वंदी मारतम् 

अनिल पवळ कुंभीजकर

आठवीत व्हतो. आठवा तास पी.व्ही. आ प्पाचा. आप्पा आमाला हिंदी शिकवाय. दिसायला पी.व्ही. आप्पा म्हणजे साक्षात यम. फक्त दिसायला यम बर का! माणूस म्हणचाल तर एकदम शांत. वर्गात शिकवतानी एकादा जोक फिक झाला तर सगळं आंग गदागदा हलवून खदाखदा हसायचे. तर असे हे आप्पा त्या ऐतिहासिक दिवशी आम्हाला कसलं तरी व्याकरण शिकवीत व्हत. करना-काराना-करवाना, खाना-खिलाना-खिलवाना, देना-दिलाना-दिलवाना असा काहीतरी प्रकार त्या दिवशी शिकवत असताना मला चुकून कसलीतरी शंका आली बाबा. मायला त्याकाळी हिंदीतली शंका कधी कुणाला पडत नसावी. आमाला तरी कशाची शंका. पण चुकून चुकीचा तोंडातून शब्द बाहेर पडला अन आप्पाला लय आनंद झाला. त्यांला वाटलं लेकराला शंकाच हाय. त्यांच्या मते नव्हे तर सगळ्याच शिक्षकांच्या मते जो अभ्यास करतो त्यालाच शंका पडतात, हा अलिखित नियम नेमका मला त्यादिवशी लागू पडला. अन खंडागळे सरांच्या नजरेत मी लय हुशार इद्यार्थी झालू. सरांनी लगीच त्याच तासाला तिथंच वर्गात माझं लैच कौतुक कराय सुरवात केली. मग काय आमची कॉलर टाईटच की.      

आख्या वर्गाला माहिती व्हत आमचं गुण काय हायत. पण दस्तुरखुद्द पीव्ही आप्पांनी हुशारीच सर्टिफिकिट दिलंय म्हणल्याव काय व.! आमचा मानेचा दांडा सारखा वरच की. पण मनातल्या मनात. पोरांफूढ फुशारकी मारून जमणार नव्हतं. पोरांला आमची करणी आधीपासन माहीत. पण जाऊ द्या. सरापुढं  तरी आपली इज्जत वाढल्याच पाहून मूठभर मास चढलं.   तास संपला.
नववा म्हंजी शेवटचा तास सुरू झाला. कांबळे सरांचा चित्रकलेचा तास. सगळ्यांच्या आवडता तास. पण मला अजिबात आवडत नसायचा. ह्याला दोन कारणं. एकदा परिक्षेत कुरणात चरणारी गाय आसं निसर्ग चित्र काढत व्हतो. सुपरविजनला असलेल्या व्हीके जाधव सरांनी,
“आर आन्या डुक्कार का काढलइच” असा शेरा मारून माझ्या चित्रकलेवर भर वर्गात बलात्कार केला. तेव्हापासून चित्रकलेला रामराम ठोकला. दुसरं कारण म्हणजे कांबळे सरांच्या तासाला आमच्या गांडमस्तीमुळे व्ही.के. जाधव सरांचं दणकं खाल्लं व्हतं. त्याचं झाल्त असं आस की, कांबळे सराचा तास चालू असताना नेहमीप्रमाणे वर्गात बारा मढ्याचा कालवा सुरु व्हता. नेहमीप्रमाणे पोरांना गप करायच म्हणून “आरं गप बसा की. पोरं हाय का भुतं तुम्ही. काय लाजा बीजा हायत्या का न्हाय, का सोडल्या गटरात.”अशी पिचकारी कांबळे सरानी मारली.

आम्ही आपली गप काशी करायची सोडलं अन् मी मागच्या बाकडावरनं पचाकलु, “गटरात न्हाय गंगेला सोडल्या”. वर्गात एवढा बाजार भरला व्हता की आपला आवाज सरापर्यंत जाणार न्हाय ह्यांची शंबर टक्के ग्यारंटी व्हती. पण तसं झालं नाही. आवाज सरापशी गेला पण कांबळे सरापशी न्हाय तर व्ही. के. जाधव सरापाशी. आमचा वर्ग अन् ग्रंथालय ह्याचं पार्टीशन म्हणून पुस्तकाची कपाटं लावली होती. ह्याच कपाटाच्या म्हाग जाधव सर काहीतरी करत व्हते. नेमकं त्याच टायमाला आमचा डायलॉग तोंडातून थुकला गेला तो थेट जाधव सराच्या मेंदूत. मग काय वर्गात येऊन नुस्ती माझी धुलाई. धपाधप दणक. धपक्यागणिक नुस्ता कुई आवाज निघायचा. तर अशा प्रकारे कांबळे सराचा तास माज्यासाठी नावडता बनला व्हता.

आताच्या तासाला सरांनी कसलतरी चित्र काढायला सगितल. अर्ध्या तासात लेकरांनी काढलं. आम्ही नाही. आम्ही आपल बोंबल भिक्या. ओंक्या, बल्या, मन्या ह्यांच्याबरं बसलु धिंगाणा घालत.ज्यांनी चित्र पुर्ण केलं त्यांनी लगीच तपसून घ्यायला सुरु केलं. अस करता करता आमच्या वर्गातील वंदना, म्हंजी वंदी सरांपाशी चित्र तपसायला गेली आन शाळा सुटण्याची घंटा झाली. सर तिला जाग्यावर जा म्हणू लागलं पण वंदी मरणाची धांदरट, “हेवढच तपसा, हेवढच तपसा” म्हणत तिन तिथचं ठिय्या मांडला. शेवटी सरानी तिच्या पाटीत बकमा घालायला अन वंदे मातरमचे दोन टोल व्हायला गाठ पडली. पाठीत बकमा बसताच वंदी नुस्त “आय्योव” म्हणून कणली. आम्हाला त्याचं काय म्हणून हसायला याव कुणास ठाव. पण वर्ग इतक्या जोरात हसायला लागला की तिकडं वंदे मातरम् आर्ध झालं तरी आम्हाला पत्त्या न्हाय. सर पण हसलंकी खदाखदा. बाकी आख्या शाळेला कळलं होतं आम्ही काय घातली ते. वंदे मातरम झालं अन एक कंमाडोची तुकडी एकाद्या शत्रुच्या ठेप्यात घुसावी तस एक शिक्षकांच टोळकं वर्गात घुसलं. त्यात हेडसर इनामदार, माने सर, करे सर, सरताळे सर, घोळवेसर असे अनेकजण घुसले. त्यांच्या लेखी आम्ही देशद्रोह केला व्हता. मग काय जे बोलणार नाही ते आळशी अशी आमच्या वर्गात परीस्थिती निर्माण झाली. बाहेरून जे शिक्षक यायचे ते ‘‘ह्यांना आकला न्हायत्या, वाया गेलेला वर्ग, लय नालायक, बेशिस्त वर्ग”  अशी गर्जना करायचे. लय शिव्याशाप देण्याचा कार्यक्रम सुरु व्हता.

एखाद्या अबलेवर आता लय मोठा सामूहिक बलात्कार होणार असतो अन त्याची तिला पुर्वकल्पना असते, अशा अविर्भावात आम्ही आपलं गप काशी करत व्हतो. पण तेवढ्यात आठव्या तासावरनं गेलेलं पी. व्ही. आप्पा वर्गात अवतरलं. अन त्यांनी बी दोन चार शिव्यांच्या पिचकाच्या आख्या वर्गावर मारल्या. पण त्यातच ते बोलु लागले, “अजिबात शिस्त नाही पोरांना. ज्यांना अभ्यास करायचा असतो त्यांला पण अभ्यासकरू देत नाहीत. आता त्या अनिल पवळलाच बघा. किती शांत अन हुशार विद्यार्थी आहे. पणह्या नालायकांमुळे त्याला मागच्या बाकावर बसाव लागतं. तो खुप हुशार विद्यार्थी आहे. अशा विद्यार्थ्याला पुढे बसायला घ्यायला पाहीजे. ह्या बाकीच्यांचा काय उपेग नाही. पवळसारख्या विद्यार्थ्याचा अशा बेसिस्त कार्ट्यांमुळे तोटा होतो.” अस उद्गार सराच्या तोंडूनबाहेर पडताच खाली मान घालून उभा असलेला वर्ग तशाच अवस्थेत बुबळ माझ्याकडे फिरवून मलापहायचा प्रयत्न करत व्हते. सर असा माझा उदो-उदो करत होते. ते एकून मला तर आता आपुन खरचं हुशार बिशार हाय का काय अस वाटायला लागून भ्या वाटू लागल.

भ्या ह्याच्यासाठी की बाबा आपल्याला हुशार समजून एकांद्या शिक्षकानी एकाद गणित सोडवायलादिल म्हंजी उगच खालचा अंधार आख्या तालुक्याला कळून जायचा. त्यापेक्षा ती हुशार असण्याचं लुगडे नेसायलाच नग अस वाटायच.  झालं. आमचं कौतुक करून झालं अन् चार जणांनी चार लायनी वाटून घेत सपासपा हातावर छड्या द्यायला सुरू केलं. छडीगणिक नालायक, बेशिस्त अशा शिव्या तोंडी लावायला झालं. आमचं कौतुक करून झालं अन् चार जणांनी चार लायनी वाटून घेत सपासपाहातावर छड्या द्यायला सुरू केलं. छडीगणिक नालायक, बेशिस्त अशा शिव्या तोंडी लावायला दिल्या जात होत्या. मार दिल्यावर बाहेर जातानाबी मुख्याध्यापकाचा आत्मा काय थंड होइना. अजून एकादा नियम लादता येतोय का ह्यांच्यावर हाच इचार बाबुरावच्या मनात सुरू व्हता. एकतासाभराच्या कोर्ट मार्शलनंतर आमची सुटका झाली. बाकीच्यांना छड्यांचं वाईट वाटायच तर  हिकडं पी.व्ही आप्पांनी आमची कॉलर टाईट करुन मानगुटीवर बिनकामाचं वजन ठिवल्याल.  बर हे आख्या वर्गाला माहित की म्हागची लाइन किती तमासगीर हाय. तरीबी आन्याला कोणत्या बेसिसवर सर हुशार म्हणत अस्त्याल ह्याचा पुढच्या रांगावाली लेकर इचार करून यांग आली अस्त्याल. दोन दिवस जरा हुशारपणाला सोभल आस आदबीनं वागत व्हतो.          

दोन दिवसानंतर आप्पाचा पुन्हा तास. आप्पांचं शिकवून झालं. पण जाता जाता त्यांनी एक महत्वाचं सांगायच म्हणून सूचना दिली. सामूहिक मार खाल्ल्यापासून जरा कालवा कमी केला होता पोरांनी. सर कायतरी महत्त्वाचं सांगाणार हायत म्हणल्यावर सगळ्यांनी कान टवकारलं. पी.व्ही. आप्पाबोलू लागले, त्यादिवशी तुम्ही घातलेल्या गोंधळानंतर मी चार-दोन जाणांशी बोललो. त्यांच्याकडून मला असं समजलय की तो पवळ हाय ना, त्याच्या अंगात तर बारा माकडाचा खेळ हाय.” असं वाक्य सराच्या तोंडून पडताच आख्खा वर्ग ख्या ख्या करत सरांच्या साक्षात्कारावरहसू लागला. अन आमचा दोन दिवसाचा पोशाख उतरवून घेण्यात आला. आमीबी लाजून चूर चूर झाल्यागत नाजूक हसलो. वंदीच्या कृपेने झालेला हा दोन दिवशीय सत्कार कायम मनात घर करून आहे.

One thought on “वंदी मारतम् 

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: