प्रसंगावधान

प्रदीप गांधलीकर

त्यावेळी मी नुकताच महाविद्यालयात जाऊ लागलो होतो. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण खेड्यात पार पडले; आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावर मी अकरावीत तालुक्याच्या गावी अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेतला. घरात बरीच वर्षे मी एकटाच असल्याने लाडाकोडात वाढलो होतो. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर होता. शेती तशी जेमतेमच होती. प्रसंगी वडील काबाडकष्ट करीत; परंतु त्यांनी कधी मला परिस्थितीची झळ पोहचू दिली नाही. आपला मुलगा शिकतो आहे याचे आईवडलांना खूप अप्रूप वाटे. आतापर्यंत खेड्यात राहणारा, सदरा-पायजम्यात वावरणारा मी शहरात, महाविद्यालयात जाऊ लागल्यावर पॅन्ट-शर्टात वावरू लागलो. महाविद्यालयातील मुक्त, रंगबिरंगी वातावरणात हळूहळू रुळू लागलो.

मी आणि माझे महाविद्यालयीन सहाध्यायी एस.टी.ने अमळनेरला येत असू. बसस्थानक ते महाविद्यालय हे अंतर साधारणतः दोन-तीन किलोमीटर होते. आम्ही मित्र रमतगमत जात असू. त्या रस्त्यावरच वडिलांचे एक मोठे सावत्र बंधू भास्करराव यांचे बंगलीवजा टुमदार घर होते. भास्करराव हे निवृत्त माध्यमिक शिक्षक होते. सतत उत्साही दिसणाऱ्या भास्कररावांचे व्यक्तिमत्त्वही मोठे भारदस्त होते. महाविद्यालयात जातायेता त्यांच्या घराकडे अंगुलीनिर्देश करीत,

‘ते माझ्या काकांचं घर आहे!’
असे मोठ्या अभिमानाने मी मित्रांना सांगत असे. कधीकधी एखाद्या मित्राला घेऊन मी त्यांच्याकडे जाई.

एकदा आबाला घेऊन मी भास्कररावांकडे गेलो. भास्करराव व्हरांड्यातच उभे होते. मी आणि आंबा फाटक उघडून आत शिरलो. आम्हाला पाहताच,

“अरे राजू, ये ये!”

असं मोठ्याने म्हणत त्यांनी आमचं स्वागत केलं. त्यांच्यासह आम्ही त्यांच्या दिवाणखान्यात गेलो. आम्हाला बसायला सांगत,

“अगं कुमे, राजू आणि त्याचा मित्र आलाय. त्यांना काही खायला वगैरे आण…”

असं मोठ्या आवाजात त्यांनी काकूंना सांगितले. काकूंना हाका मारताना आपल्या मोठ्या मुलीच्या कुमुदच्या नावाने हाक मारायची त्यांची सवय होती. नंतर त्यांनी मित्राची जुजबी चौकशी केली आणि,

“यंदा तुम्ही शेतात काय पेरलंय?” असं मला विचारलं.

“कपाशी!” मी बेधडकपणे ठोकून दिलं. शेतीविषयी मला स्वारस्य नव्हतं आणि माहितीही नव्हती.

“तू स्वतः गेला होता का शेतात?” त्यांनी विचारले.

“हो!” मी मोठ्या आत्मविश्वासाने खोटं बोलत होतो.

“कधी गेला होता?” त्यांच्या चौकश्या संपत नव्हत्या.

“परवाच गेलो होतो!” मी पण माघार घेत नव्हतो.

“मग केवढी आहे आमची कपाशी?”

त्यांचं शेत आमच्या बांधाला लागून असल्याने त्यांनी विचारले.

“एवढी आहे!”

मी त्यांना हाताने आकार वगैरे दाखवून म्हणालो. आपण इतक्या सहजपणे खोटं बोलू शकतो, याचे मला मनोमन आश्चर्य वाटत होते. दरम्यान काकूंनी खायला आणले होते. ते खाण्यास आबाने आणि मी सुरवात केली होती.

“पण यंदा तर मी कपाशी पेरलीच नव्हती!”

माझ्याकडे रोखून पाहत ते शांतपणे म्हणाले. ते ऐकल्याबरोबरच मला जोराचा ठसका लागला; आणि मी चांगलाच गांगरून गेलो. आबासुद्धा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता.

“मी तुमच्या नाही माझ्या शेतातल्या कपाशीचं सांगत होतो…”

मी चाचरत म्हणालो; आणि आपल्यालासुद्धा प्रसंगावधान राखून वेळ मारून नेता येते, याचा नवाच साक्षात्कार मला झाला होता.

“तुझ्या शेतातली कपाशी तू काय मला देणार आहेस का?” असं मोठ्याने हसत मिस्कीलपणे भास्करराव मला म्हणाले.

त्यानंतर तिथे अधिक वेळ न थांबता आबाबरोबर मी काढता पाय घेतला. बाहेर आल्यावर आबाने,

‘तू थापा मारून वर सावरासावर करायला चांगलाच पटाईत झाला आहेस!’

असं म्हणून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. मी स्वतःसुद्धा आपल्या प्रसंगावधानावर भलताच खूश झालो होतो.

संध्याकाळी मी वडिलांना,

“आपली कपाशी कशी आहे?”

असे मोठ्या उत्सुकतेने विचारल्यावर एखाद्या अजाण बालकांची कीव करावी अशा नजरेने आणि आवाजात,

“अरे, आपण यंदा कपाशी पेरली नाही”

असे त्यांनी सांगितले. यावर खरं म्हणजे खजील होत मी गप्प बसणे जास्त शहाणपणाचे होते; परंतु मती कुंठित झाल्याप्रमाणे मी वडिलांना पुढे विचारले,

“मग यंदा भास्कररावांनी काय पेरलंय?”

“कपाशी!” वडिलांनी उत्तर दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: