लगाम

यशराज शंकर आचरेकर

कोलगेट, साबण, तेलाची बाटली आणि अनुने सांगितलं तसा नवीन लायटर. चार तर गोष्टी, पण तरी मी पुन्हा एकदा सामानाची पिशवी नीट चेक करतो. काउंटरला माझ्यापुढे दोघेच जण. पाच मिनिटात येईल आपला नंबर.
मी कॅशिअरच्या पुढ्यात सगळं सामान नीट मांडून ठेवतो.
किती वेळ झाला आणि हा अजून खाली मान घालून आकडेमोडच करतोय. एकतर एवढं उकडतंय इथे. मी धुसफूसतो, “ओ जरा लवकर करा.”
तसा तो मान वर करून माझ्याकडे बघतो. खरंच बघतोय का हा आपल्याकडे? डोळे थोडे विचित्र दिसताहेत याचे.
अरेच्चा याच्या डोळ्यात बुब्बुळेच नाहीत. माझ्या छातीत धडधडू लागतं. तो तोंड उघडून एक आकडा सांगतो.
मी हातात दाबून ठेवलेली नोट डेस्कवर ठेवून थरथरत पिशवी उचलतो.
आता तो माझ्याकडे बघून विचित्र हसू लागलेला असतो. एक अस्फुटशी किंकाळी माझ्या तोंडून बाहेर पडते.
मी शक्य तेवढं भराभर चालू लागतो गेटच्या दिशेने.
ही सर्व माणसे माझ्याकडे का बघत आहेत विचित्र चेहरा करून. मूर्खच आहेत लेकाची. जेव्हा कॅशिअर बघेल यांच्याकडे तेव्हा ह्यांचीपण हीच गत होईल…. हीहीही….
मी दाराला किल्ली लावून दार उघडतो. आत येऊन खुर्चीवर कसाबसा बसतो. घामाने माझं पूर्ण अंग डबडबलं असतं. च्या आयला गेले कुठे सगळे? अनुपण नाही आणि पोरंपण नाही घरात.
मी टेबलाकडे पाहत असतो. टेबलावर एक छोटासा ठिपका दिसतोय. नीट दिसत नाही काय आहे ते. मी दुर्लक्ष करायचं ठरवतो.
पण मग तो ठिपका वळवळतो. मी डोळे किंचित किलकिले करतो. आता थोडं स्पष्ट दिसू लागतं. मुंगी एवढ्या आकाराचा घोडा आहे तो. मी हसू लागतो.
मी डोळे पुन्हा नॉर्मल करतो. पण आता मला अशा डोळ्यांनीही घोडा दिसतोय. असं कसं झालं?
घोड्याचा आकार वाढलाय बहुतेक. चांगला बोटभर लांब झालाय. आणि पाठीवर पंखही आहेत की त्याच्या.
मी दुसरीकडे नजर वळवण्याचा प्रयत्न करतो, पण नजर सारखी तिकडेच जातेय.
तो आता हातभर तरी लांब झाला असावा. काही तरी बदल झालाय त्यात. साधासुधा नाही, फार भयंकर!
त्याचा आधीचा काळा रंग आता गडद तपकिरी झालाय. (पण आधी तो होता का काळा? मी प्रयत्न करतो, पण नीट आठवत नाही). त्याचे डोळेपण लालभडक झालेत आणि ते माझ्याकडेच बघत आहेत. मी विचार करतो जर हा टेबलभर मोठा झाला तर? तर काय… टेबलावरून पडेल… हीहीही…
काय करू? कोणाला सांगू हे? अनुला? नको, ती नाही विश्वास ठेवणार. मग मुलांना सांगू का? नको, ती म्हणतील बाबा तुम्ही जरा हे रोज प्यायचं कमी करा. अरे ह्या बावळटांना काय माहीत. वयात आल्यापासून पितोय मी. शुद्ध हरपेपर्यंत पिणं कधीच जमलं नाही आपल्याला.
असं करतो सुश्याला सांगतो. तो आपला कॉलेजपासूनचा मित्र. नक्की समजून घेईल आपल्याला. पण नको, त्याने इतर कोणाला सांगितलं तर? सगळे हेच बोलतील राजू व्यसनी झालाय. आयुष्याचेच घोडे लागलेत, त्यामुळे सगळीकडे घोडेच दिसत आहेत. खी खी…
मी उठून किचनमध्ये जातो. चहा करून पिऊया म्हणजे जरा बरं वाटेल आणि तरतरीपण येईल. थोडा चहा त्या घोड्याला पण ऑफर करू… हीहीही.. मी पुन्हा हसतो.
मी लायटर शोधू लागतो, पण नाही सापडत कुठे. अरे आताच तर ठेवला होता मी नवीन आणलेला. का दिसत नाहीये?
घोडा आता किचनमध्ये डोकावून पाहत असतो. तो आता एवढा मोठा झालाय की त्याचं फक्त अर्धच शरीर किचनच्या दरवाजातून आत आलंय. त्याचे डोळे मलाच शोधत आहेत बहुतेक. मी वैतागून लायटर शोधण्याचा नाद सोडून देतो. मी वरच्या कपाटात दडवून ठेवलेली बाटली बाहेर काढतो. बाटलीचं बूच फिरवताना लक्षात येतं की घोडा माझ्याकडे आशाळभूत नजरेने बघतोय.
मी बूच तसंच उलट फिरवून बाटली घट्ट बंद करतो…. कशी जिरवली लेकाची!
मी आता तडक बेडरूममध्ये जातो आणि बिछान्यावर आडवा होतो… या घोड्याला घोडा लावलाच पाहिजे. घोडा आता तिकडे पण येतो. मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. मी डावीकडच्या भिंतीवरच्या फोटोकडे पाहतो. आईबाबांच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाचा फोटो लावलाय तिथे. दोघांचे हसरे चेहरे. बहुतेक आता माझ्यासोबतच हसत आहेत. माझ्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरतं. हे इतके वर्षे जगले आनंदात..‌. मग मी का नको जगू!
घोडा नाकाने शिंकरतो. मी एक तुच्छ कटाक्ष टाकतो त्याच्याकडे आणि दुसऱ्या भिंतीकडे पाहू लागतो. माझ्या मन्याला राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं तेव्हाचा फोटो आहे. किती आनंदी दिसतोय तो!
माझ्या चेहऱ्यावरचं हसू अजून खुलतं. घरी आले की मी सगळ्यांशी बोलेन आणि नक्की ऐकतील माझं सर्वजण… काहीही पूर्वग्रह मनात न ठेवता.
मी विजयी मुद्रेने घोड्याकडे बघतो. तो आता थोडा अशक्त वाटू लागतो मला. हळूहळू घोडा धूसर होत नाहीसा होतो आणि मला गाढ आणि शांत झोप लागते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: