काकडीची कोशिंबीर

शीतल दरंदळे

रियाला लहानपणापासून काकडीची कोशिंबीर खूप आवडे. हिरवीगार काकडी मस्त किसून त्यावर खमंग घरच्या तुपाची फोडणी,कडीपत्ता, जिरं, मिरची वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि भाजलेल्या दाण्याचा कूट भुरभुरायचा. मस्त दही, साखर, मीठ सगळं एकत्र करून तयार काकडीची कोशिंबीर.

अगदी खेळतानाही तिला फोडणीचा वास आला की ती लगेच धावत येई. मग दही घालून छान मिक्स करायची आणि फ्रीज मध्ये ठेवायची थोडावेळ थंड व्हायला. पंधरा मिनिट आईच्या पोळ्या होईपर्यंत ती ठेवे आणि पहिली पोळी आणि कोशिंबीर अहाहा,रिया खुश. बाकी कुठली भाजी, भात, आमटी तिला काही गरज नसायची. पूर्ण उन्हाळा तिला हेच आवडायचं. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे गेली तरी तिथे तोच आग्रह असायचा. काकडीची कोशिंबीर आणि पोळी, बास.

आता लग्न झाले, मुलं झाली की जशी स्त्रिया आपली आवड बाजूला ठेवून फक्त मुलं आणि नवऱ्याच्या आवडीला प्राधान्य देतात तसेच रियाचेही झाले. तिचा नवरा कुणालला सर्दीचा त्रास असल्यामुळे तो काकडीला नकारच देत असे, त्यामुळे काकडी फार घरात आणलीच जात नसे. रियाला काकडी दिसली की मोह होई पण एकटी साठी कशाला घ्या म्हणून ती टाळत असे.

माहेरी गेली की मुलांचे लाड, भाचे मंडळीचे आवडते पदार्थ करण्यात सगळ्या जणी व्यस्त. अशा प्रकारे जणू तिच्या आवडीची कोशिंबीर जणू इतिहासजमा झाली होती. सॅलड म्हणून खाल्ली जाई इतकंच.

रिया चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचली. कुणालने खास तिच्या वाढदिवसाचे नियोजन केले. सगळे जवळचे मंडळीना आमंत्रण होते. जय्यत तयारी सुरू होती. रिया मनोमन खुश होती. तिला न सांगण्याचं ठरलं होतं पण मुलाकडून समजलेच. मग कुणालने रियालाही त्यात सहभागी करून घेतले. नविकोरी साडी, त्यावर सोजेसा नेकलेस सेट, मॅचिंग चप्पल, पर्स. कुणालने काही कमी ठेवली नाही. सगळ्यासाठी मेनूही बाहेरूनच ऑर्डर केला होता.

रियाला त्यादिवशी काही काम करू द्यायचे नाही हे ठरवले होते. रियाचा सगळ्यात जवळचा शाळेतल्या मैत्रिणींचा ग्रुपलाही आमंत्रण होते. रिया, प्रिया आणि कविता या तिघी म्हणजे अगदी जीवलग मैत्रिणी. एकमेकींची खूप काळजी घेणाऱ्या जीवाला जीव देणाऱ्या. सुख,दुःख, सगळ्यात सहभागी. अगदी लग्न झाल्यावरही एकमेकींच्या संपर्कात होत्या. रिया आणि कविता एकाच शहरात होत्या, तर प्रिया दुसऱ्या शहरात होती. प्रियाला कुणालचा फोन आल्यावर तर तिला इतका आनंद झाला, तिने कॅलेंडर वर लगेच तारीख मार्क करून ठेवली. कविताला फोन करून तिनेही ती येत असल्याचे कळवले. त्या निमित्ताने त्या तिघी बऱ्याच महिन्यांनी भेटणार होत्या. पण कुणालला त्यांनी एक अट घातली होती की या येणार आहेत हे रियाला कळू द्यायचे नाही. कुणालनेही ती काळजी घेतली.

रियाने विचारल्यावर काय सांगायचे याचे उत्तर त्याने ठरवून ठेवले.

रियाच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला, रिया प्रचंड खुश होती. तिच्या पिल्लांनी सकाळीच तिला गोड पापी देऊन विश केलं होतं. इवल्याश्या हातानी बनविलेले ग्रीटिंग घेऊन ते आले होते. ते ग्रीटिंग बघून ती हळवी झाली किती गोड msg होता त्या ग्रीटिंग मध्ये. अजून नीट स्पेल्लिंग ही येत नव्हते पण इतक्या सूंदर भावना. रियाने कडकडून मिठी मारली दोघाना आणि कुणालने तो क्षण त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला. रिया म्हणाली अरे अजून आवरू तरी दे, अश्या अवतारात कसले फोटो काढतोस? कुणालने लगेच ट्रे पुढे केला, “गरमागरम चहा मॅडम, a very happy birthday my love” असे म्हणून तो हसला. रिया अजून इमोशनल झाली. पण तिच्या डोळ्यात पाणी यायच्या आत कुणालने सर्वांचा सेल्फी घेतला.

इतकी सूंदर दिवसाची सुरुवात झाल्यावर रिया सातवे आसमान पर होती. फोन वाजू लागले, कविता आणि प्रियाने ही फोन केले. तिघी च्या गप्पा झाल्या, रियाने संध्याकाळ विषयी त्यांना सांगितलेच होते पण त्यांना जमणार नसल्याचे त्यांनी कळवले आणि विश करून फोन बंद केले.

संध्याकाळी मोजकेच पण जवळचे नातेवाईक आले होते. रिया सुंदर साडी नेसून तयार होती, छान मेकअप केला होता. तिच्या आवडीचा चोकॉलेट केक मागवला होता, सगळे तिला बर्थडे विश करत होते. केक कापायची वेळ झाली होती पण अजून कविता आणि प्रियाचा पत्ता नव्ह्ता. कुणाल सारखं घडयाळाकडे बघत होता. कविताने फोन करून कुणालला कार्यक्रम सूरू करण्यास सांगितले कारण त्यांना थोडा उशीर होणार होता. कुणालने सगळ्यांना सांगितले केक कापूयात. रियाच्या आईने औक्षण केले. रियाने केक कापला, खुप फोटो काढले गेले. रिया खूप आनंदात होती. बरेच गिफ्ट ही तिला मिळाले होते. नवीन क्रोकेरी सेट, ग्लास सेट, मेकअप सेट, पर्स सगळं रियाचं उपयोगी पडणार, संसारात लागणाऱ्या अनेका गोष्टी. रियाच्या भावाने जेव्हा नवीन फोनचा बॉक्स उघडला तेव्हा तर तिला धक्का बसला, बापरे इतका महागडा फोन आणि तो ही तिच्यासाठी??? तिच्या आनंदला पारावर उरला नाही. ती उड्या च मारू लागली.

खूप गप्पा झाल्या, सगळयांना कडकडून भूक लागली, जेवणाची ऑर्डर आलीच होती. तेवढ्यात बेल वाजली. कुणालने मुद्दाम रियाला दार उघडण्यास सांगितले, त्याला माहित होते कोण आहे ते…

रियाने दार उघडले तर समोर प्रिया आणि कविता, रियाचा विश्वास बसेना, त्या दोघीही जोरात “surprise”  म्हणत आत आल्या.रियाला त्यांनी घट्ट मिठी मारली. रिया खूप भावुक झाली. तुम्ही मला खोटे सांगितले ना जमणार नाही ते, रिया त्यांना म्हणाली. त्या दोघीही आणि कुणाल खूप हसले.रियाला कळले. कुणालने पटकन त्यांचा फोटो काढला. जेवण वाढणे सुरू होते.

इतक्यात प्रिया आणि कविता आत गेल्या आणि त्यांनी ताट आणले, रियाचं गिफ्ट द्यायचंय असं त्या म्हणाल्या, सगळे पाहत होते, त्यांनी डबा उघडला आणि त्यातून कोशिंबीर आणि पोळी  रियाच्या ताटात वाढली, काकडीची थंडगार कोशिंबीर तिला आवडते तशी आणि गरमागरम पोळी.ते ताट बघून रियाच्या डोळ्यांत पाणी आले.तिची सर्वांत आवडती डिश. अगदी साधी पण विसरून गेलेली. या मैत्रिणींची माया किती बघा, इतकं लक्षात ठेवून आणल् आहे त्यांनी फक्त माझ्यासाठी. रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहायला लागले. मैत्रिणीच्या डोळ्यातही पाणी आले. सर्वांना गलबलून आले.

कुणालला वाटले ही खरी मैत्री, आज इतके गिफ्ट आले पण या गिफ्ट चं काय मोल करावं? त्या दोघींनीही पहिला घास रियाला भरवला आणि कुणालने खुबीने तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

आणि पुढचं सेलेब्रशन सुरू झालं.रियाला तो दिवस कधी संपूच नये असं वाटलं.

(तुमचीही आहे का विसरलेली कुठली गोष्ट, आठवून नक्की पहा.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: