गिरीजा

मानसी चिटणीस

माझ्या नव-याची बदली होऊन नुकतेच आम्ही बेंगलोर ला शिफ्ट झालो होतो.नवीन शहर, नवे वातावरण, नवे घर..सगळ्याशी जुळवून घेताना थोडा जास्तच वेळ लागला. त्यात बेंगलोरची हवा मला मानवली नाही आणि मी आजारी पडले. आठवडाभर नव-याने बाहेरून खाण्यापिण्याचे आणले पण लवकरच त्याचा ही कंटाळा आला. आता काहितरी वेगळा मार्ग शोधणे गरजेचे होते.मग मी आणि नव-याने ओळखीचे लोक, कंपनीतले सहकारी आणि शेजारी यांच्याकडे स्वयंपाकासाठी मदतनीस शोधण्याची मोहिम सुरू केली; पण आमचे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण करणारे कोणीच मिळेना. त्यात ते रोजचं इडली.. उत्ताप्पा खाऊन सगळी चवच बिघडून गेली होती.

एका रात्री शेजारच्या घराच्या औटहाऊस मधून एका स्त्री च्या रडण्याचा आणि पुरूषाच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी खिडकीतून बघीतलं पण फारसं काही दिसलं नाही आणि आवाजही लवकरच शांत झाले. नंतर स्वैपाकीणबाईच्या शोधमोहिमेत मी ते सपशेल विसरून गेले. पण त्या बाईचे रडणे मात्र कुठेतरी आत शिल्लक राहून गेले. रविवारची दुपार होती. नुकतच काम आवरून मी आडवी झाले होते एवढ्यात डोअरबेल वाजली. दुपारच्या वेळी कोण आलं असावं ? असा विचार करतच मी दरवाजा उघडला. तर शेजारच्या नलीनी आंटी हसत हसत आत आल्या. त्यांच्याबरोबर एक नाकेली चुणचुणीत बाई होती. गळाभर काळ्या पोतीचं ठसठशीत मंगळसुत्र, कानात झुबे, डोक्याला तेल चोपून बांधलेला आंबाडा, दोन्ही हातात हातभर बांगड्या आणि शांत नजरेतून झिरपणारी स्निग्धता.. बघताक्षणीच आवडून गेली ती.

” look, I have bring an angle for you.This is Girija. My caretaker. She will help you for your food preparations. So now onward you carry on with her.” नलीनी आंटी म्हणाल्या. त्यावर “Thank you aunty. Let’s have some coffee.” असे म्हणून मी गिरीजाला सर्व साहित्य दाखवले आणि काॅफी करायला सांगितली. खास दाक्षिणात्य पद्धतीची काॅफी पिताना आधीच आवडलेली गिरीजा मला अजूनच आवडून गेली. “गिरीजा माझ्या आईकडेही काम करते. गरीब घरची आहे पण प्रामाणिक आहे.” नलीनी आंटी सांगत होत्या. मी गिरीजाला नकळत निरखत होते. खरचंच होतं ते !! ती इतर कामवाल्या बायकांसारखी बडबडी वाटत नव्हती. ती नेहमी हसतमुख असे. अंगावर स्वच्छ सुती साडी, डोक्यात फुले माळलेली असत. टापटिपीची आणि चुणचुणीत होती ती. स्वयंपाकघरात काम करतानाही सतत काहितरी गुणगुणत रहायची. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल चकार शब्दही ती काढत नसे. आमच्या सगळ्या मागण्या आणि खाण्यापिण्याच्या फर्माईशी ती अगदी हसतमुखाने पुरवायची. तिच्याबद्दल एकच गोष्ट आम्हाला माहिती होती. ती म्हणजे तिचा नवरा तिला सोडून गेला होता. पदरात एक लहान पोर..शिक्षण नाही, ओळख नाही..मग ती करणार काय दुसरं ?? म्हणून हे स्वयंपाकाच काम तिने सुरू केलं. नलीनी आंटींच्या आऊटहाऊस मधे ती आपल्या मुलासोबत रहात होती. कार्तिक..तिचा मुलगा मोठा हुषार आणि गोड होता.

अचानक दोन दिवस गिरीजा कामावर नाही आली. नलीनी आंटींकडे पण नव्हती. परत आल्यावर कुठे गेली होतीस न सांगता? असा जाब विचारायचे मी ठरवले होते. पण परत आल्यानंतर तिचा उत्साहाने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून मी गप्प बसले. “अक्का, रागावलात ना ! पण अचानक गावाकडे जावं लागलं. वडीलांच्या माघारी जमिनीतला हिस्सा मला मिळू नये म्हणून भावानं कोर्टात केस केली होती. मी आडाणी..! मला काय कळावं त्या कोर्ट कचेरीचं? साधी वकीलाची फी द्यायला पण माझ्याकडे पैसे नव्हते पण गरीबाचा वाली देव असतो बघा. गावातल्या सरपंच बाई उभ्या राहिल्या मदतीसाठी आणि वकील शोधून दिला. वकील साहेबांनी पण सारी हुशारी पणाला लावून मीच माझ्या वडलांची मुलगी असल्याचे सिद्ध करून दाखवले… नाहीतर माझा भाऊ माझ्या जीवंतपणीच जमीनीच्या तुकड्यासाठी मला मयत दाखवायला निघाला होता. “बोलता बोलता ती थांबली तेव्हा तिच्या डोळ्यांत पहिल्यांदाच मी पाणी तरळलेलं बघीतलं..

असंच एक दिवस घरात गिरीजा आणि मी अशा दोघीच होतो. तेव्हा बोलता बोलता मी तिला विचारलं, “गिरीजा, तुझा नवरा भेटतो का ग तुला ? दिसतो का कधी कुठे? कार्तिकला भेटायला येतो का गं कधी ? “त्यावर काहीच न बोलता ती थोडावेळ शांतपणे माझ्याकडे बघत राहिली आणि नंतर म्हणाली “त्याने दुसरं लग्न केलयं.. इथेच पुढच्या चौकातल्या हाॅटेलात तो आचारी आहे. “ते ऐकल्यावर मला धक्काच बसला. ती आपल्या नव-याला रोज बघत होती. तरिही शांत होती, तो दुस-या बाईबरोबर राहतोय हे माहित असूनही….!!” अगं; मग तुला राग नाही का येत त्याचा? “मी विचारलं. “आक्का, आधी खूप राग यायचा. रात्र रात्र रडायचे. उपाशी रहायचे. पण आता विचार करते, जे घडतं ते कुठल्यातरी कारणानच आणि चांगल्यासाठीच घडतं. मी तर नशीबवान आहे. कार्तिक सारख्या समंजस मुलाला मला वाढवायचयं.. मोठं करायचयं माझा मुलगा हुशार आहे. आज्ञाधारक आहे. त्याचे वडील आम्हाला सोडून गेले त्यामुळे आपल्या आईचं दुःख त्याला लहान वयातच कळतयं . माझी त्याला काळजी वाटते. मी जर एकटी असते किंवा मला जास्त मुले असती तर; मला किती अडचणी आल्या असत्या. मला वाटतं, देवाने मला कार्तिक देऊन माझ्यावर कृपाच केली आहे. निदान माझ्यापुढे आता काय करावे? असे तरी प्रश्न नाहीत.”


तुला तुझ्या भविष्याची काळजी नाही का वाटत ? -मी
“ताई मी काळजी कशासाठी करू? आणि काळजी करून मला आणि कार्तिकला कुणी खायला घालेल का? माझ्या अडचणी सुटतील का ? नलीनी अम्मांनी रहायला आऊटहाऊस दिलं. मी कामात चोख आणि प्रामाणिक आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण खुश आहात मला कधी गरज पडलीच तर तुम्ही, आंटी किंवा बाजूच्या सीताम्मा आहेतच की मदतीला, ताई आजवरच्या सगळ्या कडू गोड अनुभवांतून एक गोष्ट शिकलेय. गरजा या वाढतच जातात पण आपण आपली भूक मर्यादित ठेवावी आणि आयुष्याकडं बघताना नेहमी सकारात्मक नजरेनचं बघावं म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं आणि आपल्या भोवती असणा-यांनाही….”

कित्येक पुस्तकातून वाचलेलं, ऑलरेडी माहित असलेलं ते सकारात्मकतेचं विचारधन गिरीजा प्रत्यक्ष जगत होती. आपल्याकडे जे नाही त्याचा सतत विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आहे ते साजरं करण्याची गिरीजाची वृत्ती मला सुखावून गेली. छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून सदा कुरकुरणा-या स्त्रीया एकीकडे आणि ही अशिक्षित गिरीजा दुसरीकडे; जी आपलं आयुष्य आपल्या परीने भरभरून जगत होती.

आमच्या कंपनीत स्ट्रेस मॅनेजमेन्टचे ट्रेनिंग कंपनीच्या कर्मचा-यांना दिले जाते. तिथे आम्हाला महत्वाचा धडा शिकवण्यात आला की जर तुम्हाला सुखी आणि तणावमुक्त व्हायचे असेल तर तुम्ही ते आपलं आपणच शिकावं आणि आत्मसात करावं.
हीच गोष्ट गिरीजा शिकली होती आणि प्रत्यक्ष जगत होती… भुलभुलैया असलेल्या जगात तळपत होती स्वतःच वीज बनून..कोणतेही ट्रेनिंग न घेता…!!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: