याने लावलेले मोगऱ्याचे रोपटे दिसले, फुलांनी गच्च भरले होते. त्याने मालकाच्या परवानगीने थोडी फुलं घेतली व तो घरी आला.

सर्वांची निजानीज झाल्यावर त्या फुलांचा सुंदर गजरा तयार केला. जेव्हा गंगा झोपली तेव्हा हळूच तिच्या केसात माळला.

पहाटे उठल्यावर गंगाला सुंदर फुलांचा वास आला. खांदयावर ओघळून आलेला गजरा तिला जाणवला.तिने हलकेच तो हातात घेतला व त्याचा वास श्वासात सामावून घेतला. गोविंद ने उठून तिच्याकडे बघत हसत पाहत होता. ती मोहरली, लाजली. एक गोड हसू तिचे गाल गुलाबी झाले होते. कोणीतरी उठल्याची चाहूल झाली.

ती झटकन उठून चहा बनवू लागली, गोविंदची नजर तिच्यात गुंतलेली तिला दिसत होती. तिला सर्व स्वप्नवत वाटत होतं.अगदी सिनेमातल्या सारखं. तिने हळूच गोविंदकडे पाहिलं त्याने तिची नजर पकडली. तिला अजून हसू आले. तिने सर्वांसाठी चहा बनवला, गोविंसमोर चहा घेऊन आली तेव्हा डोळे मिचकवून गोड हसत तिने गजरा आवडल्याचे सांगितले कोणाच्याही नकळत. गोविंदने ही मान हलवत त्याला कळले असल्याचं सूचित केलं.

मोगऱ्याचा सुवास आता सगळीकडे पसरला होता.घरात सर्वानां जाणवले होते, पण विचारणार कस, आणि कोण?

गंगामध्ये झालेला बदल आजेसासू व सासूला ही अचंबित करून गेला. सगळे शांत झाले,गंगाचा फुललेला चेहरा कोणालाही काही तक्रार करू देत नव्हता. गंगाच्या अडचणीला गोविंदाने त्याच्या प्रेमाने मात दिली होती तेही कोणाला ही न दुखवता.

आता रोज नव्याने गजरा माळला जात होता, गोविंद गंगाचे प्रेम न बोलता उमलत होते, फुलत होते व सुवास सगळीकडे पसरवत होते.

One thought on “मोगरा फुलला

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: