जळमटं

बबन पोतदार, ग्रामीण कथाकार

‘चुलत्यानं पेटवून घेतलंया. कराडला कृष्णा हॉस्पिटलात ठेवलंया.’ असा उडता निरोप मिळाल्याबरोबर मी सामानाची आवराआवर केली आन् टाकोटाक एस.टी.त बसलो.

एस.टी. निम्मी अर्धी रिकामीच हुती. एका खिडकीजवळच्या सीटवर बसलो. मन सैरभैर झाल्यालं. कायसुदिक सुचेनासं झालं. मनाची उलथापालथ चालल्याली. एका एका इचारानं मन ढासळायला लागलं. नजरं म्होरं काकू उभी न्हायली.

कपाळावर मेणाचं ठसठशीत बोट लावून त्येच्यावर माळल्याला लालभडक कुंकवाचा गोल गोल मळवट. सकाळी सकाळी उगवतीला दिसणाऱ्या सुर्यदेवासारखा! धारदार नाक, शेलाटी काया, हनुवटीवर गोंदलेला हिरवा ठिपका, सदोदित हसरा चेहरा. आल्या-गेल्या परतेकाशी तोंड भरून बोलणं, सगळ्यांची इचारपूस!

सकाळी तांबडं फुटायच्या आगुदर काकू उठून कामाला लागायची. सडा पोतेरा आन् धुणी-पाणी आटोपून सैपाकाला लागायची. कंदी म्हनून कटाळा न्हाई. मंग समद्या पोरास्नी हाळी मारायची. कंदीसुदिक राग न्हाय. सदा आनंदी !

पोरांचं लेंडार तरी बारकं हाय व्हय? एक न्हवं दोन न्हवं आट पोरं जलामल्याली.

दीड वर्षाचा पाळणा! थोरला वसंत जलामला तवा ह्ये जंगी बारसं घातलं.

समदा गाव जेवायला घातला. म्होरं आजुनि एक पोरगा असावा म्हनत सा पोरी पोटाला आल्या. सा पोरींच्या पाटीवर पुन्ना पोरगा झाला. पुन्ना एकदा जोरदार बारसं. गावंजेवणाची पत्रावळ! तेच शेंडेफळ! माज्या चुलत्यानं त्या दिवशी मुटीमुटीनं साकार वाटली. दिवाळी साजरी केली.

का कुणाला ठावं, कसल्यातरी भांडणामुळे न्हानपणी मला चुलत्याच्या मजी बापूच्या घरला जायची बंदी असायची. माजा बा आन् बापूचं दोगा भावाभावाचं भांडाण! भाऊबंदकी ! आई मला काकूकडं जाऊनच द्याची न्हाई.

तरी बी डोळा चुकवून मी जायाचो. काकू घर पाणवठ्याच्या वाटेवर !

पाण्याच्या खेपा आणता आणता रिकामी घागर घिवून तिकडे तिकडे बगत मी तिच्या घरात शिरायचो. माझ्यावर लई लई माया करायची ती. जवळ घ्यायची.

इचारपूस करायची. माजं कपाळ कुरवाळायची. मुकं घ्यायची. तिचा वसंता आनू मी साळंत एकाच वर्गात हुतो. मी साळंत खोड्या करायचो. वसंताकडनं काकूला ते समजायचं. मला जवळ घेऊन म्हनायची, “लई वांडपना चांगला नसतो बरं !

खोड्या काडत जावू नगोस कुनाच्या. शाळा शिकून मोठ्ठा हो!” मी मुंडकं हालवायचो. न्हाय करनार म्हनायचो.’ सकाळी सकाळी न्याहरीला ती दही भाकरी घालायची. उलीसा खराबी द्याची हिरव्या मिरच्याचा. कदी कदी सोताच्या हातानं भरवायची सुदिक. तिच्या हातची खर्डा भाकरी खाल्ल्यावर मन तुडुंब भरून जायाचं. तिच्याबरोबर गप्पा मारून झाल्या की हळूच कानोसा घेत मी तिच्या घरातनं भाईर पडायचो.

निगताना जवळ घेऊन माझ्या तोंडावरनं हात फिरवून म्हनायची, “येत जा रोजच्याला. आमचं मोठ्यांचं भांडाण. तुमी पोरासोरानी काय केलं या?
मग माज्या कपाळाचा मुका घ्यायची. येईन की आसं म्हनत मी रिकामी घागर घेऊन पाणवठ्यावर जायचो. येताना भीती वाटायची. ‘काकूकडं जावून जेवल्याचा आईला कळालं तर?’ मी मनाशीच बोलायचो.

एस.टी.नं कात्रज घाट वलांडला आन् मनाचा बुरूज ढासळायला लागला.

एका एका विचाराचा एक एक द्गुड सुट्टा हुयाला लागला आन् खाली यायला लागला. जास्ती सैरभैर हुयाला लागलं. एक एक दगुड एका एका प्रश्नाच्या रूपात काळजावर येऊन आदळायाला लागला. विचार लागला, “काय, झालं आसंल बापूस्नी? का म्हनून पेटवून घेतलं आसंल त्यांनी? काय घडलं आसंल एवढं? कशावरनं पेटवून घेतलं आसंल? आता काय आवस्ता आसंल?

दवाखान्यात कोन कोन जमली आसत्याल? समदं खरं पन काकूची काय दशा झाली आसंल? कशी आसंल ती? पार खचून गेल्याली आसंल का?” एक का दोन पन्नास प्रश्नांचं सुरूंग मनाला लागलं. काळीज फाटायला लागलं.

काळजातल्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला लागल्या. एका आठवणीभवती मन गोळा झालं आन् डोळ्यांमदनं झिरपायला लागलं !

काकूच्या घरला गेलो आसं कळाल्यावर माझ्या आईनं मला भक्कम चेचला.


थोबाड पार इस्काटून टाकलं. न्हाई न्हाई त्या शिव्या घातल्या. वाटेल तसं आन् वाटेल तेवढं बोलली ती मला.

माज्या इवलाशा मनाला भली थोरली जखम झाली. दिवसभर जेवलो न्हाई.

दुपारी आईचा डोळा चुकवून घरातनं भाईर पडलो. मन पार ढासळून गेलं हुतं.

नगो नगो ते इचार मनात यायला लागले हुते. कुटं तरी लांब लांब पळून जावावं आसं वाटत होतं. पुन्ना कदी घरला येऊच नये आसा विचार करून निगालो हुतो.

ओढ्यातनं जाताना काकू म्होरं दिसली. रडत रडत मी तिच्याजवळ गेलो.

तिनं मला जवळ घेतलं. पोटाशी धरलं. मस्तकावरनं हात फिरवला.

“काय झालं रं लेकरा?” तिनं मला इचारलं.

“आईनं लई मंजी लई मारलं बग!” मी हुंदकं देत म्हनालो.

“का रं? काय केलंस तू?” ती बोलली.

“सकाळी तुमच्या घरी आलो हुतो. तुज्याकडं जेवलो हुतो त्ये समाजलं तिला. खाटकाच्या तानाजीनं सांगितलं आईला!” कसंबसं मी काकूला सांगितले आन् डोळे मोठ्ठालं करीत म्होरं म्हणालो, “काकू लांब लांब जातो मी आता कुटं तरी! मागारी येनारच न्हाय!! लई लई लांब जातो बग!”

“लांब मंजी कुटं जानार हाईस!” काकूनं माज्या डोळ्यात बगत इचारलं.

“जाईन कुटं बी, वाट दिसंल तिकडे!” मी बोललो.

“आसं करायचं नसतं बाळा. आरं आईनंच मारलंय न्हवं?” ती म्हणाली.

“व्हय की, पन उगंच्या उगं एवडं मारायचं? तुज्या घरी गेलो हुतो म्हनून ?

आसा काय मोट्टा गुन्हा केला गं मी? काय चोरी तर न्हाई केली. कां म्हनून ,, मारायचं एवढं?” बोलता बोलता मला दम लागला.

“तू तरी का म्हनून हट्टाला पेटले ? आई म्हनते तर ऐकायचं तिचं! न्हाय यायचं आमच्या घरला !” रोजच्याला घरला येत जा आसं म्हनणारी काकू माज्या डोळ्यावरनं पदराचा बोळा फिरवीत म्हनाली आन् एकाएकीच रडायला लागली.

तिला रडताना बगून मीच बिथरून गेलो. तिचं हात हातात घेवून तिला इचारायला लागलो, “काकू, तू आन् बापू एवडं वाईट हायसा? का म्हनून आई तुमच्या घरी जावून देत न्हाई मला? तू तर किती माया करतीस माज्यावर! कसलं भांडाण हाय म्हनायचं तरी? तुमच्या मोठ्यांच्या भांडणांत आमचा जीव जातो.

भांडण मिटवून टाकावं म्हणतो मी!” कातावून मी बोलत हुतो.

“न्हान हाईस जुनी! तुला न्हाय कळायचं ह्ये समदं! मनातली जळतं आशी एकाएकी निगायची न्हाईत.” आसं म्हनत माज्या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यात ठेवून एकदमच तिनं मला दंडाला धरलं आन् फरफटत वडत आमच्या घरी आनलं. माज्या आईच्या पुढ्यात उबं केलं.

“घे शांताबाई, सांबाळ तुज्या लेकाला. पळून चालला हुता. मनानं पार खचून गेलाय. आगं आपलं मोठ्यांचं भांडाण. त्याला कशापाय मारलं आसशील एवडं? तुज्या पाया पडते बाई, पोराला मारू नगोस. लहान पोरं मजी कुंभाराच्या आंगणातला मातीचा चिखूल आसतुया. वळवावे असं वळवावा! आकाराला यावा!” काकू आजून काय बाय म्हनाली आन् मला आईच्या ताब्यात देऊन निगून गेली. जाता जाता माज्याकडं बगत मला म्हनाली, “तू बी आसा आडमुठ्यावानी वागू नकोस रं! आईबाप न्हाय म्हनत्यात तर येऊ नगोस आमच्या घराला.

माजी आई नुसतं ऐकत हुती.

झाल्या प्रकारानं मी पार भांबावून गेलो. मन पार इताळलं. पानी पानी झालं.
“काकू आसं का बोलली आसंल? येऊ नकोस आसं का म्हनाली आसल?”
इताळलेल्या मनाभवती घाणीवरच्या माशांसारखे ते प्रश्न घोंगावत न्हाई. फिरत हाईलं!
उत्तर मिळालं न्हाई. मी खट्ट झालो.

त्या दिवसापास्न काकूकडं फिरकलोच न्हाई. – दिवस जात होते म्हईनं संपत हुतं. वर्स पळत हुती. कुणाचं न्हात न्हाय कुनावाचून हेच खरं!

म्होरं काकूच्या पोरांची लग्न झाले. वसंत पाठोपाठ थोरल्या कमल अक्काचं बी चार हात झालं. तिचा नवरा भोरचा हुता. पुन्याला शाळेत मास्तर हुता. थोरलीच्या नात्यांमधे दोगी गंगू आन् उद्या उजवल्या. विमलला खरसुंडीला इंदूला मुंबईला दिली. आन् समद्यात धाकली छाया तकडं संगमनेरच्या कोर्टातल्या तुरेकरास्नी दिली. गेल्या साली शेंडेफळाचा बी बार उडवून दिला. त्याची बायकू मजी काकूची धाकली सून गुलछडी हुती. डोक्यानं वाईच कमी. आदनं मदनं तिला झटकं यायचं ! तिचं वागणं छचोर हुतं ! चाबरट हुतं. परपुरुषासंग ती डोळं मिचकावून बोलायची. लगट करायची. आसं कानावर आलं हुतं.

परत्येक लग्नात काकू आन् बापू जोडीनं आमच्या घरी माज्या आईला आन् बापाला बोलवायला यायचे. का कुनाला ठावं माज्या घरच्यानी एकाची लग्नाला हजेरी लावली न्हाई. घरच्यांच्या भीतीमुळं मी बी कुनाच्याच लग्नाला गेलो न्हाई.

मनाला सारखं वाटायचं. “जावं काकूकडं! तिच्या पदरात शिरावं. तिनं मला कुशीत घ्यावं. जवळ घेऊन इचारपूस करावी.” पन मन धजावलं न्हाई. मी गेलो न्हाई. काकूचे शब्द आठवायचे, “येऊ नगोस आमच्या घरा!”

कसलं भांडाण हुतं कुनाला ठावं! जलमाला पुरल्यालं! मानसाचं मन आसं का म्हनून आसतंया? कसली भाऊबंदकी म्हनायची! ह्याची तड कवा लागनार?

शेवट कदी हुईल ह्या समद्याचा? मनावर चिखलावानी घट्ट बसल्याली जळमटं कवा धुवून जायाची? का आशीच होणार होती ही जन्मभर?” मी मनातल्या मनातच इचारत व्हायचे. उत्तर मिळायचं न्हाई.

काकूच्या घरी जाणं बंद झालं हुतं तरी जाता येता माजी नजर तिच्या घरात डोकावायची. कदी नजरानजर झाली मंजी काकू पदरानं डोळं पुसताना दिसायची.

मी बी इरगळून जायचो. म्होरं गेल्यावर डोळं गाळायचो. डोळ्यांतलं पानी धुव्वाधार वहायला लागायचं!
आठवणींच्या ववटळीतनं भाईर आलो तवा गाडी कराडजवळ आली हुती.

कोयनेचा पूल संपला मंजी मला उतरायचं हुतं.

नाक्यावर उतरलो आन् रिक्षा करून तडक हॉस्पिटल गाठलं. लगालगा पावलं उचलीत भाजल्यालं पेशंट ठेवलेल्या वॉर्डाकडं निघालो. म्होरं बगितलं.

समोरच समदा गोतावळा दिसला. एका कोपऱ्यात भिताडाला टेकून बसल्याली काकू दिसली. तिच्या भवतीनं जमलेल्या समद्या लेकी दिसल्या. पुण्यात थोरली कमल आली हुती. तिच्याच संगट इंदू बी आल्याली दिसत हुती.

भोरवरनं गंगू आन् पद्मा दोगीबी पोहोचल्या हुत्या. संगमनेरवरनं धाकली छाया दोनी पोरास्नी घेऊन आली हुती. समदे माज्याकडं बघायला लागले.

थोरला वसंत बिगीबिगीनं म्होरं आला.

“तू कवाशी आलास नाशिकास्नं?” मी इचारलं.

“परवा दिवशीच आलो टाकोटाक!” त्यांनी सांगितले.

“तुला कां एवढा उशीर झाला?” म्होरं त्यानंच इचारलं.

“मी पुन्यात न्हवतो दोन दिवस. रात्री पोहोचलो पुन्यात. आशानं आसं झाल्याचा निरोप मिळाला आन् लगोलग गाडीला बसलो.” मी सांगितलं.

“पन कसं काय झालं ह्ये समदं? कशापाय झालं?” मी म्होरं इचारलं.

“समदं सांगतो. तू आगुदर बापुस्नी भेट. कालपास्नं तुजी आठवण काढत्याती.

तुज्या नावाचा धोसरा काडलाय नुस्ता.” वसंत बोलत होता.

“चल. ” आसं म्हणून आमी दोगं बी आत गेलो.

बापूस्नी पाण्याच्या गादीवर ठेवलं हुतं. छातीवर मच्छरदाणीचा पिंजरा उलटा ठेवल्याला. आकबंद चेहरा काळा मिट्ट दिसत हुता. डोक्यावरचं आन् भुवयांवरचं केस अर्धवट जळालेलं! दोन्ही हातांची साल दोन्ही बाजूला लोंबत आसलेली मच्छरदाणीच्या आत दिसत हुती. छातीला आन् पोटाला कापसाच्या पाट्या गुंडाळलेल्या हुत्या. उशाला एक पांढऱ्या डगल्यातली नर्स उभी हुती. खोली भरून औषधाचा कोंदट वास येत होता.

मी आन् वसंत दोगं बी म्होरच उभं न्हायलो. चेहरा मलूल वाटला तरी बापूंची नजर शाबूत हुती. आढ्याकडं टक लावून ते बघत हुते. कसला तरी विचार करत हुते.

“कोन आलंय बगा बापू!” वसंत त्यांच्याकडं बघत बोलला.

मी म्होरं बगत हुतो. बापूंचा चेहरा वाईच खुलल्यावानी वाटला. आजारी कबुतरावानी उजवीकडं मान करीत माज्याकडं बघत ते म्हणाले,

“लेको, आलास तू? ये, हितं जवळ येवून उभा रहा. कसा हाईस?”

“माजं बरं हाय बापू, पन ह्ये ह्ये काय करून ठेवलंयसा? कशापाय झालं ह्ये समदं?” मी जवळ जात इचारलं.

समदं भोग हायती, दुसरं काय बी न्हाय!” माझ्याकडे बगत बापू म्हनाले.

“आसं कां बोलतायसा बापू? कसलं भोग हायती सांगा तरी!” मी बोललो.

माझ्या डोळ्यांतलं पानी गालावरनं खाली वगळायला लागलं. ते पुसायचं भान बी मला व्हायचं न्हाई.

“धाकल्या सुनेचं लक्षण काय नीट न्हाय बग!” ते पुढं बोलायला लागले.

थोडा वेळ गप्प झाले.

“मंजी? मला न्हाय समजलं, तुमी काय बोलतायसा त्ये!” मी म्हणालो.

“कसं सांगायचं तुला! ऐतवारी नगो ते नजरला पडलं माज्या.” एक आवढा गिळीत ते म्होरं सांगू लागले, “ती उंडगी घरामागच्या कोपऱ्यात एका रानरेड्याच्या गळ्यात पडली हुती. दोगांचं चाळ चाललं होतं! मी म्होरं झालो आन् दोगांच्याबी कानाखाली वाजवलं.!”

“मंग?” मी अवाक झालो हुतो.

“त्यो सोद्या गेला पळून. त्यो गेल्यावर ती लावसट माज्या संगटच भांडायला लागली. बोंबलून समदा गाव गोळी करीन म्हनाली. तिच्या अंगावर पुरती कापड बी न्हवती.” आशीच भाईर येवून “तुमीच माजी अब्रू लुटली’ असं वरडून समद्यास्नी सांगील म्हनाली.” बापू बोलत हुते.

“बाप रे! मग?” मी बोललो.

“मला त्ये काय सहन झालं न्हाय! गप्प बस. न्हायतर मीच पेटवून घेईन तुझ्या म्होरं! मी तिला म्हनालो.” बांपूच्या आवाज कापरा यायला लागला.

थोडा वेळ ते पुन्ना आढ्याकडं बगायला लागले.

“आन तुमी पेटवून घेतलसा बापू! बापू, बापू, काय हे?” मी म्होरं बोललो.

“मंग काय करु? तिच्या कुटं नादाला लागू? आन् मला सांग, वाद जास्तीच वाडला आस्ता तर माज्याच नावाचा डंका समदीकडं वाजला आसता कां न्हाय?” त्राग्यानं त्यांनी उत्तर दिलं.

“पण आता ह्ये केवड्याला पडलं बापू?” मी म्हनालो.

“भोग म्हनायचं. दुसरं काय?’ बापू.

“असला कसला, मुलुखावेगळा भोग?” मी.

“तसंच हाय ह्ये. तू आलास. लई लई बरं वाटलं बग. परवा दिवशी तुजा बाप आन् आई, दोगं बी आलं हुतं!” माज्याकडं एका वेगळ्याच नजरेनं बगत बापू मला म्हनाले.

“माजं आई बाप? काय सांगतायसा?” डोळं मोट्टालं करीत मी इचारलं.

‘व्हय. आरं कितीबी झालं तरी पाठीला पाठ लावून आल्याला धाकला भाऊ, हाय माजा त्यो. परवा दिवशी येऊन गेला. येताना सोताच्या हातानं तयार केलेलं राळ्याचं मलम घेऊन आला हुता. सोताच्या हातानं माज्या अंगाला मलम लावलं त्यानं!” बापूंची नजर आता वेगळीच दिसत हुती मला.

“काय सांगताय बापू?” मी आश्चर्यानं इचारलं.

व्हय! पन लई लई उशीर झाला रं? जळमटं झटकून टाकायला चाळीस वर्स लागली बग!” बोलता बोलता त्यांचे डोळं गळायला लागलं. व्हट थरथरायला लागलं. पापण्या उडायला लागल्या. कसं बसं त्ये म्होरं बोलू लागले. “लेकरांनो, आता मी ह्यातनं वाचन आसं काय मला वाटत न्हाय!

देवानं दार उगडून ठिवलंया. आता घंटा वाजली की निगायचं आन् आत शिरायचं!”

“बापू!” मी त्यांच्या तोंडावर हात ठेवून मुसमुसून रडायला लागलो. बाजूचा वसंत बी रडायला लागला. डोळा गाळायला लागला.

“दोगं बी आसं उशाला बसा माज्या! बसा दोनी बाजूला!” आमास्नी खूण करीत बापू बोलले.

मुकाट्यानं आमी दोघं दोनी बाजूला जावून त्यांच्या उशाला बसलो.

“लेकरानु” आमचं तळहात हातात घेत ते म्होरं बोलायला लागले. “समदी जळमटं काडून टाका. आमी जलमभर केलं त्ये तुमी करू नगासा. नीट गोळ्यामेळ्यानं ह्हावा. अनुभवाचं बोल सांगतुया तुमास्नी. वरच्याचं बोलावणं आलं मंजी आख्खा जलम डोळ्यांम्होरं उभा राहतो. त्यानं दिलेलं आयुष्य लाख मोलाचं आसतंया. मानूस कायसुदिक घेवून जात न्हायं जाताना, संगट! रिकाम्या हातानं येतो, आन् रिकाम्या हातानंच जातो!” बापू आजुनी काय बाय बोलत हुते.

आवाज खणखणीत हुता. एकाएकीच तो कापरा झाला. त्यांच्या डोळयांवर झापड आल्यावानी वाटायला लागलं.

नर्सनं आमाला भाईर जायाला सांगितलं.

दोगं भाईर आलो आन् समोरच्या गोतावळ्यात शिरलो.

“दादा, भेटलं का रं बापू? काय म्हनालं?” धाकली छाया मला इचारत
हुती.

मी गप्पच!

“सांग की काय म्हनालं बापू?” तिनं पुन्ना इचारलं.

आन् माजा गळा दाटून आला. डोळे घळाघळा गळायला लागलं. काळजाचा बांध फुटून गेला. धरण फुटल्यालं त्ये पानी सैरावैरा धावायला लागलं आन् पापण्यांची दार फोडून घरंगळायला लागलं. हात आन् पाय थरथरायला लागलं.

मस्तक जड वाटायला लागलं. पावलं पायात शिसं भरल्यावानी जड झाली. मी उभाच हुतो, समोर बगत हुतो.

जड झाल्याली पावलं कशीबशी उचलीत मी समोर बसलेल्या काकूच्या जवळ गेलो आन् तिच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडायला लागलो.

तिच्याच पदराचा आधार घेऊन डोळे पुसायला लागलो.

किती बी पुसलं तरी डोळं गळायचं थांबतच न्हवतं!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: