लव्ह बर्ड्स

प्राजक्ता रुद्रवार

आज सकाळपासुन तिसरयांदा सासुबाई म्हणाल्या होत्या, “पुर्वा ह्या लव्ह बर्ड जोडीतली ही मादी पिल्लं देत नाहिये तर दुसरी मादी तरी आणा…नुसती जोडीने सोबत रहाते पण कधी पिल्लं देणार देव जाणे…”

पुर्वाच्या डोळ्यात पाणी आलं असणार हे तिच्याकडे न पहाताच निखिलच्या लक्षात आलं होतं. आईला पण काय तो लव्ह बर्ड्सच्या पिल्लांमधे इतका इंट्रेस्ट आहे कोण जाणे असे स्वत:शीच तो पुटपुटत आत आला. पुर्वा किचनमधे काहीतरी बनवत होती. त्याने हळुच तिच्या खांद्यावर हात ठेवुन तिला जवळ घेतले. भाजी हलवतच ती त्याच्याकडे बघुन केविलवाणे हसली. कुठेतरी त्याच्या घशाशी आवंढा येऊन पाणावले.
ती पटकन म्हणाली, “ये पटकन फ्रेश होऊन..मस्त आमटी केली सोलाण्याची…तुझ्या आवडीची…”कसंबसं हसत त्याने मानेनेच हो म्हणले व काहीही न बोलता तो बेडरुमच्या दिशेने वळला.

जेवणं आटोपुन तिने आत येऊन बेडरुमचा दरवाजा बंद केला. निखिल लँपटाँप घेऊन काम करताना तिला दिसला. उगाच समोरासमोर आलो की तोच विषय निघेल म्हणुन त्याने लँपटाँप आँन करुन काहीतरी काम काढले होते.
“खुप काम आहे का आज?” तिने नेहमीप्रमाणे शांतपणे विचारले. त्याने हो म्हणताच ती झोपायला गेली. काही क्षणात तिला झोप लागली. तिचा तो झोपेतला निरागस चेहरा पाहुन क्षणभर त्याला स्वत:चीच लाज वाटली. आपण विषय टाळायला खोटं बोललो पण आपल्याशी नाही तर कोणाशी ही तरी व्यक्त होणार?

लग्न होऊन आठ वर्षे होऊन गेले,घरात पाळणा हलत नव्हता. देवाचे,डाँक्टरचे सगळे प्रयोग करुन झाले होते.पण बहुदा नशीबात नसावं. ह्या सर्वांचा तिला खुप त्रास होत असे. कोणी काही बोललं की तिच्या डोळ्यात पाणी येत असे. बरेच वर्ष असेच गेले. हळुहळु लोकांच्या त्या नजरा,त्या बोलण्याची तिला सवय झाली होती.

घरात चिवचिवाट सुरु असावा म्हणुन अशातच लव्ह बर्ड्स ची जोडी आणली होती. पुर्वा अतिशय मनापासुन त्यांना जपायची,त्यांचे सर्व करायची. पण ही जोडी आणताना त्या दुकानदाराने नेहमीसारखं सांगितलं होतं की, “ही पक्ष्यांची जोडी आहे.नक्कीच पिल्लं देतील….”
ते ऐकल्यापासुन आईने कधीपासुन विचारणं सुरु होतं की “कधी होतील ग बाई हिला पिल्लं…”

पुर्वाला कायमच हे खटकत असायचं. कोणीतरी तिला विचारलं होत की काय ग, गुड न्युज आहे का काही? तेव्हा काहीही न बोलता ती बेडरुम मधे येऊन खुप रडली होती. निखिलने जवळ घेऊन थोपटलं तसं ती बोलु लागली,”झाडं लावलं की फुल कधी येणार,फळ कधी येणार,नाही येत कधी कधी…असतात ना अपवाद. सतत का फळाची अपेक्षा करायची ?” तो काहीच बोलला नाही.
पुढे स्वत:शीच बोलल्यासारखं म्हणाली होती,”पण झाडं लावायचा उद्देशच हा असेल तर मग वाट पाहिलीच जाणार हेही तितकंच खरं आहे म्हणा…मादी आणि प्रजनन हे तर जणु लिहुनच ठेवलं आहे…मग अपवादांना कुठेही जागा शिल्लक नसते…”निखिल काहीही न बोलता तिला जवळ घेऊन गप्प उभा होता तशी ती शांत झाली होती.

हळु हळु तिलाही ह्या बोलण्याची सवय झाली होती.हे सर्व अपेक्षितच आहे असं तिलाही कळत होत. ही लव्ह बर्ड्सची जोडी आणल्यापासुन ती खुप खुष होती. घरात सतत चिवचिवाट असायचा. त्याचे ते प्रेम करणे पाहुन तिला खुप बरं वाटायचं.
“आपल्याच सारखी आहे ना ही जोडी निखिल…”ती नेहमी म्हणत असे. पण हळुहळु आईने पक्ष्यांना पिल्लु होत नाही म्हणुन म्हणायला सुरुवात केली तशी ती खुप नाराज होत असे. शेवटी हिच्याही कडुन अपेक्षाच तर, हे तिला खुप वाईट वाटत असे.

आज तर कहरच केला आहे आईने, ही पिल्लं देत नसेल तर दुसरी पक्षीण आणं म्हणलं. आता नक्कीच पुर्वाच्या मनात विचारांचा काहुर निर्माण झाला असेल,  असं म्हणत त्याने झोपलेल्या तिच्या केसांवरुन हात फिरवला. रडुन झोपलेल्या तिला त्याचा स्पर्श जाणवला नसावा. तिच्याकडे पहात तो बोलु लागला,”तु काय माझ्या पिल्ल्या कमी गोड आहेस का… आजही ह्याच विषयावर बोलुन तुला त्रास झाला असता म्हणुन फक्त संवाद टाळलाय रे राजा…”म्हणत स्वत:चे डोळे पुसले व लाईट बंद करुन तोही झोपला.

रात्री उशीरा झोपल्यामुळे आज सकाळी त्याला लवकर जागच नाही आली. पण पुर्वा त्याला गदागदा हलवुन उठवत होती,”उठ ना निखिल…चल लवकर बाहेर…” त्याने डोळे चुरचुरत तिच्याकडे पहात विचारले,”काय ग लहान मुलीसारखा गोंधळ घालत आहेस..झोपु पण देत नाहिस…”
त्याचे बोलणे तोडत ती त्याला हाँलमधे घेऊन आली. पिंजरयातल्या लव्हबर्ड्सच्या घरट्याकडे बोटु दाखवुन ती हळुच म्हणाली,”हळुच बघ…दोन पिल्लं झाली आहेत आपल्या बर्ड्सना…ती पक्षीण काही दिवसांपासुन  घरट्यात बसत होती तेव्हा बहुदा तिथे अंडी असावीत तिची…आज चिमुकल्या चोची पाहुन कळल पिल्लं झाली आहेत तिला.”
त्याने हळुच वाकुन पाहिले तर एकदम छोटे दोन चिमुकले जीव त्यालाही दिसले. तो ही एकदम आनंदी झाला.तेवढ्यात तिच्या सासुबाई काय झाल ग म्हणत आल्याच. तिने त्यांना पिल्लं दाखवलं तसं त्या पिल्लांकडे पाहुन खुष झाल्या.” मी म्हणतच होते बरं का…”असा काही तरी त्यांचा निखिलशी संवाद सुरु होता.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करत लव्ह बर्ड्सकडे पहात पुर्वा मात्र मनातल्या मनात म्हणत होती,”चला,आता तु तरी ह्या जगाच्या वांझोट्या नजरेतुन सुटलीस म्हणायची…खरंच अभिनंदन ग सखे तुझे…”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: