जग्गू बंबाळ

हिंमत पाटील

कृष्णाकाठची गावखेडी म्हणजे एकेकाळची वाडासंस्कृतीची माहेरघरे. काळाच्या ओघात सारे नष्ट झाले. गावपांढरीची पडझड झाली. आता गावंही मोठी झाली. लोकं वेशीबाहेर पांगली. गावगाडा बदलला. गावभाग ओस पडले. ढिगारमातीच्या झाडाझुडपांतून डोकावणारे जुने काही अवशेष सोडता, मोडकळीला आलेले चार-दोन वाडे कुठेतरी. बाकी सारी भयाणभूस खिंडारंच. भवताल सजून गावपांढरीलगतच नव्या वस्तींची नवी गावं झाली. बघून बघून गावालगतच्या शेतमळ्यांतून डौलदार इमारतीही झाल्या.
अशाच तोंडावळ्याचं कृष्णाकाठावरील एक गाव. गावाला नावापुरतीच वेस आहे. दोन्ही बाजूंचे पांढऱ्या मातीचे बुरुज ढासळून गेलेत. आतल्या बाजूला काही वाड्यांच्या केवळ उंच उंच धोकादायक दगडी भिंती दिसतात. समोरच्या डगरीवर जळीतात जळालेला गुजरवाडा. भिंतींना तडे गेलेला नि माणसांविना ओस पडलेला. खालच्या लवणात म्हातारा लिंब. लिंबाभोवती उखडलेला ऐसपैस पार. आणि मोकळ्या मैदानी, तिकाटण्यालगतचा ढासळून मुजत चाललेला कोरडाठक्क आड. जुन्या वैभवाची साक्ष देणारी ही गावपांढर.
वेशीतून लग्नाची वरात गावदेवाला जाते. नारळ फोडण्यापुरते आणि लिंबू कापून टाकण्यापुरतेच वेशीला महत्त्व आहे. वेशीबाहेरुन गावपांढरीला वेढा घालणारी हिरव्यागर्द शेंडांची पानंद. पांदिच्या तोंडाला लक्ष्मीचे मंदिर आहे. लागूनंच जग्गू बंबाळचा वाडा. वाडा म्हणजे चारी बाजूने केवळ डोईइतकी उंच भिंत. भिंतीच्या आत तसं काही नाही. एक कौलारू आणि एक पत्र्याची खोली आहे. बाकी सारे अंगण वजा मोकळे मैदान.
दरवाजाच्या तोंडाला भलामोठा उंच आडवा दगडी कठडा आहे. त्यावर छोट्या कमानीचं तायआईचं मंदिर. जग्गू बंबाळ तिथं नित्यनेमाने कोवळ्या उन्हात, भिंतीला पाठ लावून टेकून असतो. पायाच्या चौड्यावर उकिडवा बसून, तंबाखूची मिसरी घासत घासत रस्त्यावरील रहदारी उशीरपर्यंत न्याहाळत राहातो.
तो मिसरी सकाळी सकाळीच घासतो असंही नाही. त्याला हुक्की येईल तेंव्हा तेंव्हा तो घासत राहातो.
बंबाळ म्हणजे साठ-सत्तरीचा जख्खड म्हातारा. वाचा गेल्यागत सुतकी चेहऱ्यानं सदा मुग गिळून गप्प असणारा. घुगून बसणारा. येवढ्या-तेवढ्यावरून फुगून जाणारा. तोंडावरील एक रेषही तो हलवित नाही. क्वचित प्रसंगी बोलतो. तेही कामापुरतं. जोखून-माखून. मोजूनंच. येरवी त्याच्या तोंडावरील माशी उठत नाही.
उंचीनं ढांगूळा. रंगानं निबर काळा. डोईवर तुळतुळीत टक्कल. जाडजूड भुवया आणि तोंडावर भारदस्त छपरी मिश्या. कंबरेला मांड्यांपर्यंत अखूड धोतर. घट्ट काचा मारलेलं. उघड्या अंगावर गुंडीच्या बटणाची टिचभर खाकी बंडी. बंडीची बटणं कधी तो लावत नाही. त्यामुळे उघडा-बोडका नि अगडबंब वाटणारा हा ढेरपोट्या म्हातारा, पाहाणाऱ्याला मोठा राकट आणि रांगडा वाटतो. त्याचं हे ध्यान बघूनंच त्याला बंबाळ हे नांव पडलं असावं.
जग्गू व्यवसायाने कैकाडी. गावात त्याचं एकच घर. कुठूनतरी लांबून, फिरत फिरत ते इथं येऊन वसलं असावं. किंवा गांवानं आपल्या सोईसाठी ते वसवलं असावं.
तो शिबडी, बुट्ट्या, दुरड्या, डालपाट्या, सुपं बनवायचा. हारं, टोपल्या, खुरुडी, कणग्या मागणीनुसार करुन द्यायचा. साऱ्या पंचक्रोशीत हा एकटाच. त्यामुळे या कामी सगळीकडे त्याचाच बोलबाला.
आसपासची गावं अगदी जवळ-जवळ. कोस-दिड कोसांवर वसलेली. त्यात माझ्या गावाला हे गाव, निम्म्याला निम्मं पाहुण्यारावळ्यांचं. लहानपणापासूनच माझं या गांवाशी अतुट नातं. सुट्टीचे बरेच दिवस मी इथं घालवलेत. त्यामुळे जग्गू माझ्या ओळखीचा. त्याला पाहात पाहातच मी लहानाचा मोठा झालो.
माझ्या धाकट्या बहिणीचे लग्न होते. बऱ्याच वर्षांनी घरात हे पहिलेच शुभकार्य. न्याहारी-रुकवताला सुप, दुरडी, बुट्ट्या हव्या होत्या. पुढं बुत्तीलाही शिबडी, करंड्या लागणार. ते सारं साहित्य आणायचं होतं.
उन खाली करुन मित्रांना घेऊन ते साहित्य आणायला मी जग्गूकडे निघालो. तसा बऱ्याच वर्षांनी मी जग्गूकडे चाललो होतो. दोन कोसांचा रस्ता मोटरसायकलमुळं लवकर वसरला.
जग्गूच्या वाड्यात गेलो. तो कबूतरांना दाणे टाकण्यात गुंग होता. त्याच्या भोवती न्हानग्या लेकरांचा गोंगाट सुरु होता. पोरं प-पळून पाखरांमागून पळून खेळत होती. दोन्ही हात पसरून कबुतरांना ओंजळीत पकडत होती. समोरच्या दगडी कठड्यावर चढून ती उंच हवेत भिरकावत होती.
माझ्यासाठी हे दृश्य नवीन होतं. मनात म्हणालो ‘याने आणखी कधीपासून कबूतरं पाळायला सुरुवात केली.’
त्याने आमच्याकडे बघून न बघीतल्यागत केलं. मला वाटलं तो “या” म्हणेल. “काय काम काढलं” म्हणून विचारेल. पण, यातलं काहीच नाही.
त्याचं हातातलं काम उरकल्यावर तरी बोलेल असं वाटलं. पण, तरीही नाही. तो आपल्याच नादात.
यावेळी माझ्या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही तो मग्रूर, बेरकी आणि माजोरा गरीब वाटला असता. पण, तसा तो नव्हता.
त्याचा नूर बघून मीच त्याला म्हणालो, “बहिणीचं लग्न आहे. लग्नाचं साहित्य हवंय.” त्यावर तो म्हणाला, “दोन दिसानं दिलं तर चालंल का?”
“असेल तर लागलीच दिलं तर बरं होईल.”
“न्हाय वो. आता आसलं सामान करायचं बंद केलंय.”
“कधीपासून?”
“गुदस्तापास्नं.”
“का?”
“न्हाय परवडत. कष्टाच्या मानानं न्हाय मजूरी मिळंत. उधारीला गिर्‍हाईकांची जिकिरीबी दांडगी आसती. आता प्लॅस्टिकच्या वस्तू मिळाय लागल्या. दारावरनी टेंपों भ-भरुन ईकायलाबी याला लागलं. कसं करायचं तुम्हीच सांगा. आसं लग्नाबिग्नाचं तेवढंच बाह्यरनं आनून ईकतो झालं.”
“आणि हा कबूतरखाना कधीपासून केला म्हणायचा?”
” औंदाच्या शिमग्याला दोन सालं होत्याल की. ह्यो आपला उगी छोंद म्हणून. आधी कोंबड्या पाळून बघीतल्या. डुकरं पाळली. बदकंबी पाळली. पर, कबूतरात बाकी चांगला जीव रमतूया बघा.”
जग्गूला देवंस्थानची शेती होती. अगदी जाण्या-येण्याच्या सडकेवर. त्याला वाजंत्र्याचा माळ म्हंटला जाई. जाता-येताना कधी कधी तो तिथं उन्हातान्हात राबताना दिसे. शेतीमातीत काबाडकष्ट करत हा छंद तो जोपासत होता हे विशेषच.
गांवदेवाची सेवा करणाऱ्या गावातल्या सगळ्या वाजंत्र्याना मिळून, एका तळाला जमिनीचे काही डाग इनाम मिळालेले. तोच हा वाजंत्र्यांचा माळ. त्या शेतीवर त्यांची गुजरान चाले. सातबाऱ्यावर नावं नसल्यानं, अलीकडे ग्रामपंचायतीने ती त्यांच्या ताब्यातून काढून, त्यांनाच वाट्यानं कसायला दिलेली. त्यात त्याचं भागत नसावं. त्यामुळे त्याला असा एखादा जोडधंदा करावा असं वाटलं असावं.
गांवी जेंव्हा जेंव्हा गावदेवांचे कार्यक्रम असंत, तेंव्हा तेंव्हा ही वाजंत्रीमंडळी एकत्र येऊन आपआपली कला सादर करंत. जग्गू त्यात पिपाणी वाजवत असे. जत्रा-खेत्रा असो, शिखरं पाजळायची असोत, नाहितर भावईच्या सणाला दिवा काढून पाऊस-पाणी बघायचं असो. मोठ्या भक्तिभावाने तल्लीन होऊन तो देवाची सेवा करंत राही.
लग्नाच्या सामानाची यादी आणि इसारत रक्कम मी जग्गूच्या हातावर ठेवली. “दोन दिवसांनी साहित्य न्यायला येतो”, असं सांगून मी तिथून उठलो.
मला बालपण आठवून गेलं. जग्गूचा वावर माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागला. सुगीच्या दिवसात रानामाळात सरवा वेचणारा, मळणीच्या खळ्यावर बैत्यासाठी हटून बसणारा, कुणाच्याही मळ्यातलं माळवंदळवं बिनदिक्कत हक्कानं तोडून नेणारा. जरासं कुणी काही बोललं, तर लहान मुलागत फुगून-घुगून बसणारा. एखाद्या माणसावर उगीचच्या उगीच आतल्या आत खडं खावून धुपत राहाणारा.
जग्गूची एक खोड मात्र कधीही न विसरण्यासाखी आहे. तो समोरच्या लक्ष्मी मंदिरातील वाचनालयाचा ताजा पेपर, तंबाखूची मिसरी जाळण्यासाठी कुण्यामायनं पळवून न्यायचा. कुणी कितीही पाळत ठेवली, तरी तो रंगेहाथ सापडायचा नाही.
पेपर त्याच्या घरी सापडे. पण, कुणाला काही बोलता येत नसे. त्यातूनही कुणी काही बोललेच. तर, त्यावर तो काहिही न बोलता, गुडघंमिट्टी मारुन, त्यावर हनूवट टेकवून गप्प घुगून बसे. नाहितर बोलणाऱ्याच्याच तोंडाकडे मख्खपणे एकसारखा टकामका बघत राही.
दोन दिवसांनी जग्गूकडून लग्नाचे साहित्य घेऊन मी घरी आलो.
पुढे बराच काळ जग्गूकडे माझे जाणे झालेच नाही. जाण्याचे तसे काही कारणही नव्हते.
या चारदोन वर्षात जग्गू विषयी नवी माहिती मी इकडून-तिकडून ऐकून होतो.
अलीकडे जग्गूची एक पाहूणी, जग्गूकडे कायमची राहायला आली होती. साठीतली गोरीगोमटी गुबगुबीत म्हातारी. तिच्यासोबत तिचं सारं लटांबळ होतं. दोन मुलं, सुना, पाच-सहा नातवंडं असा मोठा परिवार.
बहूतेक ती जग्गूच्या एकदम जवळची खास पाहूणी असावी. नाहीतर जग्गूने थोडी का होईना काहितरी कुरकुर केली असती. आधीच जग्गूचं कुटुंब मोठं. आठ-दहा जणांचं. त्यात ह्या पाहूणीचं हे सारं लटांबळ. एवढ्याशा निवाऱ्यात ही सारी जत्रा कशी काय राहात होती ते देवच जाणे.
ती पाहूणी बक्कळ पैसा पाळून आहे असं सारं गांव म्हणत होतं. पण, एवढं मात्र खरं. त्या पाहूणीच्या आगमनामुळे जग्गूचा वाडा आनंदाने न्हाऊन निघाला होता. त्याचं घर भरल्या गोकूळावाणी दिसत होतं.
ती पाहूणी आणि तिचं सारं लटांबळ बरेच दिवस जग्गूच्या घरात ठाण मांडून राहिलेलं. प्रत्येकाचा हाच प्रश्न. ‘कोण कुठली पाहूणी आणि इतके दिवस ती कशी काय जग्गूच्या घरी येऊन राहिलीय? तिही तिच्या साऱ्या कुटुंबासहित?’ गावालाही राहून राहून याचं आश्चर्य वाटत होतं.
आणि एक दिवस याचा भांडाफोड झाला. जग्गूच्या घरात बायका-बायकांची जोरदार भांडणं लागली. दोन कुटुंबं एकमेकांच्या जीवावर उठली. हाताला काय घावंल ते एकमेकांना फेकून मारु लागली. घरातील ताटं, वाट्या, तांबी, बादलीसहित सारी भांडी थडाथड रस्त्यावर येऊ पडू लागली.
जग्गू मात्र त्या पाहूणीच्या नातवाला, लाडाने आपल्या पुढ्यात घेऊन, हातातील मिसरी घासत घासत ते सारे थंडपणे पाहत होता. बहूतेक त्या नातवावरूनच ते भांडण लागलं होतं.
मग गावाला समजलं की, ती पाहूणी दुसरी-तिसरी कुणी नसून, ती जग्गूची पहिली बायको आहे. त्याचंच ते सारं कुटुंब आहे.
या घटनेनंतर ही भांडणं नित्याचीच होऊन गेली. भांडण कितीही विकोपाला जाऊ दे. जग्गू तोंडातून ब्र काढत नसे. एका शब्दाने चकार बोलत नसे. अगदीच थंड राहून मख्खपणे, निर्विकार चेहऱ्याने तो ते सारे पाहात राही.
जग्गूची दोन लग्नं झालेली. थोरली इलू आणि धाकटी निलू. दोघी सख्ख्या बहिणी. सवती सवती. जग्गूचं मुळ गाव खाली तळकोकणात. तिथं त्याचं घरदार, शेतीवाडी. बराच मोठा खटाला. घरच्या वादात तो डोक्यात राग घेऊन बाहेर पडलेला. थोरलीच्या कुटुंबकबील्यासह. तो थेट घाटावर आलेला. फिरत फिरत या भागात आलेला नि कायमचा इथलाच होऊन गेलेला.
वर्षाकाठी चारदोन महिने जग्गू गावातून गायब होत असे. त्याच्या माघारी त्याची बायको त्याच्या घराचा सारा गाडा हाकत असे. गावचे सण-उत्सव नि जत्रा-खेत्रा मात्र जग्गू कधीच चुकवत नसे. त्यात कधी त्याचा खंड पडत नसे. अशा वेळी तो कुठे जरी असला तरी गांवच्या वाजंत्र्यांबरोबर आपली पिपाणी वाजवायला तो जातीने गावी हजर राही.
पण, इतक्या दिवस तो असा मध्येआधे अचानक कुठं गायब होत असे हे कुणालाच माहित नसे. त्याचे असे गायब होणे कुणाला माहित करुन घेण्याचे तसे काही कारणही नव्हते.
जग्गूचे हे गौडबंगाल आता कुठे लोकांना ठावे झाले होते. त्याने दोन ठिकाणी आपले दोन संसार नेटाने चालवले होते. आणि बऱ्याच वर्षांनी जग्गूच्या या दोन संसारांचा आता एकच मोठा प्रपंचा बनला होता.
जग्गूच्या घरातील ही भांडणे कालांतराने जरी शांत होत गेली असली तरी, मध्येच कधीतरी त्याला उकळी फुटून त्यांच्यात धुसफूस होत राही.
भांडणाचे कारण म्हणजे, जग्गूच्या धाकट्या बायकोचा दोन-तीन वर्षांचा नातू. जग्गूचा आपल्या लाडक्या नातवावर भारी जीव बसलेला. त्याला त्याचा भलताच लळा लागलेला. तो त्याचा अतोनात लाड करे. त्याला तळहातावरच्या फोडासारखा जपे. ते त्याच्या घरातील शेंडेफळ होते.
जग्गूची थोरली बायको आणि तिच्या कुटुंबाला ते खपत नसे. कारण कितीजरी झाले तरी शेवटी तो सवतीचाच नातू. जग्गू त्या नातवाचा नको तितका लाड करतो. त्याच्यावर जीव टाकतो. त्याला लळा लावतो. म्हणून सारी त्या नातवाचा दु:स्वास करंत. त्याला पाण्यात बघंत.
खेळताना नातवाला जरासं कुठं खरचटलं, तर जग्गूचा जीव वरखाली होई. त्याच्या मनाला हुरहूर लागे. जीव कासावीस होई. अगदी सर्दी-पडसे असो नसो, एवढ्या तेवढ्यावरुन नातवाला तो दवाखान्यात पळवे. त्याची तो भलती काळजी घेई. तो जरासा कुठं दिसेनासा झाला की, ह्याचा जीव टांगणीला लागे. सतत तो त्याला आपल्या नजरेसमोर हवा असे.
नातवाशिवाय जग्गूला बिलकूल गमत नसे. त्याचा त्याला जाम लळा लागलेला. जिकडे जाईल तिकडे तो त्याला गळ्यात लोढणा अडकविल्यागत सोबत नेई.
भल्या सकाळी नातवाला घेतल्याशिवाय तो साधे तोंड धुवत नसे, चहा पित नसे की, आंघोळ करत नसे. त्याच्यावीना जेवायची गोष्ट तर लांबच. त्याच्या घशाखाली घास उतरत नसे. कबुतरांना चारा टाकायचा असो की, त्यांना खोक्यातून बाहेर काढून मोकळ्या मैदानी सोडायचं असो. सोबतीला त्याला नातू लागे. दुकानात जाऊ दे, गिरणीत जाऊ दे, बाजारात जाऊ दे, नाहितर देवळात जाऊ दे. सतत त्याचा लाडका नातू त्याच्या खांद्यावर असे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून मला काही कामानिमित्त जग्गूच्या गावाला हेलपाटे घालावे लागत होते. ते काम लवकर होईल असे चिन्ह दिसत नव्हते.
वाटेवरच वाजंत्र्याचा माळ लागे. जग्गूच्या रानाचा डाग रस्त्याकडेलाच होता. अगदी हिरवागार. जाता येता जग्गू मला तिथे काम करताना दिसे. प्रत्येकवेळी त्याच्या सोबत त्याचा छोटा नातू असे. माझ्या मनात प्रश्र्न पडे, ‘असला कसला लाड म्हणायचा? जगात काय कुणाला नातवंडं नाहीत? जणू ह्याला एकट्यालाच असल्यागत असा हा वागतोय ते?’
मला या आज्ज्या-नातवंडाचे मोठे नवल वाटे.
एके दिवशी मुद्दामच वाकडी वाट करून मी जग्गूच्या शेतात गेलो. शेतात मला तो कुठे दिसत नव्हता.
रस्ता सोडून आत, फर्लांगभर अंतरावर जग्गूची विहिर होती. दाट झाडीत झाकोळलेली. गारवेल नि गोखर्णवेलींच्या गर्द निळ्या-जांभळ्या दुलईत शांत-निवांत पहूडलेली. तशी ती सामाईकच. त्यावर वाजंत्र्याचा सारा माळ भिजे. विहिरीला लागूनच डेरेदार आंबा. त्याखालच्या सावलीत जग्गूचे लहानसे खोपट वजा एकपाकी छप्पर होते.
छपरांत गेलो. छपरातही जग्गू नव्हता. फिरुन छपरामागे गेलो. तिथं आठ-दहा वाफ्यात फळा.-फुलांनी बहरलेलं माळवं दिसत होतं. तिथंही जग्गू दिसत नव्हता. या वेळेला तर तो हमखास रानातच असतो. आज कुठे गेला म्हणायचा हा!
पुढे न जाता तिथूनच मी माघारी वळलो. इतक्यात मला लहान मुलाच्या खळखळून हसण्याचा आवाज आला. उचललेलं पाऊल मागे घेत मी गर्रर्रकन् मागे वळून पाहिलं. मागे कुणीच दिसत नव्हतं. तसाच दोन पावले पुढे गेलो. पुन्हा तोच, तसाच लहान मुलाच्या हसण्याचा आवाज. मी आवाजाच्या दिशेने गेलो.
आवाजाच्या अगदी जवळ गेलो. तर तालीवरच्या चिंचेखालच्या सावलीत चौकोनी खड्डा दिसला. चार-पाच फुट खोल. लांबी-रूंदीलाही तितकाच. त्या खड्डयात जग्गू आणि त्याचा लाडका नातू पोतं टाकून निवांत झोपले होते. जग्गू नातवाला खेळवत होता, गुदगुल्या करत होता. ते दृष्य पाहून मी चकारलोच. अचा का बीचा झालो.
माझी चाहूल लागताच जग्गू उठून बसला. त्यानं अंगाखालचं पोतं काढलं. झटाझटा झाडलं. अज्जा-नातू खड्डयातून वर आले. चिंचेखालच्या सावलीत पोतं टाकून जग्गू मला “बसा” म्हणाला.
खरेतर त्याच्याशी काय बोलावं हा मला प्रश्र्न पडला होता. थोडा वेळ गोंधळलो. पण, आपण काहितरी बोलल्याशिवाय तो काहिच बोलणार नाही, हे जाणून मीच त्याला म्हणालो,- ” काही नाही, जाता जाता सहज तुमच्याकडे यावंसं वाटलं.”
त्यावर त्याचा चेहरा खर्रर्रकन् पडला. माझ्याच तोंडाकडे तो मख्खपणे एकटक पाहात राहिला.
मी अधिकच भांबावून गेलो. बराच वेळ बसून राहिलो. तो काहिच बोलत नव्हता. त्याच्या आवडीचे, त्याच्या जवळचे सगळे विषय मी काढून पाहिले. इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पागोष्टी केल्या. मी एकटाच बोलत होतो. तो मात्र मख्खपणे एकटक माझ्या तोंडाकडेच पाहात होता.
मी अधिकच हैराण झालो. वैतागून गेलो. मनातून म्हणालो ‘काय म्हणून ही आपल्याला अवदसा सुचली आसंल? काय म्हणून याच्याकडे आलो असेन? आपल्यालाही नको तो नसता उद्योग उगीचंच लागतो!’
काही वेळापूर्वी आपल्या नातवाबरोबर मनसोक्तपणे गप्पा मारणारा, त्याला खळखळून हसवणारा जग्गू मला अजिबात दाद देत नव्हता. घुम्यागत गप्प घुगून बसलेला.
मी त्याच्याकडे केवळ उत्सुकतेपोटी आलेलो. माझ्या ठिकाणी इथं दुसरा कुणी असता तर त्याने फडाफडा स्वत:च्याच थोबाडीत मारुन घेतल्या असत्या.
त्याच्या नातवाचे तोंडभरून कौतुक केल्यावर मगच कुठे त्याला थोडा कंठ फुटला. मला हायसे वाटले. मग तो थोडा थोडा बोलू लागला.
मी थोडं दबकत दबकत नि चाचरंतच त्याला विचारलं. म्हणालो, “नातवाला घेऊन या खड्डयात काय म्हणून खेळत होता?”
त्यावर तो म्हणाला, “एक दिवस ह्येला उगी गंमत म्हणून खड्डयात उतरला, तर ह्येला लैच गंमत वाटली. मायंदाळ मज्जा केली ह्येनं. तवापास्नं मग मला ह्ये रोजचाच उद्योग लागला. पर, ह्येच्यानं लेकरु लै हासतं-बागडतं बघा.”
“असं होय. नाही म्हटलं खेळ जास्तच रंगात आला होता, म्हणून म्हंटलं.”
“रोजच्यापेक्षा आज जरा लैच उशीर खेळलो बघा”.
“का?”
” त्येचं काय झालं, कधी नव्हं ते आजच चिडलो बघा मी ह्येच्यावर. एक थाप्पड खाल्ली लेकरानं. जलामल्यापास्नं ह्येच्या आय-बानं दिकून चार बोटांनं कधी शिवलं न्हाय ह्येला. आन् आज माझाच हात पडला लेकरावर.”
आपला उजवा हात भुईवर रागारागाने आपटत जग्गू म्हणाला, “ह्या हाताचं कवा कंडकं कंडकं हुत्याली कुनान् ठावं!”
नातवाला लाडानं जवळ ओढत त्याच्या गालावरुन, डोक्यावरून मायेनं हात फिरवत त्याला म्हणाला, “लेकरा लै लागलं का रं तुला? लेकरा म्या वाईट न्हाय रं! माझी वैशीच वाईट हाय!”
जग्गूचं डोळं पाण्यानं डबडबलं.
“पण, का मारलं ह्याला?”
“आज महाशिवरात्र. शिरगांवची जत्रा. जत्रा दावाय न्हेला व्हता ह्येला. तिथं पिपाणीचाच हाट्ट धरुन बसला. लागला गडागडा मातीतच लोळायला. मग दिली ठेवून एक. आनला दरादरा वढतच घरला. माझं एक पिपाणीनं वाटूळं झालंय. पिपाणीच्या नादापाय तर थोरलीला घेऊन घराबाहेर पडलो. मग ह्येला आनखी ह्यो नाद कशाला?” असं म्हणून पुन्हा एकदा नातवाला तो गोंजारू लागला.
“ह्ये समदं रागाच्या भरात झालं बघा. चुकलंच माझं. असं हुयाला नगं हुतं.” असं म्हणून पुन्हा एकदा तो आपला हात, दातओठ खाऊन जमीनीवर आपटू लागला.
त्याचा कळवळा बघून माझ्याच पोटात कालवल्यागत झालं. भडभडून आलं.
या घटनेनंतर रस्त्याने जाता येता तो मला त्याच्या रानात काम करताना दिसे. रस्त्याकडेला असे, तेंव्हा माझ्याकडे पाहून तो नुसताच गालातल्या गालात हसे. बोलत मात्र काहीच नसे. मलाही त्याच्याशी कधी आवर्जून बोलावेसे वाटत नव्हते.
माझे त्या गावचे काम संपले. त्याच्या गावी जायचा मी बंद झालो. पण, जग्गूला मात्र मी कधीच विसरलो नव्हतो.
या गोष्टीला आता खूप दिवस झाले.
बऱ्याच दिवसांनी आज त्या रस्त्याने चाललो होतो. जग्गूचे शेत आले. रस्त्याकडेच्या बांधांला तो भांगलत होता.
मी दिसताच मला पाहून जग्गू गालातल्या गालात हसला. त्याचे हसू मला थोडे वेगळे वाटले. कदाचीत त्याला माझ्याशी बोलवेसे वाटत असावे.
मीही थोडे थांबल्यासारखे केले. त्याने कधी नव्हे ती मला हाक मारली. त्याच्या सोबत त्याच्या छपराकडे गेलो. तो आज माझी आपलेपणाने चौकशी करत होता. ख्याली-खुशाली विचारत होता. मला त्याचे नवल वाटत होते.
बोलत बोलत जग्गूने मला त्याचा सगळा मळा फिरुन दाखवला. कदाचीत बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे तो भरभरुन बोलत असावा.
बोलत बोलत तालीवरच्या चिंचेखाली आलो. दाट सावलीला बसलो. जग्गूबरोबर मला त्याचा नातू दिसत नव्हता. म्हणून त्याला विचारले.
“जग्गूदा, आपला लाडका नातू कुठं दिसत नाही. गावाला गेलाय का?”
माझ्या या प्रश्नावर तो गप्प गप्प झाला. त्याला कसे सांगावे हे सुचत नसावे. जरा वेळ शांत बसला. शेवटी मन घट्ट करून बोलला.
” देवाघरी गेला.”
पुढे मला काही बोलता येईना. कसंबसं म्हणालो, “कसं काय? अचानक? आजारी होता का?”
दिर्घ उसासा सोडत दु:ख्खी कातर स्वरात तो बोलला, ” जल्मापास्नंच आजारी हुता त्यो. बाळदमा हुता त्येला. मस दवाखानं दावलं. झडपाच काम देत नव्हत्या. लोकांस्नी वाटायचं, नातवाचा ह्यो लै लाड करतूय. उगं सारखं दवाखान्यात पळीवतूय. जिकडं जाईल तिकडं संगं न्हितूय. ज्येचं त्येला म्हायती वं!”
यावर मी काहिच बोललो नाही.
“घरच्यास्नीबी वाटायचं, ह्ये जास्त दिस जगणार न्हाय. त्यामुळं त्येच्याकडं समदी दुर्लक्ष करायची. कायजनं हाडीझीडी करायची. मला आपला लळा लागल्याला. करता येतील तेवढं लाड म्या केलं. त्येचं आयुक्षच तेवढं म्हनायचं. त्येचा शेर सपला. गेला मातीआड.”
बराच वेळ कुणीच काही बोललं नाही.
थोड्या वेळानं आवंढा गिळून समोरच्या बेलाच्या झुडपाकडं बोट दाखवत जग्गू म्हणाला, .”हिथंच पुरलाय त्येला. ती काय बेलाखाली समांध हाय त्येची.
मी उठून समाधीजवळ गेलो. बाजूला घाणेरी फुलली होती. जग्गूने घाणेरीची दोन फुलं तोडून माझ्या हातावर ठेवली. मी ती समाधीवर ठेवली. पाया पडलो. जग्गूनेही हात जोडले. वाकून नमस्कार करत म्हणाला,
“बाळा, काका आल्याती तुला भेटायला. त्येनी फुलं न्हायत आनली. हिच फुलं ग्वाड मानून घे.”
तिरक्या नजरेनं मी जग्गूकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून खाली फुलं पडत होती.
आज जग्गू बोलत होता. मी मूक झालो होतो.
“तुमास्नी आठवत आसंल. असंच तुम्ही उन्हा-उन्हाचं एकदा हिकडं आलावतासा. म्या नातवाला घेऊन हिथंच खड्डयात त्येला खेळवत हुतो. त्येच्यासाठीच त्यो खड्डा काढल्याला हुता. पर, वाटायचं जगंल माझा नातू. म्हणून तर त्येला जत्रंत पिपाणी न्हाय घेऊ दिली. तेवढाच हाट्ट ऱ्हायला बघा त्येचा. न्हायतर समदं हाट्ट पुरं केलं. आता खेळायच्या जागीच शांत, निवांत झोपलाय त्यो.
“वाईट वाटून घेऊ नका.” कसाबसा मी दोनच शब्द समजूतीने बोललो. त्यावर तो म्हणाला,
“आता न्हाय इतकं वाईट वाटत. एक रुखरुख मातुर माझ्ऱ्या मनाला शेवटापातूर लागून ऱ्हानार बगा.”
“कसली रुखरुख?”
“पुरताना त्येच्या नाकाजवळ एकदा बोट लावून शेवटचं बघायला पायजे हुतं, कि खरंच त्येचा स्वास बंद झालाय का त्ये!”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: