दांडी

ज्ञानेश्वर भंडारे

आज बंड्या सकाळी लवकरच उठून तयारीला लागला होता. बीगीबीगी आवरून कामावर जायला हवं, नाहीतर मालक मजुरी कापणार. या विचारातच त्यांने दोन तांबे अंगावर ओतून घेतले. मायने भाकरतुकडा फडक्यात बांधला. बंड्याने मायला सांगितलं, ”एक भाकर ज्यादाची बांध आज मी काय न्याहारी करत नायं,रस्त्याने खाईल”. दिस पार माथ्यावर आलाय. टाईम लागलातर मालक दमडी द्यायचा नायं. असं म्हणतं त्यानं मायंन फडक्यात बांधलेली भाकरी घेतली अन शेताच्या दिशेने चालायला लागला.

बंड्याचा बाप लहानपणीचं शेतात साप चावून मेलेला त्याच्या मायला त्याचाच काय तो आधार. माय रोजंदारी करून जे पदरात पडेल ते आणायची आन दोघांची गुजराण व्हायची. मायेच्या पदराखालीच बंड्या मोठा झालेला. कळायला लागल्यापासून बंड्या त्याला झेपतील तसे कामे करू लागला. तेवढाच मायेला हातभार.

बंड्या यंदा आठवीला होता. हळूहळू रोजंदारीवर जावू लागला. पावसाळा सुरू झाला, तशी बंड़्याची शाळा ही सुरू झाली होती. गावात सातवीपर्यंतच शाळा असल्याने आठवीला बाहेरच्या गावात प्रवेश घ्यायचा होता. त्या प्रवेशासाठी लागणारी फी मायेनं भरली होती. पण, शाळेची पुस्तके अन इतर खर्च आपल्या जीवावर भागवायचा हे मनाशी बांधूनच त्याने दर सु्ट्टीला रोजंदारीवर जाऊन पैका मिळवायचा हे मनाशी ठाम बांधलेलं.

खंडू मालकाचा काल सालगडी गावी गेला होता. म्हणून खंडू मालकाला ”रोजकरी” पाहिजे होता. पेरणीचे दिस त्यामुळे ऐनवक्ताला रोजकरी मिळणे म्हणजे खडकात विहीरीला पाणी लागण्यासारखं होतं. खंडू मालक त्याचं विचारात होता. तेवढ्यात बंड्या तिथून चाललेला.

काय रं बंड्या, उद्या आईतवार हाय, शाळास्नी सुट्टी असलं की. – खंडू मालकानं बंड्याला विचारलं.
बंड्या – व्हयं मालक हाय की, काय काम व्हंत का ?
खंडू मालक – हाय की, आमचा गडी पिऱ्या गावाला गेलायं, त्यांच्या जागी तुला जमलं का ?
बंड्या- जमलं की, काय पेरणीचं औत तर धरायचं नव्हं.
खंडू मालकाचं काम अडलं होतं, अन हातघाईला आलेलं असल्याने पोरगं कोवळ असलं तरी काम भागणारं होतं. त्यामुळे हो म्हणायला काही हरकत नव्हती. त्यानं उद्या सकाळी लवकर बंड्याला शेतावर यायला सांगितलं, वरून ‘पेरणीचे दिस हायती लय उशीर करू नको’, अशी ताकीदही दिली.

मुख्य रस्ता संपला, पांदण लागली होती. पांदीवरून खंडू मालकांचे शेत अगदी जवळून दिसत होते. खंडू मालक पेरणीचे तिफणे लावून बैल जुपत होता. तोवर बी-खतं पेरणाऱ्या बाया पण आल्या होत्या. खंडू मालक तिफणं हाकणार होता. तर बंड्या त्याच्यामागं उलट्या खोडाचं औत हाकणार होता.
भाकरी फडक्यातून सोडून खाल्ली. मायेनं भाकरीवर आंब्याच्या खार दिला होता. तो भाकरभर माखून खात होता. मिरगीचा पाऊस पडल्याने मातीचा एक वेगळाच सुगंध दरवळत होता. ऊन- सावल्यांचा लपाछपीचा खेळ चाललेला, पुढे ऊन तर त्याच्या मागे सावली पळत होती. भाकर खात-खात तो खेळ पाहण्यात बंडू मग्न झाला होता.

”ये बंड्या खाय, पटकन अन ये लवकर बैल खोळंबळीत” असं खंडू मालकानं म्हणताचं बंड्या ध्यानावर आला. आज जर रान संपलं नाहीत तर उद्या येवून राहिलेलं हाणावं लागेल. नाहीतर आजची रोजंदारी मिळणार नाही. हे ऐकताच बंड्याच्या डोळ्यांम्होरून वह्या-पुस्तके एकदम चमकून गेले. या आठवड्यात वह्या घ्यायच्या अन पुढच्या आठवड्यात पुस्तके हे त्यांने सकाळीच ठरवलं होतं. भाकर व्हती-नव्हती, तेव्हढी तोंडात कोंबली, पाणी पीलं अन बंड्या बांधाकड बैल आणायला पळाला.

तिफणीनं झालेलं रानं औतानं नाही झालं तर उद्या परत यावं लागणारं होतं. शाळा तर बुडणारचं होती. वरून मालक नीट काम झालं नाही म्हणून पैकं कापील ते वेगळ च याचं विचारात बंड्या औत हाणतं होता. दुपार झाली. जेवण करायला पारगं सुटली. जेवण आटपून परत बैल जुंपले. आभाळ भरून आल्याने कधी पाउस येईल त्यांचा नेम नव्हता. पाऊस पडल्यावर तिफणं चलणारं नाही तिथे औतांची काय दशा.. मालकानं जेवण झाल्या झाल्या बंड्याला बजावलं होतं.

बैल आणून मागच्या औताला जुुंपले. येटनं लावलं, दांडीचा मागमुसं काढला, कासरा जोडून औतावर स्वार झाला. मालक तिफण हाणत होता. त्यांची तिफण भराभरं चालत होती. बंड्या मागणं उलटं औत फिरवत होता. दोन-तीन तासं फिरवून झाल्यावर बैलांनी हेरलं, आपला दररोजचा गडी नव्हं, बैल तासं घेतांना वाकडं-तिकडं फिरवायला लागली. बैलाची चालही मंदावली होती. अंतर पडत चाललं होतं. ते पाहून मालकानं हेरलं अन बैल बंड्याला जुमानी झालेत, हे मालकांच्या लक्षात आलं. मालक तिफणं थांबवून बंड्याकडं आला. त्यानं बैलाला दोन-चार चापकांचे रट्टे लावले अन बैल तालावर आले. तासं न काढता बैल सरळं चालू लागले. परत दोन-तीन तासं झाल्यावर बैल रंग दाखवू लागले. बंड्या रंडकुंडीला आला होता. तिफणीत अन औतामध्ये अंतर पडत चाललं होतं. बंड्याची घालमेल होत होती. पण, आज जर रानं हाणूनं संपलं नाही, तर त्याची मजुरी मिळणार नाही. मजुरी मिळाली नाही तर वह्या घेता येणार नाहीत. हा विचार करूनच त्याला हुंदका आला. त्याने कसंबसा हुंदका आवरत औत हाकायला लागला.

बैल आढेवेढे घेत चालू लागले तसा तो जास्त रागात येवून बैलाला हाकत होता. नविन चाबूक होता, पर मालकानं जास्त वादी खराब करू नको म्हणून सकाळीच बजावलं. आता बंड्या इरेला पेटला होता. त्याला समोर पडलेलं फक्त रानं दिसतं होतं. जर मजुरी मिळाली तर वह्या मिळतील एवढंच त्याला आठवत होतं. त्याचं भानात त्याने बैल दामटावयला सुरूवात केली. त्या इर्ष्येत तो बैलांना किती मारतोय हे पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं. बैल भराभर चालतं होते. रानं संपत चालेलं होतं. खंडू मालकानं तिफनं सोडून बैल चरायला सोडले होते. कासराभर रानं राहिलेलं, आभाळ दाटून पावसाच्या सरी कधीही येतील इतकं अंधारून आलेलं.

तितक्यात मातीत एक खोडं बुजलेलं लागलं, तसे बैल थांबले. पण त्याकडे बंडूचं लक्ष नव्हतं. त्याला फकस्त रानं संपवायचं पडलेलं. तसेच बैल हाकले त्याने, बैलांनीही माराच्या भितीने ताकद लावून औत ओढले. घात झाला अन औताची दांडी खाडकन आवाज करत तुटली. बंड्याला तोल सावरता न आल्याने तो धापकन तोंडावर पडला. बैल तसेच चालू लागले. लांबूनच औताची दांडी तुटलेली पाहून मालक दातओठ खात अन कचाकच शिव्या देत बंड्याकडे चालून येत होता.

आपली रोजंदारी तर लांबच आता दांडी मोडली म्हणुन मालक आपल्याला राबवून घेणार अन त्यात शाळा बुडणार हे आठवताच बंड्याला रडू कोसळलं अन त्याच्या रडण्यात पाउसही सामील होत धो-धो कोसळत होता.

One thought on “दांडी

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: