निर्णय

माधुरी विधाटे

रात्रीचा एक वाजला होता. एकदाचे पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन पूर्ण करून अजयने लॅपटॉप बंद केला. आज गणपती विसर्जन, दिवसभर मिरवणुकीची धामधूम चालू होती. पण कामामुळे त्याला बाहेर डोकावायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता. गादी वर आडवे होऊन दमून डोळे मिटले, तशी घरची मखरातील साजिरी गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. दरवर्षी तो किती मनापासून मखर आणि सजावट करत असे‌. दहा दिवस पाहुण्यारावळयांनी घर कसे गजबजून जाई. नवीन धोतर सदरा व जरीची टोपी घातलेले प्रसन्न बाबा, काका, आजोबा, भरजरी साडीतल्या आई, काकू, आत्या, आजी आणि सर्व भावंडांनी मिळून म्हटलेल्या झांज, टाळांच्या गजरातील आरत्यांचे सूर कानात घुमत राहिले.

रत्नागिरी जिल्ह्यातलं, संगमेश्वरमधलं परचुरी, हे निसर्गाच्या कुशीत पहुडलेले अजयचे गाव. आजोबा गावाचे खोत होते. तालेवार, श्रीमंत बागायतदार घराणे, चौसोपी घरामागचा संपूर्ण डोंगर त्यांच्याच मालकीचा. आंबे, नारळीपोफळी, काजू, फणस, साग, रातांबे, ऐनाच्या झाडांनी हिरवागार झालेला परिसर. भाताची खाचरं, गाईगुरांनी गोठा भरलेला, राबायला गडीमाणसे, नदीपल्याड जायला स्वतःची होडी असे समृद्ध, सुखसंपन्न असे आयुष्य.

अशा सुखात नाहतच अजयचे बालपण सरले. रत्नागिरी कॉलेजमधून उत्तम मार्कांनी कॉम्प्युटर इंजिनिअर होऊन तो मुंबईत नामांकित कंपनीत जॉईन झाला. उत्साहाने काम शिकून घेऊ लागला. असेच सहा महिने गेले. पण मायेच्या उबदार घरट्यात वाढलेले अजयचे संवेदनशील मन, मुंबईच्या कोरड्या, आत्मकेंद्रित जगात काही केल्या रमेना. हापूस आंब्याचा घमघमाट, पिकलेल्या काजूबोंडांचा उग्रमधुर गंध, रानजाईचा गंध मनात दरवळत राहिला. लोकलमधील गर्दीत उग्र घामाच्या दुर्गंधीत त्याचा जीव गुदमरत राहिला. स्वतःच्या मातीची ओढ लागून तो कासावीस झाला. खूप प्रयत्न करूनही ऑफिसमधल्या गलिच्छ राजकारणाशी, मुंबईच्या वेगवान रुटीनशी त्याला सांधा जोडून घेता येईना. शेवटी रजेचा अर्ज टाकून तो गावी पोचला.

शास्त्री नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर त्याचं घर. परसूला हाकारा घालताच तो होडी घेऊन आला. “बरं हाय ना धन्यानू” असं मायेने विचारत त्याने होडी वल्हवायला सुरुवात केली. किनाऱ्यावरच्या नारळी-पोफळीची प्रतिबिंबे पाण्यावर हेलकावत होती. वल्ह्याचा डुबुक डुबुक आवाज, थंडगार पाणी आणि पिकलेल्या भात खाचरांचा वास छातीत भरून घेत तो ताजातवाना झाला.

नारळी-पोफळीच्या गर्द छायेत विसावलेले चौसोपी छान मोठे घरकुल, ओसरीवर चकचकित काळ्याभोर रंगाचा, सागवानी लाकडाचा प्रशस्त झोपाळा झुलत होता. त्यावर आजोबा अडकित्त्याने सुपारी कातरत बाबांशी गप्पा मारण्यात रंगले होते. दारासमोर गोमयाने सारवलेले प्रशस्त अंगण होते. लाल कौलांनी शाकारलेला गायी वासरांनी भरलेला गोठा होता. संध्याकाळची वेळ, गोठ्यात गाईंच्या धारा काढण्यात गडीमाणसे गुंतली होती. परसूचे चिमुकले बाळ अंगणभर लडिवाळपणे रांगत ह़ोते. बाळकृष्णच जणू. घराचे नांदते गोकुळ झालेले.

आज नव्याची पूनव होती. घराच्या चौकटीला आई नव्या भाताच्या लोंब्यांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधत होती. आज तो जवळजवळ सहा महिन्यांनी मायेच्या घरकुलात परत आला होता. पाणावल्या डोळ्यांनी आजीने त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. धाकटे शुभम आणि मंजू त्याला लाडाने बिलगले. झोपाळ्यावरच्या आजोबांना त्याने वाकून नमस्कार केला. तशी त्याला पोटाशी धरताना कढत अश्रूंचे दोन थेंब त्याच्या केसात पडले. तगमगणारा त्याचा जीव शांत झाला. मग सगळ्यांनी मिळून नव्या धान्याची पूजा केली. एकत्र पंगत बसली. केळीच्या पानावर आईच्या हातचा गरमागरम भात, वालाचं बिरडं पोटभर खाऊन तो तृप्त झाला. चुलीवर मंद आचेवर आटवलेले दूध पिऊन तो अंगणात आजीच्या मांडीवर विसावला. पोटभर गप्पा रंगल्या. आजीचा सुरकुतलेला मायाळू हात केसातून फिरत राहिला. मग आभाळातला कोजागिरीचा चांदवा त्याच्या डोळ्यात कधी उतरला ते कळलंच नाही त्याला.

पहाटे घंटेच्या किणकिणत्या आवाजाने त्याला जाग आली. आई भक्तीभावाने तुळशीवृंदावनातल्या तुळशीमाईची पूजा करत होती. झाली का रे झोप असं विचारणाऱ्या तिला हसून होकार देत तो उठला, आडावर आंघोळीसाठी गेला‌. तिथं वाडीतल्या बायकांची डोईवर हंडेकळशा घेऊन लगबग चालली होती. तयार होऊन तो गोठ्याकडे वळला. गाईच्या धारा काढणाऱ्या गडी माणसांशी ख्यालीखुशालीच्या गप्पा मारल्या. परसूने पुढे केलेला त्याच्या आवडत्या कपिला गाईच्या निरशा दुधाचा पेला ओठाशी लावत रिकामा केला.

उंच नारळाची झाडे झावळ्यांचे हात हलवून त्याला बोलावत होती. स्वागतासाठी भगवी अबोली, पिवळी कोरांटी, तांबूसकेशरी कर्दळी फुलली होती. कमानीवर गुलाबी मधुमालतीचे झेले सजले होते. तिचा मंद मधुर सुवास मनाला मोहवत होता. आणि त्याची सगळ्यात जास्त आवडती फुलराणी जास्वंदी, पांढऱ्या, पिवळ्या, लालचुटूक रंगांच्या, जास्वंदीच्या फुलांचे जणू रंग संमेलनच भरले होते. त्यात पंचवीस पाकळ्यांची भरगच्च जास्वंदी खुलून दिसत होती. त्याने मुद्दाम बांधलेल्या छोट्याश्या दगडी तळ्यामध्ये जांभळी कमळे फुलली होती. जणू ही सगळी फुले भरजरी शालू, पैठणी नेसून सजली होती. त्यातून चांदणफुलांनी बहरलेली तगर लक्ष वेधून घेत होती. सुस्नात होऊन पांढरेशुभ्र पातळ नेसून सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायला निघालेल्या त्याच्या आई सारखीच ती पांढरीशुभ्र साधीसुधी तगर. पाहूनच अजयचे मन प्रसन्न झाले.

दगडी पायवाटेने सागाच्या पानांची जाळी तुडवत अजय निघाला. केळीच्या बागेत लालचुटूक केळीचे लोंगर लगडले होते. पोहऱ्याचे पाणी बागेतून झुळझुळत होते. एक हवाहवासा गारवा तनामनाला वेढत होता. स्वच्छ मोकळी हवा, पानांची सळसळ, पाखरांचा किलबिलाट, झाडावरचा निळाभोर खंड्या, उगवतीची चमचमती किरणे यांनी त्याच्या मनाचा कोपरा-कोपरा उजळून टाकला. त्याला वाटले, आपल्या आयुष्याची एवढी वर्ष इथल्या हिरवाईच्या अंगाखांद्यावर खेळण्यात गेली. तरीही ही कसली भूल पडते मनाला या हिरवाईची. अन या मायेच्या माणसांची देखील.

मुंबईचा गजबजाट, गर्दी, कोलाहल, जगण्याची शर्यत, कामाच्या डेडलाईन्स, एकलेपणाची, तुटलेपणाची वेदना यावर शीतल चंदनलेप लावल्यासारखं वाटतंय. मग आपणही हाच मनाचा विसावा, शांतवा शहरी धावपळीत अडकून दमलेल्या लोकांना का देऊ नये ? ठरलं तर, ही नोकरी सोडून देऊयात. आयुष्य मुंबईच्या कोलाहलात काढणे शक्यच नाही, अन ऑफिस मध्ये कुणाची हुजरेगिरी करण्याचा आपला स्वभाव नाही. घुसमटून मरून जाऊ आपण. त्यापेक्षा इथं आपल्या शेतीवाडीत कृषी पर्यटन केंद्र सुरू करूयात. ताठ मानेने जगुयात. आपण अनुभवलेला मामाचा गाव पुण्या-मुंबईच्या मुलांना देऊयात. नारळी पौर्णिमेला सागरदादाला वाहिलेला नारळ, नागपंचमीच्या झिम्मा फुगड्या, घरगुती गणपतीचा प्रसन्न सण, वाफाळलेले उकडीचे मोदक, गौरीची सजावट, गोडा तिखटाचा नैवेद्य, दिवाळीचा झुलता आकाशकंदील, उखळात कांडलेला घरच्या पोह्यांचा चिवडा, होळी, शिंपणं, शंखासूर, दशावतारी खेळ यांची माहिती होईल. संस्कृतीची ओळख होईल. ही ऊर्जा घेऊन त्यांचे रोजचं धकाधकीचं जगणं पण सुसह्य होईल.

चालत्या पावलांसोबतच त्याचे विचारचक्र जोरात फिरत होते. परत त्याला वाटले, आपल्या या निर्णयामुळे आई-बाबा काय म्हणतील? नातेवाईक, गावातील लोकं काय म्हणतील ? एवढा शिकून परत शेतीच करत आहे म्हणून हसतील का ? हसले तर हसू देत. आपण खंबीर राहूयात. ही सर्व शेतीवाडी सांभाळल्यामुळे आई-बाबांचा पण भार हलका होईल. दोघे थकलेत आता. त्याच्या विचारांचा वारू आता भरधाव सुटला होता. आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन पण वाढेल. वाडीतील चार पोरांना रोजगार पण मिळेल. ऑनलाईन मार्केटिंग सुरू करू. आपल्या कॉम्प्युटर मधील ज्ञानाचा इथे उपयोग करू. आपल्या आंबे, काजू, फणस आणि नारळी-पोफळींना हक्काची बाजारपेठ मिळवून देऊ. आंबा पोळी, फणसपोळी, कोकम सरबत कितीतरी गोष्टी आहेत आपल्याकडे. वाडीतल्या बायकांसाठी लघुउद्योग चालू करू. त्यांचे ऑनलाइन मार्केटिंग करून गावाचा आर्थिक विकास होईल. मुळात आपल्या मातीत आपल्या मायेच्या माणसांसोबत आयुष्यभर राहता येईल. सर्व बाजूंनी विचार करून तो आता एका ठाम निर्णयावर आला.

लगबगीने घरी जाऊन त्याने उत्साहाने घरातल्या सर्वांना त्याचा निर्णय सांगितला. त्यांचे आनंदाने फुललेले चेहरे बघूनच त्याला त्यांचा होकार समजला. उत्साहाने लॅपटॉप उघडून त्याने आपल्या कृषी पर्यटन केंद्राची वेबसाइट बनवायला घेतली .तिचं नाव होतं.

“यावा कोकण आपलाच आसा ”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: