तानुल्या

महानंदा मोहिते

सोप्यात अडकवलेलं शिंग तानुल्या आपुलकीने बघायचा. या शिंगावर धन्याचा खूप जीव…”सर्जा”.. त्याच्यासाठी बैल नव्हता.. धन्याने पोटच्या मुलासारखं त्याला सांभाळलं होतं त्याचंच ते शिंग.. सर्जाची शेवटची आठवण म्हणून जपलेलं.
शिरप्या चा ‘श्रीपतराव ‘ बनवण्यात सर्जाचा मोलाचा वाटा होता. सर्जाची मेहनत तानुल्या जाणून होता. सर्जा ऐन तरण्या वयात गेला. धन्याला ही सल बोचून खात होती. सर्जा गेल्या नंतर श्रीपतला तानुल्याच्या रूपात त्याचा लाडका सर्जा सापडला होता. फार कौतुकात तानुल्याचा सांभाळ झाला होता. डौलदार शिंगं. भारदस्त बांधा. लोण्यासारख्या पांढरा रंग आणि अंगात हत्ती एवढं बळ असणारा तानुल्या गल्लीत सगळ्यांचाच प्रिय.
अलीकडच्या बऱ्याच रात्री तानुल्याने रवंथ केल्यासारख्या आठवणींमध्ये चघळल्या. रात्रंदिवस तानुल्या विचारात मग्न असायचा. धन्यानं पुढ्यात घातलेला चारा वेळीच संपवण्याचं भान सुध्दा त्याच्याकडे शिल्लक नव्हतं. सोप्यात अडकवलेल्या शिंगावरून त्याची नजर हटायची नाही.

आता तानुल्याच्या कातडीवर म्हातारपण चिटकलं होतं. नेटानं काम ओढण्याइतपत पूर्वीसारखं बळ आता उरलं नव्हतं. गोठ्यातली वसू, रेणू, बजाप्पा ही मंडळी तानुल्याला कधीच सोडून गेली होती. त्याचं एकटेपण त्याला आता छळत होतं. आपल्या लेकराला सौद्यासाठी ओढत नेताना पाहून वसू धाय मोकलून हंबरली. दोन दिवस चारा पाण्याला तिनं तोंड सुद्धा लावलं नव्हतं. तानुल्याने त्यावेळी वसूला फार आपुलकीने सावरलं होतं. आता तानुल्याची वेळ होती.

धनी तानुल्याला विकायला तयार नव्हता आणि त्याचा पोरगा धन्याचं ऐकायला तयार नव्हता. विशिष्ट वय गाठलं की आपण म्हणू तेच खरं करता येत नसतं. धन्याची अवस्था बघून तानुल्याला हे समजत होतं. आधुनिक म्हणवणाऱ्या जमान्यात घरातली माणसं खपत नाहीत तिथं मुकं जनावर खपण्याची आशा लावून बसणं मूर्खपणाचं होतं. मुद्दा गोठ्याचा नव्हता. इथून पुढं घरात जनावरच नको. शेतीला अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे घरात गोठा पण नको आणि जनावर पण नको. असं धन्याच्या लेकाचं म्हणणं होतं.

“एक तर तुमचा तानुल्या घरात राहील.. नाहीतर मी…” असं धन्याच्या पोरग्याने धन्याला ठणकावून सांगितलं होतं.

तानुल्यामुळे घरात महिनाभर धुसपूस सुरु होती. कुठं तरी हे सगळं थांबणं गरजेचं बनलं होतं. धनी हतबल झाला. शेवटी तानुल्याला विकायचाच ठरलं. त्या रात्री तानुल्याने सोप्यात अडकवलेल्या शिंगावरुन आपली नजर जरा सुद्धा हटवली नाही. धन्याची अवस्था पण बिकट होती. त्यालाही अन्नपाणी गोड लागत नव्हतं. पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेला तानुल्या बाजारात नेऊन विकायचा या कल्पनेनंच धनी गांगरला होता. ती रात्र दोघांनी विचार करण्यात घालवली. नजरे समोर भूतकाळातील अनेक चित्र येत होती. कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यात तानुल्याने उपसलेलं कष्ट आठवताच धनी हमसून हमसून रडला. तानुल्याला विकायचं म्हणजे त्याच्या उपकारांना विसरण्यासारखं होतं.

तानुल्या धन्याचा फार लाडका होता. त्याच्या खाण्यापिण्याची बडदास्त ठेवण्यात धन्यानं काही कमी केलं नव्हतं. आणि तानुल्याने सुद्धा राबायला हयगय केली नव्हती. आता धनी आणि तानुल्या दोघेपण म्हातारी झाली होती. धन्यानं भिंतीवरच्या घड्याळाकडं बघितलं. पहाटेचे चार वाजले होते. ही वेळ इथंच का थांबत नाही. असा विचार धन्याच्या मनात राहून राहून येत होता. मग त्याने कूस बदलून घड्याळाकडे पाठ केली आणि डोळे मिटले.
सकाळी तानुल्याला बाजारात न्यायचं होतं. दिवस उजाडताच धन्याच्या पोटात कालवलं. जिथं पूर्ण हयात गेली तो गोठा सोडताना तानुल्यालासुध्दा गहिवरून आलं. मालकिणीने त्याची आरती केली. ‘जा बाबा, सुखानं राहा’ म्हणत पदराने डोळे पुसत तिने माजघर गाठलं…
तानुल्याला विकायला नेणार हे कळल्यावर अख्खी गल्ली गोळा झाली होती. बाया माणसं आपापसात कुजबुजू लागली होती. धन्याने तानुल्याकडे डोळे भरून बघितलं.. त्याचे डोळे भरून आले. गोठा रिकामा झाला होता. तानुल्याच्या पाठीवर मायेने हात फिरवत धनी म्हणाला…” तानुल्या… या घरात तुझा एवढाच शेर होता… मला माफ कर बाबा..सुखानं राहा “
तानुल्याने धन्याच्या हातावर आपलं डोकं घासलं.. आणि कान हालवत शांत उभा राहिला. थोड्यावेळातच बाजाराच्या दिशेने त्याची रवानगी झाली.

बाजार आला. सगळी विकायला आणलेली जनावरं मोठमोठ्यानं हंबरत होती. हे हंबरणं काळीज चिरून टाकणारं होतं. अधे मधे हेडी ओरडत असलेला आवाज सुध्दा ऐकू यायचा. कशीबशी आपली पावलं जमिनीवर टेकवत तानुल्या बाजारातून चालला… आपण चालतोय इतकंच भान तानुल्याच्या मनाला होतं. आज बाजार होणार आपला… हेच त्याच्या डोक्यात घुमत होतं. धन्याच्या ओळखीचा एक हेडी होता. त्याच्या सोबत धन्यानं आधीच बोलणी करून ठेवली होती. धन्यानं तानुल्याला त्याच्या हवाली केलं आणि बाजूला उभा राहिला. हेडी चाणाक्ष होता. त्यानं तानुल्याकडे नीट पाहिलं. धन्याकडं पाहून म्हणाला.
“दिसाया मजबूत दिसतोय..पर लई म्हातारा हाय वो..ईकाय येळ केलासा..”

धनी त्याच्याकडे बघत म्हणाला, “ह्याच्याबरोबर मला कोण इकत घेतंय का बघ…मी बी म्हातारा झालोय”.

हेडयानं हसत हसत खिश्यातनं गायछापची पुडी काढली… ती धन्याच्या हातावर टेकवत म्हणाला…
” घ्या.. लई कटाळासा राव, जिंदगी हाय चालायचंच “
तोवर एक गिऱ्हाईक आलं…हेडयानं तिकडं लक्ष दिलं.. हेडी हुशार होता.. तानुल्याच्या पडलेल्या दाताच्या जागी त्यानं आपला अंगठ्याचं नख रुतवून बैल अजून ‘तरणा’च असल्याचं भासवलं. जवळपास दीड तास गिऱ्हाईका सोबत त्याची चर्चा सुरु होती.

‘दात शाबूत हायेत, अंगात बळ हाय’
असं सांगत त्यानं तीस हजाराला सौदा पक्का केला. धनी मात्र कासावीस झाला होता. ” तानुल्या मला पण येऊ दे रे तुझ्याबरोबर”.. असं हजार वेळा त्याचं मनातल्या मनात म्हणून झालं होतं. तो हताशपणे तानुल्याला एकसारखा पाहत होता.
मागून एक सारखा हंबरण्याचा आवाज कानावर पडत होता. ओळखीचा वाटत होता.. तानुल्याचे कान टवकारले. त्याने नजर तिरकी वळवली तर त्याला वसू दिसली. तिला बघताच तानुल्या उधळायला लागला. हेड्याने लागलीच दमदाटी करत त्याला ताळ्यावर आणलं. धनी म्हणाला…’ही वसू माझ्याच गोठ्यातली. तानुल्यानं तिला वळकलं असणार’

सौद्याचे पैसे नव्या मालकाकडून घेत भरल्या डोळ्याने धनी म्हणाला…
” नड हाय म्हणून इकायला लागलोय.. लेकरु हाय माझं, चांगलं सांभाळा.”

तानुल्याला मिठी मारून धनी जड पावलानं आपल्या रस्त्याला लागला. मागे परतून पाहण्याचं धाडस त्यानं केलं नाही. तानुल्याच्या आठवणींच्या संगतीत तो झपाझप पावले टाकत चालू लागला… नड असल्याचं सांगितलं खरं… पण हे काय तानुल्याला विकायचं कारण नाही.. या विचारानं तो अस्वस्थ झाला होता. डोक्यात वादळ घिरट्या घालत होतं… धनी गावच्या वेशीवर पोहोचतो न पोहोचतो.. तोच त्याला अचानक चक्कर आली.. शरीराचा तोल ढासळला आणि एका दगडावर त्याचं डोकं आपटलं.. वाट मिळेल तसं डोक्यातून रक्त वाहू लागलं.. धन्याला उचलायला आसपास कुणीही नव्हतं. त्याचा देह आभाळाच्या खाली रक्त बंबाळ अवस्थेत पडला होता. त्याची शुद्ध हरपत चालली होती.. धन्याची नजर धूसर होऊ लागली… त्याला आता डोळ्यासमोर तानुल्या दिसू लागला. सर्जा दिसू लागला.
अंगातलं सगळं बळ एकवटत त्यानं कशी बशी हाक मारली.
” तानुल्या…सर्जा…” हळू हळू धन्याने डोळे मिटले.. ते पुन्हा कधीही न उघडण्यासाठीच.
एव्हाना वसू ही खपली होती. नव्या मालकासोबत तानुल्या कसाबसा आला. नव्या गोठ्यात पाय टाकताना तानुल्याला पुन्हा गहिवरून आलं. आपल्या जुन्या धन्याचं घर त्याला आठवत होतं. माणसं अनोळखी वाटत होती. आजूबाजूची मंडळी गोठ्यात जागा होईना म्हणून तानुल्याला ढकलायचा प्रयत्न करत होती. त्यांच्याकडे तानुल्याने फारसं लक्ष दिलं नाही. धनी आपल्याला न्यायला येईल या आशेने तो रात्रभर उभ्यानेच जागत राहिला. धन्याच्या आठवणीने तो अस्वस्थ झाला होता.
दुसऱ्या दिवशी नव्या मालकानं त्याला तेल लावून चोळून अंघोळ घातली.. शिंगं रंगवली…पाठीवर झुल चढवली… अंगावर गेरूचे ठिपके देऊन सजवलं. नवी वेसण.. नवीन कासरा.. मारुतीच्या देवळाकडून ढोल ताशे वाजवत फिरवून आणलं. नव्या मालकिणीने ओवाळून पुरणपोळी खायला घातली. तानुल्याला थोडं बरं वाटलं… नवा धनी मायेचा वाटला. तानुल्याला बघायला गल्लीतली लहान पोर जमली होती… “शिंगं बघ… कसली भारी” असं कौतुक ऐकून तानुल्या सुखावला. तानुल्याचा पोळा खासमखास झाला. वसू भेटल्यामुळे त्याच्या मनावरची मरगळ थोडी झटकली गेली होती..
तानुल्याने ठरवलं… आता या नव्या धन्याकडे जीव तोडून राबायचं.. आपलं पण शिंग ठेवलं पाहिजे धन्याने.. एवढं.. राबायचं.
..शेवटी ज्याच्या हातात आपलं दावं असतं तोच आपला धनी… त्याचं ऐकायलाच हवं. असं तानुल्या स्वतःला समजवत होता पण त्याच्या मनाची चलबिचल काही केल्या थांबत नव्हती.. सगळीकडे त्याला त्याचा धनी दिसत होता.. तो कासावीस झाला… मोठमोठ्यानी ओरडू लागला… जोरजोरात शिंगं हालवत भिंतीवर आपटण्याच्या प्रयत्नात होता… त्याचा हा राग पाहून काही वेळा पूर्वी दमदाटी करू पाहणारी अन्य जनावरं काही क्षणांसाठी भीतीने गांगरली. तोवर नवा धनी आवाज ऐकून पळत आला….सकाळपासून सगळं ठीकठाक होतं.. अचानक काय झालं याला या विचाराने तो ही पुरता गोंधळून गेला..
तानुल्याने त्याचा आवाज ऐकला… आणि त्याच्याकडे बघितलं.. तो एका क्षणात शांत झाला… तानुल्याला नव्या धन्यात… त्याचा धनी दिसला… त्याच्याकडे एकटक बघत बघत तानुल्या खाली बसला.. बराचवेळ तो त्याला बघत राहिला..
पाठीवरून हात फिरवत फिरवत नवा धनी बोलायला तोंड उघडणार तोच.. तानुल्याने आपली मान खाली टाकली… अंग जमिनीवर धपकन कोसळलं.. डोळे लख्ख उघडे ठेवून… तानुल्या गेला… धन्याच्या वाटेनं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: