गाठभेट

बबन पोतदार

गेली आडीच तीन म्हैस हातरुन धरलेल्या शांताबाईचं आज काय खरं नव्हतं. सकाळचं धा वाजल्यापास्नं घशाला घरघर लागली होती. बुबळ आतल्या आत सैरभैर धावत हती. उशापायथ्याला तिच्या तिन्ही लेकी बसून हुत्या.

तिगींचंबी डोळे रडून रडून सुजून गेलतं.

“आईऽऽ ए5ऽ आईऽss’ सखूनं, थोरलीनं तिचं कपाळ कुरवाळीत दोनचार येळा हाळ्या मारल्या.

बुबुळ नुस्तीच हालत न्हाई. हैं न्हाई का चूं न्हाई. शांताबाई ठिवल्याली खोली आन् भाईरची पडवी तुडुंब भरल्याली.

“कसं हाय आता?” कुनीतरी इचारलं आन् आण्णा पाटलानं नुसतीच वाकडी तिकडी मान हलवली.

“काय खरं न्हाय बगा. थोरल्यासाठी तग धरून नुसता. आण्णा व्हटातल्या व्हटातच पुटपुटला.

“कवाशी कळवलया थोरल्याला?” मगाच्याच म्हातारीचा म्होरला प्रश्न.

“घरघर सुरू झाली तवाच फोन करून आलाय बाळू” आण्णांनी म्होरची म्हाईती पुरवली.

माणसाचा सपाटा सुरूच हुता. बापई माणसं एक-एक करीत खोलीत डोकावून जात हती. खाटवरच्या शांताबाई बगून वल्या पापण्यानं भाईर पडत हुती. आत बसलेल्या बायाबापड्या डोळ्यावरनं पदराचा बोळा फिरवीत मुक्यानंच बसून हुत्या.

पोस्टमनच्या घराची रयाच पालटून गेली हुती. “आई, उगड की गं डोळं.

वाईच बोल की आमच्या संगटं! डोळ भरून बगून तर घे-‘ मुसमुसत धाकली बोलली.

आई गप्पच!

धाकलीनं मग गळा काढला. आण्णा पाटील लगबगीनं आत आला.

धाकलीला त्यानं जवळ घेतलं. तिची समजूत काडता काडता त्याला नाकी नऊ आले, “उग गप गं बाई माजे, आता निसतं डोळ्यांनी बगायचं समदं!

तिचं ठेसान येवून ठेपलंया. सुखानं जावू देत माऊलीला!” बोलता बोलता त्याच्याबी डोळ्यात पाण्याचा तो तयार झाला.

त्येवड्यात दिंडीतनं बाळू आत आला. धाकलीनं त्याच्या गळ्यात मान टाकली आन् ती मुसमुसून रडायला लागली.

“काय म्हणाला दादा? कवासा येतुया?” मधलीनं इचारलं.

“लगुलग निगतो म्हनाला” बाळूनं सांगितलं.

“मजी किती वाजता? तिनंच पुन्ना इचारलं.

“निगाला आसल आकरा-साडे आकराला. याला पायजेल एवढ्यांत.” बाळूच्या आवाजाचा वेध घेत शांताबाई बुबुळं हलवली. तिला बगून बाळूच्या डोळ्यात तळं तयार झालं. धराण फुटल्यावाणी डोळ गळायला लागलं

आण्णा पाटील आता निव्वळ येरबाडून गेला. ‘पोस्टमनला संबाळू का धाकलीला समजावू’ त्याचं त्यालाच कळंनासं झालं. भिताडाचा आधार घेत त्यानं दोगास्नीबी कुशीत घेतलं.

“येडं का खुळं रं तुमी? रग्गड सेवा केलीय तुमी आईची. आता आशा वक्ताला धीर सोडायचा न्हाय म्हणतो मी. आन् मला सांग, तूच आसा धीर सोडलास तर ह्या तीन भनींनी कुनाच्या तोंडाकडं बगायचं रं? आसं डोळं गाळू नगासा माज्या लेकरानू! नगा, नगा रडू! खरं मजी शांताबाईच्या जलमाचं सोनं झालंया, आता जावूद्या सुखानं तिला.” आण्णांच्या मुखातनं देवच बोलला खराखुरा. खरंच शांताबाई जलमाचं सोनं करून दावलं हतं.

पोटाला पाच लेकरं. थोरला जलमला आन् मायलेक दोगंबी वरीसभर हातरून धरून पडले. आयुष्याची दोरी बळकट म्हणूनच वाचले. शांताबाई तर मरणाच्या दारातनं मागारी आली. म्होरं पोटाला आजुनि चार जलमाला आली.

नवरा साळंत मास्तर हुता. चौथीपातुरची एक शिक्षकी शाळा. उलीसा पगार, उदम्यांच घर. ना जमीन, ना जुमला, शेत ना भात! दुसरं काय बी.

सादन न्हाई. पोटाला एक सोडून पाच पोरांचा लोडणा. काय करावं? कुटं जावावं? थोरला वाईच कळता झाला आन् माऊली कष्टाचा डोंगर उपसत हाईली. कामाची कसली आलीया लाज? रोजावर शेतात भांगलणीला जायाचं सुगीत भुईमुगाच्या शेंगा तोडायला जायाचं. जुंदळा खुडायला जायाचं. एक वाटा शेंगा मिळायच्या, जोंधळ्याची कणसं मिळायची, एक-एक दिवस ढकलत व्हायचं.

थोरल्याला कष्टाची सवय आपोआपच लागली. कळता सवरता झाल्यावर त्याचीबी मदत होयाला लागली.

पाटंच्या पाचच्या ठोक्याला माय लेकराला उठवायची. गावात एक बेकरी हती. ततनं माल घ्याचा. आन पोरगं “ताजं पाव बटरऽऽ” करीत गावातनं फेरी मारून याचं. सकाळी सकाळी रुपया बारा आण्याचा खुर्दा सुटायचा.

बाजारादिवशी सकाळची शाळा सुटल्यावर पोरगं रसिकलाल गुजराच्या किराणा दुकानात जायाचं. दिवसभर उनातानात कष्ट करायचं. लेकराला किराणा मालाची, धनधान्याची पोती उचलाय लागायची. दिवसभराच्या कष्टानं जीव आंबून जायाचा. हिशोब झाल्यावर रांची घरला यायाचं. आईम्होरं दिसभराच्या मजुरीचं पैसं वंजळीत धरून उभं न्हायचं. शांती त्याला पोटाशी घ्याची. मटामटा मुकं घ्याची. त्याच्या घट्ट पडलेल्या तळहाताला वाईच गोडेतेल चोळीत बसायची.

त्याचे तळहात आपल्या हातात घिवून आपलं कपाळ आन् गालफाडं कुरवाळीत बघायची. डोळ्यातलं पानी पापण्यांच्या वळचणीतनं धुव्वाधार वहायला लागायचं

एकाएकी तिच्यातील माऊली डोलायला लागायची. डोलता डोलता बोलायला लागायची.

“माज्या काळजाच्या तुकड्या, म्होरं ह्येच कष्ट उपेगी पडनार हायती बरं!

कष्टानं मानूस लई मोठा हुतो. दिस काय आसंच हानार न्हाईत. मोट्टा हो.

शाळा शिक. शिकून झालं मंजी चांगली नोकरी लागल सोनुल्याला माज्या!

तुझ्या ह्या घट्ट पडल्याल्या हातातनंच सोन्याचं दिस दिसत्याल बग मला. लई लई मोट्टा हो.”

अन्न खरंच शांतीनं मनात येवजल्यावानी समदं समदं झालं उनापावसाचं. थंडीवायचं दिवस आनवानी पायाखाली तुडवीत पोरानं कष्ट उपसले. पाव आन् बटर इकतानाची पायपीट सौताच्या आन् चारी भावंडाच्या साळंला कारनी लागली. बाजाराच्या दिवसाचं कष्ट शांतीच्या संसाराला उपेगी आहे अंगभर धूत कपडा मिळाला. रोजची वडातान जराशीसैल झाली. सणसुद करता आलं

जमिनीवरनं ढगाची सावली तरातरा पळावी तो दिस आन् राती पळाल्या त्या दिशी सणाचाच वार हुता.

शांतीनं वाईच पुरण घातलं होतं. डाळीचं पीट भिजवून ठिवलं. कुरडया पापड्याच्या तळणाचा घाणा काडला. ‘भैरोबाची निवद दिवून ये आन् समदी जेवायला बसा.’ थोरल्याला तिनं सांगितलं.

थोरला निवद दिवून आला. येताना गावातल्या पोस्टमननं त्येच्या नावानं आल्याला सरकारी लखोटा दिला हुता.

“काय हाय रं हातात? आल्या आल्या शांतीनं त्याला इचारलं.

“दम वाईच. आत तर येऊ दे.” थोरला बोलला.

निवद दिवून आल्यालं ताट त्यानं भुईवर ठिवलं आन् पोस्टमननं दिल्यालं पाकीट जपून फाडीत त्यो समोरच भिंतीच्या कडला बसला. आतला कागुद त्यानं दुई बाजुनी एक येळ न्याहळला. एक एक ओळ मग त्यानं मनातल्या मनातच एक दमात वाचून काडली. शांती आन् चारी भावंडं बाजूलाच बसून थोरल्याच्या डोळ्याकडं टकामका बगत हती. समद्यांच्या नजरा त्येच्यावर रुतल्याल्या.

‘काय हाय रं? कुनाकडनं आलंय पाकीट?” व्हटाचा चंबू करीत शांतीनच पुन्ना म्होरं इचारलं.

आन् तो कागुद तिच्या पायावर ठिवत थोरल्यानं तिला दंडवत घातला.

डोळं आनंदानं डबडबून गेलतं. “आई, नोकरीची आर्डर हाय माज्या. सरकारी नोकरी मिळाल्या मला. पगार बी झँक हाय बग. तकडं पुन्याला नेमणूक झालीया.

चार म्हैन्यामागं मी कोल्हापूरला परीक्षा देवून आलो हुतो न्हवं? पास झालुया मी आई. आता कामावरती रुजू ह्याला सांगितलंया.” त्याच्या डोळ्यातनं वळीव पाझरत हुता.

कडकडीत उनानं तापलेल्या धरणीवरती वळवाचा पाऊस चांगला तासभर कोसळावा तशी शांतीची अवस्था झाली. उर अभिमानानं भरून आला.

“आंबाबाई पावली बग आपल्याला. तिचाच हात हाय डोस्क्यावरती.” त्याला उठवीत कुशीत घेत ती बोलली. “का पासून जायाचं हाय कामावर?” त्याच्या कपाळावर हात फिरवीत तिनं म्होरं इचारलं,

“सोम्मारी,” त्यानं सांगितले, आणि ती पार येरबाडून गेली.

‘सोम्मार ? मजी चारच दिस की मदी.” उजव्या हाताचा अंगठा, करंगळीपास्नं चारी बोटांना लावीत व्हटातल्या व्हटातच ती पुटपुटली.

“आता बसून न्हाय भागायचं.” आसं कायतरी म्हणत। जागची हालली. लिंबावरच्या खारुटीवानी तिची तारांबळ सुरू झाली.

हातातील काम झपाट्यानं उरकून ती उठली. आन् लगालगा भाईर रस्त्यावर आली, गावातल्या भैरोबाच्या देवळात जावून तशीच ती म्होरं बनपुरीतल्या आंबाबाईची वटी भरून आली. काळीज सुपाएवढे झालं.

म्होरचं तिनी दिस मग तिच्या हातापायांना दम न्हवता. त्याचे कपडे तीनं नीटनेटके धुवून ठिवले. तिकडे गेल्यावर चार-आठ दिवस पुरल एवडं गोडधोड करून ठिवलं. वाटेचं तान लाडू, भूक लाडू करून ठिवलं. घरातली एकुलती एक लोखंडी बॅग साफसूफ केली. आल्या गेल्या परत्येकाला, “आपल्या लेकाला सरकारी नोकरी लागली’ हे सांगण्यात तीन दिवस कसं संपलं, पत्याच लागला न्हाय.

ऐतवारी सकाळी शांतीचं आख्खं घर कोंबडा आरवायच्या आगुदरच उठून बसलं. सकाळी सकाळीच थोरला निगणार हता. सामानाची लोखंडी पेटी घेवून समदेच मोठ्या रस्त्याला आले. पुन्याला जायाला फाट्यावरनं एकच एस.टी. व्हती. गावापास्नं धा-बारा कोसावरच्या तालुक्याच्या ठिकानावरनं ती सक्काळी आटला सुटायची. नवाच्या आसपास फाट्यावर याची.

थोरला, चारी भावंडं आन् शांती गाडीची वाट बगत रस्त्याच्या कडलाच थांबले होते.

अन् एकाएकी शांती सैरभैर झाली. येडीपिशी झाली. पापण्या कापूस झाल्या.

“आता माजं लेकरू उद्यापास्नं कसं करील? कुटं हाईल? काय खाईल?

कसं झोपंल?” आसल्या एक ना दोन, सतराशे प्रश्नांच्या भेंडोळ्यांच्या भवऱ्यात ती गटांगळ्या खायला लागली. वावटळीवानी तिचं काळीज उडायला लागलं. एकाएकी ती उठली. आन् थोरल्याचं मस्तक कुरवाळीत त्याला सांगाय लागली, “नीट हा तकडं. दोन-तीन दिसामागं एक कागुद धाडीत जा. ख्याली खुशाली कळवीत जा. तकडं शेरगावात कुनी कुनाचं नसतंया. आपली आपुन काळजी घ्याची. हिकडचा घोर लावून घ्याचा न्हाय.” आजून कायबाय ती सांगत हायली. समजावत हायली. थोरला प्रत्येक शब्द काळजात साठवून ठिवला हुता.

“व्हय, व्हय” करून मुंडकं घालत होता.

एवड्यात वरल्या आंगानं फुफाटा उडवीत एस.टी. येताना दिसली. बगता बगता फुड्यात येवून ठेपली.

कंडक्टरनं दार उगडलं. थोरल्यानं पेटी आत सरकवली. आईच्या पायावर पुन्ना एकदा माथा टेकवला. पायधूळ कपाळाला लावली आन् तो आत गेला.

दरवाजा बंद झाला. फुफाटा उडवीत गाडीनं वेग घेतला. शांतीचं डोळं घळाघळा गळायला लागलं. हत्तीच्या पावसावानी डोळ्यास्नी धारा लागल्या. गाडी दिसेनाशी हुईपातुर ती वरती धरल्याला उजवा तळवा हालवत नहाईले. मगाशी कापूस झाल्याल्या पापण्या आता शिसं झाल्या हुत्या. धाकलीला कडेवर उचलून घेत बाकी तीन लेकरास्नी घिवून तिनं घराचा रस्ता धरला.

समदं घर सुनं सुनं वाटाय लागलं. बिथरलेल्या हरणावानी आवस्ता झाली हुती.

दिवसामागनं दिवस जात हाईलं. घराचा कायापालट झाला. आठवड्याला दोन टपालं आन् म्हईना संपल्याबराबर बऱ्यापैकी पैसं येत हाईला. तीन पोरींची लग्नं, त्याच्या शाळा, समदं मनाजोगं झालं. मधलाबी पोस्टात चिकटला. आगुदर थैल्या आनायचं-न्यायचं काम मिळालं. म्होरं पोस्टमन झाला.

“सोन्याचा दिस म्हनायचं त्ये ह्येच,’ शांती म्हणायची.

बगता बगता दिस जात हुते. शांतीच्या आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली. देवाची करणी आन् नारळात पाणी! दुसरं काय? त्यानंच जलमाला घातलं. चांगलं दिस दावलं. आपून समद्या कठपुतळी भावल्या. दोरी त्याच्याच हातात. आपून निसतं नाचायाचं. आला दिस पदरात पाडून घ्याचा!

त्या दिवसाची सकाळ अपशकुनी वावटळीवानी आली. शांतीनं झोपतच हातपाय वाकडं केलं. अर्धांग वायू का काय म्हनत्यात त्यो ह्योच, निम्म्या आंगातलं समदं बळच गेलं. एक बाजू लुळी पडली. जवळ फकस्त धाकली होती. शेजारी पाजारी धावून आलं. लगुलग दवाखाना दावला. बाळूच्या नोकरीचं ठिकान बदलल्यालं. ‘आईला आशानं आसं झालंय.’ कळल्यावर वाऱ्यावानी पळत आला. दादाला कळवलं, त्योबी आला. रग्गड उपचार झालं. औशिद झाली. झाडपाला झाला. पन कशाचं काय! कायाच साथ दिनाशी झाली.

मोठ्या डाक्टरानी घरी घिवून जायाला सांगितलं. घरीच सेवा करा म्हनाले.

तसल्याच आवस्थेत बाळनं घरी आनलं. सेवा चाल झाली. कसाबसा दीड म्हईना गेला. मदनं मदनं लेकी येवून जायच्या. थोरला येवून जायचा. बाळू सेवा करायचा. हवं नको ते बघायचा.
काल वाईच जास्तीच झालं. पोटात पानी बी ठरना. शांतीनं औशिद सोडून दिलं. तिनी लेकी धावल्या. आईभवती जमा झाल्या.

सकाळी एकदमच घशातनं घरघर याला लागली. डाक्टर आलं. समद्यास्नी बोलवून घ्या म्हनलं.

थोरल्याला फोन झाला. पोस्टमनचं घर कासावीस झालं. माणसानी गच्च भरलं. आण्णा पाटील सैरभैर झाला. कुणालाच काय सुचनासं झालं.

शांती निव्वळ थोरल्याची वाट बगत हती. समदा जीव कुडीत जमा झाला हता. घशाशी धडका मारीत हता. बुबुळं आतल्या आत हालत हुती. लव्हाराच्या भात्यावानी छाती वरखाली होत होती. तिनी पोरी आईच्या जिवाची घालमेल वल्यागार पापन्यानी बगत हुत्या.

आन् भाईर गलका झाला, “आला, थोरला आला.” कोनतरी म्हणालं.

कापऱ्या पावलानं थोरला पळतच आत गेला. आपल्यासाठी तिळातिळानं झिजलेल्या माऊलीला बगून त्याला भडभडून आलं. आभाळ फुटल्यावानी डोळे व्हायला लागलं.

“आलास दादा? आई कवाधरनं वाट बगतीया रं!” धाकली बोलली.

“दादा, दोन चमचं पानी तरी घाल तिच्या मुखात.” बाळूनं पान्याची वाटी आन् चमचा थोरल्याच्या हातात देत सांगितलं.

थरथरत्या बोटानी वाटी हातात घेत थोरल्यानं आईकडं बगितलं. गप्पगार डोळ्यातली बुबुळ भिरभिरली. व्हट उलीस हालले.

“आई, डोळे उगड की गं. मी मी आलुया गं आई.” तो बोलला. आन् कुटनं कुणान् ठावं, शांतीच्या अंगात उलीसं बळ आलं. मघापास्नं निपचिप पडल्याला आपला चेहरा तिनं मोठ्या कष्टानं आदबार फिरवला. पापण्या तरातरा हालल्या. दोनी बुबुळं लुकलुकली. कायतरी हुडकायला लागली. थोरल्याच्या डोळ्यावरती जावून थांबली. व्हट कायतरी पुटपुटायला लागले. आपला एक शाबूत हात कसाबसा हालवीत त्याच्याकडं बगत शांतीनं मान हलवली.

त्यो उशाला बसला. हात हातात घिवून त्यानं तिच्या डोळ्यात बगितलं.

दुसऱ्या हाताची बोटं आईच्या केसातनं फिरायला लागली.

आतल्या आत शांती कायतरी बोलत हुती. व्हट नुसतेच हालत हुते. काय म्हन्तीया ते कायसुदीक कळत न्हवतं.

“आईऽ” त्यानं हाक मारली.

तिनं इवलीशीच मान हालवली. चिमणीवानी! त्याचे डोळे पुन्ना गळायला लागले. वड्याला महापूर आल्यागत पापण्यांची आवस्ता झाली. पोटच्या गोळ्याला डोळे भरून साठवत शांतीने हळूहळू पापण्या मिटून घेतल्या. आतली बुबुळं इसावा घ्याला लागली. हालायची थांबली. हळूहळू घशातली घरघरबी कमी कमी हुयाला लागली. आवाज बारीक बारीक त्याला लागला.

“आईला बरं वाटतंया जनू!” त्यानं बाळूला सांगितलं.

“सकाळी लईच घाबरं केलतं आमा समद्यास्नी.” मधली म्हनाली. “आता तू आल्यावर बग उतार पडत चाललाय थोडा थोडा.” तीच म्होरं बोलली.

“बरं झालं टाकोटाक आलास ते.” धाकली म्हनाली.

“ल्योक दिसला आन् दुकनं पळाला. दुसरं काय न्हाय!” आण्णा पाटील बसल्या जागंवरनच बोलला. “आता पडू द्या तिला. आत्ता फरक पडतुया का न्हाय बगा? आईची मायाच आशी आसतीया.” थोरल्याकडं बगत म्होरं अण्णा म्हणाला.

शांतीच्या उशाला ठिवल्याल्या आंबाबाईच्या फोटूम्होरं हात जोडून थोरला उभा हाईला. तिच्या आंगावरचं पांगरून त्यानं ऐसपैस साफ केलं. तिचा चेहरा आता चांगला दिसायला लागला होता. निसतेज कपाळावर वाईच रया आल्याजोगं वाटत होतं.

“मी हाय आईजवळ. तू घे च्या बी. दमनूक झाली आसंल तुजी.”

धाकलीनं आसं म्हनल्यावर थोरला भाईर आला.

भाईरच्या पायरीवर बसत त्यानं भिताडाचा आधार घेतला. “आता वाटल बरं आईला,” बाळूच्या डोळ्यात बगत तो पुटपुटला.

पडवीतली गर्दी कमी व्हायला लागली.

“चांगलं बरं वाटू दे रं माऊलीला.” बायाबापड्या उटता उटता पुटपुटत होत्या.

“आता जावू नगंस आईला बरं वाटल्याबिगर.” कुनीतरी थोरल्याच्या खांद्यावरती हात ठिवून म्हणाले,

“न्हाय जात.” थोरला डोळे पुशीत बोलला.

पाचेक मिनिटं अशीच गेली. दिस आस्ताला जावून घटकाभर झाला आसंल.

गुरंढोरं घराकडं परतायला लागली हुती. थंडीनं आपलं हातपाय पसरायला सुरुवात केली हुती. आभाळात एक एक चान्नी पेरापेरानं भरायला लागली होती.

थोरला पायरीवरच गुडग्यात मान खुपसून बसला हुता. आन् शांतीच्या उशाशी बसलेल्या धाकलीनं हंबरडा फोडला, “आई गं'” आईला साद घालीत ती वरडायला लागली. हमसून हमसून रडायला लागली. धडपडून थोरला उटला. आतमधी धावला.

आण्णा पाटलानं शांतीच्या नाकान्होरं सूत धरलं आन् मोठ्या कष्टानं आपली लांबलचक मान दोनी दिशेला हलवली.

“गंगाजळ घाल आईच्या तोंडात.” थोरल्याला जवळ घेत आण्णानं सांगितलं.

चमच्यानं उलीसं गंगाजळ थोरल्यानं माऊलीच्या मुखात घातलं. आन् तिच्या पायाशी त्यानं लोळण घेतली. तवर भाईर गाव गोळा झालतं. तिगी लेकी आन् बाळू पोस्टमन उर बडवून रडाय लागले.

“थोरल्याची गाठभेट झाली?” एक म्हातारी कुनाला तरी इचारीत हुती.

“व्हय!” त्येच्याकर्ताच जीव गोळा करून ठिवला हुता माऊलीनं! त्यो आला तवाच जागवर परान ठिवला बगा! दुसरीनं म्हाईती पुरवली.

आन् ती शेवटची भेट नजरत साठवून ठेवीत थोरला धाय मोकलून रडायला लागला. म्होरची जुळणी करायला आण्णा पाटील भाईर रस्त्यावरती आला तवा उगवतीला चंद्राची कोर दिसायला लागली होती. शांताबाई आता लातूर तिच्या पल्याड पोचली होती.

आन् मावळतीला आभाळातनं एक चान्नी थेट खाली पातूर येताना दिसली.

दिसता दिसता मधेच ती गुडूप झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: