फ्रॉक

कीर्ति अधिकारी

खुशी शाळेत बाईंची लाडकी आहे ती फक्त  हुशार आहे म्हणून नव्हे, तर ती डान्स असा करते की बघणारे बघतच रहातात.  बरे तिची पार्श्वभूमी म्हणाल तर ती इतर राज्यातून आलेली बांधकाम मजुराची मुलगी आहे. दोन वेळ जेवणाची भ्रांत आईबाप दोघेही मजुरी करणारे.  घरात खाणारी 6 तोंडे.  पण याही परिस्थितीत बाईंनी  तिच्या घरच्यांना समजावले होते की  जो पर्यंत तुम्ही इथे रहाल तोपर्यंत तरी तिला शाळेत पाठवा. त्यामुळे खुशी  शाळेत येउ शकणारी. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही तिची  शाळा कधी चुकायची नाही सतत हसतमुख असायची त्यामुळेच  बाईचे तिच्यावर विशेष प्रेम. 
 अशातच  एक आंतरशालेय डान्स स्पर्धा जाहीर झाली. बाईंनी खुशीचे नाव दिले.  खुशीच्या झोपडीत वीजच नव्हती.  बाईनी जास्त वेळ थांबून शाळेतच तिला सराव करायला सांगितला. त्यात तिला  कोणतेही मार्गदर्शन मिळणार नव्हते.  पण एखाद्या  डान्सचा व्हिडीओ पहिला की खुशी त्यातल्या काही स्टेप्स आणि मनाच्या  काही असे मिश्रण  करून  स्वतःच डान्स तयार करायची. याही वेळेस  अशा रीतीने सज्ज झाली ती स्पर्धेला. 
 बाईंची अडथळ्यांची शर्यत अजून सम्पली नव्हती. कारण  खुशी साठी पोषाखाची व्यवस्था,  मेकअप ची व्यवस्था सगळे त्यांनाच  बघायचे होते.  तिच्या आई वडिलांना याचे काहीही सोयरसुतक नव्हते. किंबहुना त्यांचा हा प्रांतच नव्हता.  बाईंची मुलगी पण खुशी एवढीच होती तिला आत्ताच वाढदिवसाला एक सुंदर फ्रॉक घेतला होता.  जो तिचा सर्वात आवडता होता.  तोच खुशीला घालावा थोडा मेकअप करावा तिचा आपणच घरी असलेल्या साहित्यातून असे बाईंच्या मनात होते पण…
पण तिथेच होता आपली लेक तो फ्रॉक द्यायला तयार होईल का?  नवीनच असल्यामुळे सध्या तरी तोच तिचा लाडका फ्रॉक होता.  शिवाय वय लहान असल्याने ती समजून घेईल का?  पुढचे पुढे बघू या. सध्या खुशीचा सराव सुरू ठेवूया. असा विचार  करता करता स्पर्धेचा दिवस येऊन ठेपला.  बाईंनी मुलीला कसे तरी समजावले की मी तुझा फ्रॉक जाताना घेऊन जाईन आणि येताना लगेच घेऊन येईन शेवटी मुसमुसत तिने तो फ्रॉक दिला.  बाईंनी पटकन तो खुशीला घातला थोडा मेकअप केला आणि पटकन तिला घेऊन त्यांच्या स्कुटी वरून कार्यक्रम स्थळी रवाना झाल्या. 
 खुशी ने नेहमीप्रमाणे डोळ्यांचे पारणे फेडणारा डान्स केला.  पुढे बरेच नंबर होते  उशीरही बराच झाला होता आणि स्पर्धेचा निकाल नंतर  लागणार होता.  बाईंनाही घरी जायची घाई होती त्यांनी खुशीला बरोबर घेतले. पहिले तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले आणि धावतपळत घर गाठले.  पण गडबड इथेच झाली खुशीकडून फ्रॉक घ्यायचा राहिलाच…
त्या जरा दबकतच घरात आल्या.  लेक झोपी गेलेली पाहून त्यांना हायसे वाटले. चला आजच्या पुरता प्रश्न मिटला.  उद्या शाळेत खुशी फ्रॉक घेऊन येईल आणि प्रश्न मिटेल असे मनात आणून त्या झोपी गेल्या.  सकाळची शाळेची गडबड असल्याने लेक फ्रॉकचा विषय विसरली होती बाईंना हायसे वाटले.  त्या पण त्यांच्या शाळेत पोहचल्या.  आल्या आल्या त्यांचे डोळे खुशीला शोधु लागले पण खुशी तर शाळेत आलीच नव्हती.  कालच्या कार्यक्रमामुळे दमली असेल येईल उद्या असा विचार त्यांनी केला.  शाळा सुटताना तिच्या शेजारी रहाणाऱ्या मुलीजवळ त्यांनी निरोप पाठवला की उद्या येतांना खुशीला फ्रॉक आणायला सांग.  पण खुशी दुसऱ्या काय तिसऱ्या दिवशी पण शाळेत आली नाही.  घरी त्यांना लेकीला  समजवताना नाकी नऊ यायला लागले.  आज  स्पर्धेचा निकाल  लागला. 
 खुशीला प्रथम क्रमांक मिळाला. पण निरोप देऊनही खुशी आलीच नाही बाईच एकट्या जाऊन बक्षिसाची ट्रॉफी घेऊन घरी आल्या.   बाई घरी आल्या तेव्हा त्यांची लेक हातात बॅग घेऊन तयारच होती.  त्यांना तसेच हट्टाने  ती खुशीकडे घेऊन गेली.  बाईंचा पण आज नाईलाज झाला.  बाईंना पाहून पहिले खुशी कशीनुशी हसली. पण नंतर भीतीने तिचे अवसान गळाले ती रडायलाच  लागली.  तिच्या आईने पुढे होऊन बाईंना सांगितले की त्या दिवशी फ्रॉक घालून आलेली खुशी इतकी सुंदर दिसत होती की सगळी वस्ती तिला पहायला येत होती खुशीला आयुष्यात पहिल्यांदाच असे कपडे घालायला मिळाले आणि तिने तो रात्री पण काढून ठेवला नाही सकाळी दरवाज्याच्या फटीत अडकला आणि थोडासा फाटला.  आता आम्ही गरीब कसा भरून देणार हो तुम्हाला?  तेव्हा मीच म्हटले तिला दे शाळा सोडून आणि घरच्या लहान लेकराला संभाळ.  
इतका वेळ हे सर्व ऐकत असलेली बाईंची लेक आता  पुढे झाली  तिने तो फ्रॉक खुशीला परत घालायला लावला  बॅग उघडून फ्रॉक वरची मॅचिंग ज्वेलरी मॅचिंग बूट तिला घालायला लावले ट्रॉफी तिच्या हातात दिली.  टाळ्या वाजवल्या बाईना फोटो काढायला लावला.  बाईंचे  डोळे भरून आले.  एकीकडे आपली लाडकी लेक समजदार झाली तर दुसरीकडे खुशीची शाळा क्षुल्लक कारणावरून बंद होता होता वाचली होती.  त्यांनी उद्यापासून  खुशीला शाळेत नक्की पाठवण्यासाठी  तिच्या आईचे मन वळवले होते.  घरी परत येताना लेकीने सांगितले की तिच्या बाबाने तिला आज  समजावले होते की खुशी कशी गुणी आहे.  पण तिच्याकडे खूप कपडे नाहीत आपण असा फ्रॉक परत घेऊ शकतो पण खुशीच्या बाबांना शक्य नाही.  मग मीच तो फ्रॉक तिला देऊन टाकायचे ठरवले.  बरोबर केले ना  मी आई?बाईंना  गळा भरून आला होता त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि  या दिवाळीत आपण खुशीला आणि लेकीला सारखेच कपडे घेऊ या असे त्यांनी  मनात ठरवूनच  टाकले. 

2 thoughts on “फ्रॉक

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: