सप्तपदी…

 प्राजक्ता रुद्रवार

सप्तपदीचे एक एक पाऊल टाकताना तिला आजवर घडत गेलेल्या घटनांची आठवण येत होती. पुढे चालणारया त्याच्या हातात हात घालुन ती एक एक पाऊल सोबतीने टाकत होती. तिने पायाच्या अंगठ्याने पहिल्या सुपारीला स्पर्श केला व वर-वधू एकमेकांचा सन्मान करु असं म्हणत पहिला फेरा पुर्ण केला.
“हो,बरोबर तर आहे,मनात एकमेकांविषयी सन्मान नसेल तर ते नातं टिकण अवघडच असतं ना…हाच तर पाया आहे लग्नसंस्थेचा…”तिच्या मनात विचारांचा काहुर होता.

तेवढ्यात भटजींनी सांगितले,”आता पुन्हा सुपारीला पायाच्या अंगठ्याने स्पर्श करा व दुसरा फेरा घ्या…हा फेरा परिवाराच्या सुखशांतीसाठी कायमच दोघे जोडीने प्रयत्नशील राहु ह्यासाठी की …म्हणा त्यासाठी मी वचनबध्द आहे…”
तो शांतपणे एक एक पाऊल टाकत होता. त्याच्या थंडगार हाताची तिला भिती वाटत होती. त्याच्या मागे पावलं टाकताना ती स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. खरंतर लग्न संस्थेवरचा तिचा विश्वासच उडाला होता. पण एक एक वचन देत सुपारीला स्पर्श करताना तिला तिच्या कर्तव्याची जाणीव होत होती.
तिसरा फेरा सुरु झाला,” ….कायम बांधील आहोत…”ह्याच्या पुढचे मागचे शब्द तिला ऐकुच येत नव्हते.

हे काँलेजचे शेवटचे वर्ष होते, एका संध्याकाळी ती आणि तिची मैत्रिण काँलेजमधुन येत होते. आईबाबांची मध्यम परिस्थिती असतानाही शिकुन मोठे काही तरी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत ती शिकत होती. ती आणि राखी एकाच परिसरातील असल्यामुळे कायम सोबत येत असत पण दोघींच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. तिला परिस्थितीची जाणीव असल्यामुळे ती कायमच ध्येय पुर्ण करण्याकडे लक्ष देत असे. पण राखीचे शिक्षणात फारसे लक्ष नसे. ती कायम समजावत असे राखीला पण तिच्यात बदल झालेला दिसत नव्हता. त्या संध्याकाळी राखी वळली आणि ती आपल्या घराच्या टर्नवरुन आत येणार तेवढ्यात कोणीतरी मागुन तिचे तोंड दाबले व तिला उचलुन गाडीत बसवले. काय होतंय कळायच्या आत गाडी सुरु झाली.

ती हातपाय हलवुन सुटण्याचा प्रयत्न करु लागली पण त्याची पुरुषी पकड जबरदस्त होती. तिचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. पुढच्या काही वेळात तिला उचलुनच एका रुमवर आणण्यात आलं. तिच्या तोंडावरुन हात दुर करुन त्याने तिला अलगदपणे बेडवर टाकले. ती जोरात ओरडणार त्याच्या आत तो म्हणाला,”चुप ओरडु नकोस…इथे कोणीही वाचवायला येणार नाहिये तुला…”
भेदरलेल्या नजरेने ती त्याच्याकडे पाहु लागली तसे त्याने तिच्यावरची नजर हटवली. तिचे हात पकडुन तो बाजुला बसला,”ऐक,मी तुला काहीही करणार नाहिये,तुझ्यात मला काहीही रस नाहिये…पण तुझ्या त्या श्रीमंत याराची सुपारी घेतल्यामुळे मला तुला उचलुन आणावे लागले आहे…”
ती पटकन ओरडुन म्हणाली,”माझा कोणीही यार नाहिये…” तिच्या तोंडावर हात ठेवत तो म्हणाला,”असे सगळेच म्हणतात..”
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तिच्या तोंडावरचा हात तसाच ठेवुन तो बोलु लागला,”हो सेठ या तुम्ही…आणलीये तिला…”
ती चांगलीच भेदरलेली होती पण तरीही तिला कळत नव्हते की कोण असेल तो सेठ. हा तर दिसायला गुंड वाटत नव्हता.

“तुला पाणी हवंय का? तु घाबरु नकोस….मी काहीही करणार नाहिये राखी..”तो म्हणाला.
“मी राखी नाही…मी रेश्मा आहे…राखीची मैत्रिण…”ती पटकन म्हणाली. तो एकदम दचकला. त्याने मोबाईल वरचा फोटो पाहिला तर तो दुसरीचाच होता. त्याला क्षणभर कळलं नाही की आपण कशी काय अशी चुक केली. त्याने पुन्हा एकदा फोटो पाहिला. लोकेशन व वेळ सांगितली त्यानुसार त्याने तिथुन तिला उचलली होती. असे काही होईल त्याला वाटले नव्हते.

“प्लिज प्लिज तु ओरडु नकोस…मी तुला सोडतो…साँरी…”तो काहीतरी विचार करत म्हणाला. त्याने लगेच त्या सेठला फोन केला,”चुकीची मुलगी आणली आहे…नंतर सांगतो…आधी हिला सोडुन येतो…”
हे सगळं व्हायला रात्रीचे अकरा वाजले होते. त्यामुळे तिचे आईवडिल परेशान झाले होते. गल्लीतले लोक जमा झाले होते. कोणी म्हणत होत की पोलिसांना कळवा आता.

इकडे त्याने ड्राईव्हरला फोन केला व तिला घेऊन तो निघाला. गाडीभर तो अपराधी नजरेने खाली मान घालुन बसला होता. तिच्या घराजवळ तिला सोडुन गाडी पटकन निघुन गेली. ती घरी आली. रडणारया आईवडिलांना काय सांगाव ते कळेना. गेले चार तास आपल्या अायुष्यात काय झालं ह्याचा ती विचार करु लागली. पण सगळेच विचारत होते, तिने थोडक्यात जे घडले ते सांगुन टाकलं. रेश्माच्या आईने कपाळाला हात लावला व ती म्हणु लागली,”तुला त्याने काही केले नाही ह्यावर कसं ग जग विश्वास ठेवणार?आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही…”

काहीही न बोलता ती आत गेली. आईच्या तोंडाचा पट्टा सुरुच होता. तिला सगळं असह्य होत होतं. तिच्या डोळयातुन अश्रुंचा पुर वाहु लागला. पण त्याचा तो अपराधी चेहरा तिला डोळ्यासमोर येत होता.
गेले तीन दिवस तो अस्वस्थ होता. आईच्या आँपरेशन साठी पैसा कसा उभारावा कळत नव्हतं म्हणुन त्याने हे काम स्विकारले होते. पण तिचे आयुष्य बरबाद करायचा आपल्याला काहीही अधिकार नव्हता, हे त्याला कळतं होतं. तिची माफी मागावी म्हणुन गेले तीन दिवस तो जाऊन येत होता पण ती काँलेजला येत नव्हती.

“आता तुझे काँलेज बंद…तुझे लग्न लावुन देणार..बसं झाले ते काँलेज…”आईने दुसरया दिवशी जाहिर केलं,”तो कोण, असं कसं केलं हा विषय वाढवण्यापेक्षा तुझे दोनाचे चार हात करुन टाकायचे…”
एक आठवड्यानंतर ती एकटी काँलेजला जाऊ लागली. राखीच्या संगतीमुळे हे झाले हे तिला कळलं होतं. त्याला काँलेजच्या दारात उभा असलेला पाहुन तिला आश्चर्य वाटलं….तिला पाहुन तो पुढे आला,”रेश्मा मला तुझ्याशी बोलायचं आहे…दोन मिनिट ऐक माझे प्लिज…”
ती तशीच उभी राहिली. त्याला बरं वाटलं. तो बोलु लागला,”आईला कँन्सर आहे…तिला तसं मरताना पाहु शकत नव्हतो, पैसा उभा करु शकत नाहिये म्हणुन ही सुपारी घेतली होती. आयुष्यात पहिल्यांदा…मी असा नाहिये ग…मला माफ कर…प्लिज, गेले चार दिवस मला चैन पडत नाहिये…तुझी माफी मागितल्या शिवाय…”ती काहीच बोलली नाही व आत निघुन गेली.

त्यानंतरच्या घडामोडी फारच लवकर घडल्या. सुकुमार देसाईचे स्थळ स्वत:हुन सांगुन आले म्हणुन आईने एकच तगादा लावला. तिने कितीतरी विनवण्या केल्या पण त्यांनी आता रिस्क नको म्हणत होकार देखिल कळवला. तिच्यावर लागलेल्या आरोपामुळे जे मिळेल ते तिला स्विकारावेच लागणार होते.
“मुलगा जरा मंद आहे कळलंय रेश्माची आई…” कोणीतरी म्हणले.
त्यावर लगेच त्या म्हणाल्या की,”हुशार नाहिये एवढंच…बाकी खुप मोठा बिझिनेस आहे त्यांचा…रेश्माचे असे झालेय माहिती असुनही तयार आहेत हे काय कमी आहे का?”

तिचे लग्न ठरले तेही सुकुमार सारख्या गतिमंद मुलाशी हे ऐकुन तो अस्वस्थ होता. त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला. पण तिची भेट होऊ शकली नाही. लग्नाच्या दोन दिवस आधी त्याने संधी साधुन तिची भेट घेतली,”रेश्मा…माझ्यामुळे तुझे आयुष्य बरबाद झाले आहे…मी तुझ्याशी लग्न करु इच्छितो…फक्त आई अँडमिट आहे म्हणुन लगेच शक्य नाहिये…आपल्या संसाराला पुरेल एवढं तर मी नक्कीच कमावतो…”
तिने समाधानी चेहरयाने म्हणले,”खुप उशीर केलात हे बोलायला…आता जे झाले ते विधीलिखित आहे हे समजुन सोडुन द्या…त्रास होणार नाही जास्त…तुम्ही माझ्याशी काहीही लांच्छनास्पद केले नाहित ह्यातच माणुसकी अजुनही जिवंत आहे समजते मी…मी ज्याची होईल त्याला तरी कुठल्या अर्थी फसवत नाहिये ह्याच्यात आनंद मानते आहे… चुकीचे प्रायश्चित्य म्हणुन लग्न करु नका…एका ऐवजी दोघांचाही संसार सुखाचा होत नाही…आणि लग्न म्हणजे काही पोरखेळ नाहिये, एकदा दिलेल्या होकाराला माझ्या मनात आलं म्हणुन मी बदलु शकत नाही…त्यात दोन परिवार सामावले असतात…देसायांना दिलेल्या वचनाला जागुन मी ही माणुसकी शिल्लक आहे हे दाखवते…”
इतके बोलुन ती निघुन गेली. तिने इतक्या सहजतेने आपल्याला माफ केलं ह्याचा त्याला खुप त्रास होत होता.

सुकुमारशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर आता त्याच्या ह्या बोलण्याचे तिच्या लेखी कुठलेच महत्व नव्हते. शेवटचा फेरा आहे, आता तुम्ही पुढे या असे गुरुजींनी म्हणताच ती त्याच्या पुढे येऊन त्याचा हात धरुन पावलं टाकु लागली,”जीवनातल्या कुठल्याही बरया वाईट प्रसंगात तुमच्या बरोबरीने साथ देण्यासाठी मी कायम सोबत राहिलं…”म्हणत तिने सातवा फेरा पुर्ण केला व हात धरुन सुकुमारला हाताला धरुन आणत बाजुच्या पाटावर बसवले…!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: