ब्लू अम्ब्रेला

मानसी चिटणीस

रोज संध्याकाळी तराईतल्या देवदारांच्या रांगेत फिरायला जाणे मला आवडायचे नेहमीच. तिथली गुढ शांतता मनाचा तळ चाचपायची. स्वतःचीच स्वतःला भेटण्याची रोजची वेळ होती ती माझी. फिरता फिरता स्वतःशीच संवाद चालू असायचा माझा. तर एखादी तरल सुरावट गुणगुणली जायची. काही क्षण तराईत लपलेल्या छोट्याशा झऱ्याशी गप्पा मारण्यात जायचे अन् परतीच्या वाटेवरचे पामवृक्ष हाय हॅलो करायला झुकल्यासारखे उभे असायचे.

रस्त्याच्या पलीकडे काही बैठी घरे आणि काही दोन मजली बंगल्या होत्या. त्या बंगल्यांना वळसा घालून पुढे आले की तीचे हिरवाईत लपलेले टुमदार घर दिसायचे अन् खिडकीत बसलेली ती देखील. माझी रोजची वेळ माहिती असल्यासारखी ती माझ्यासाठी खिडकीत येवून थांबलेली असायची. तिचे आकाशी रंगात रंगलेले घर त्या हिरवाईत खुलून दिसायचे. बेला स्वान,तिचे नाव. एक खूपच गोड आणि रसरशीत मुलगी. चित्रकार होती. मी दिसले की हात उंचावून हाक मारायची. कॉफीसाठी आग्रह करायची. त्या कॉफीच्या एका कपावर आमच्या असंख्य गप्पा चालायच्या. ती तिच्या चित्रांबद्दल,रंगांबद्दल भरभरून बोलायची. आपल्या घराला ती ब्लू अम्ब्रेला म्हणायची आणि कारण विचारलं तर खट्याळपणे डोळे मिचकवायची. तिच्या त्या आभाळमग्न डोळ्यांत अनेक रंगांची इंद्रधनुष्य जन्म घ्यायची. कधीकाळी शुभ्रधवल रंगाची चाहती असलेली ती, आपल्या समोरच्या कँन्हवासवर खुलवायची साऱ्याच रंगांचे पिसारे. आपल्या कुंचल्यांच्या ओंजळी रित्या करता करता गुणगुणायची एखादी अलवार कविता. तिची सारी स्वप्ने झिरपत्या पावसात किंवा उन्हाच्या ओझरत्या दुपारी नाहीतर पानझडीच्या शेवटच्या पानापर्यंत रंगत रहायची. कँनव्हासवर उमलत रहायची सतत एक नवी कहाणी.

आमच्या गप्पा चालू असताना डेव्हिड, तिचा नवरा देखील येवून सामिल व्हायचा. तो व्हायोलीन वाजवायचा. कधीकधी आम्हालाही एखादी सुरावट ऐकवायचा. त्यादिवशी संध्याकाळी देखील बागेत अशाच गप्पा रंगल्या ज्याच्या त्याच्या डेस्टिनी बद्दल आम्ही बोलत होतो. बाहेर रस्त्यावर तुरळक रहदारी होती. सफरचंदांची वाहतूक करणारे ट्रक सावकाश वळणावळणाने रस्ता कापत होते. अचानक बेला ताडकन उभी राहिली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली.काही क्षणांतच ब्रेक करकचून दाबल्याचा आवाज आला आणि एक अस्फुट किंकाळीचाही..आम्ही सारे रस्त्यावर धावलो तर बेला रस्त्यावर जखमी अवस्थेत पडली होती अन् शेजारी घाबरून थरथरणारी एक चिमुकली रडत होती. ट्रक चा ड्रायव्हर ट्रक तिथेच सोडून पळून गेला होता. ट्रकखाली येणाऱ्या त्या चिमुकलीला बेलाने वाचवले होते पण आपल्या डोळ्यांच्या बदल्यात.त्या अपघातात बेला आपले डोळे गमावून बसली होती.

त्यानंतरच्या तिच्या अनेक काळोखवेळा तिचे अस्तित्व शोधण्यात घालवल्या होत्या. त्याकाळात मी तिला भेटायचे.तिच्याशी बोलायचे.तिला सतत सांगायचे,”बेला,डिअर परमेश्वर कधीच आपल्यावर अन्याय करत नाही. एक दरवाजा बंद झाला तरी तो आपल्यासाठी दुसरा दरवाजा नक्की उघडतो. तुझ्यासाठीही त्याने नक्कीच काहितरी योजले असेल.” यावर ती क्षीण हसायची. तिच्या दृष्टिहीन डोळ्यांतून अश्रू पाझरायचे. ती आतल्याआत मिटत जायची. मला कळत होते या सगळयांतून सावरणे तिला खचितच अवघड जात होते. पण सावरली ती हळूहळू. म्हणायची,”स्वतःच्या कमीपणावर,न्यूनतेवर हसता आलं की मनाचा कणखरपणा वाढतो. मग जगात सहजपणे हसायला जमते.”

शिशिरातल्या ऊन खाऊन टम्म झालेल्या कित्येक दुपारी तिने तिच्या खिडकीत बसून वाचल्या होत्या.सोबत असायचा तिचा लाडका ओ हेन्री. जसे की त्याने आपल्या साऱ्या कथा हिच्यासाठीच लिहिल्या असाव्यात. त्यातली मँचबॉक्स गर्ल किंवा द लास्ट लिफ या तिच्या विशेष आवडीच्या. आपल्या कँनव्हासवर उतरवलेल्या सोनेरी कडांच्या पानालाही तिने ती लास्ट लिफ ही कथा वाचूनही दाखवली होती. ब्रेल च्या पट्टीवर वाचताना सराईत फिरणारी तिची बोटं पियानोही तितकाच सफाईने जिवंत करत. जाणिवेच्याही पलीकडे वावरायच्या तिच्या संवेदना.

मी रोज दुपारी तिच्याशी गप्पा मारायला जायचे. तिला वाचून दाखवायचे. कविता म्हणून दाखवायचे. तिला टागोरांच्या कविता विशेष आवडायच्या. टागोरांच्या कवितांमधील स्पंदने ती वेचत रहायची. भरभरून बोलायची मानवी नात्यांच्या गुंत्यावर. बाहेरचे डोळे हरवले तरी जणू तिचे आंतर्चक्षू जागे झाले होते. बेला मला अजूनच आवडायला लागली होती. तिचे हसणे एखाद्या झऱ्यासारखे निर्मळ होते. मला नेहमी नदीवर फिरायला घेऊन जाण्याचा ती हट्ट करायची. तिथे गेल्यावर मात्र तिच्यात खूप बदल जाणवायचा. मला नेहमी विचारायची,”मनूदी,ही नदी,आकाश खरच ब्लू असतात का गं?की केवळ त्या त्यांच्या निळेपणाच्या त्या कहाण्या आहेत?हे पक्षी स्वतःच रंगवतात का त्यांचे पिसारे?अन् सारीच पाने माझ्या चित्रांतल्या पानांसारखी सोनेरी कडांची का नसतात? हे आणि असे असंख्य प्रश्न ती छेडायची. काही प्रश्नांची उत्तरे खरच माझ्याजवळ नसायची,पण मला आवडाचये तिच्याशी बोलायला. तिची बोटे लांबसडक आणि निमूळती होती. एखाद्या जन्मजात कलाकाराची असतात ना तशीच. मी तिचा हात हातात घेऊन गुणगुणायचे बऱ्याचदा..तेव्हा कधीकधी तिच्याही मंद गुणगुणण्याचा मला भास व्हायचा. असं वाटायचं त्या गाण्याने प्रत्यक्ष समोर यावं आणि तिला आपल्या स्वरांमधे चिंब भिजवावं.

व्हायोलीनची करूण सुरावट तिला चित्र काढताना ऐकायला आवडायची अन् सोबतीला तिचा तो आभाळाचा मखमली रुमाल.

कँनव्हासवर मी तिची बोटं टेकवायचे तेव्हा एखाद्या फुलपाखरासारखी ती कँनव्हासवर भिरभिरायची. बेला मला नेहमी म्हणायची,

“मी ना ब्लू अम्ब्रेला होईन आणि वाऱ्याचा हात धरून वाहत जाईन नदीपल्याडच्या सोनेरी पानांच्या गावात.” मी हसायचे आणि कल्पना करायचे ती निळी छत्री होऊन वाऱ्यावर उडतेय अशी..मग माझ्याही डोळ्यांत ती सोनेरी पानं गर्दी करायची.

एका संध्याकाळी मी येशूदासचे गीत सहजच गुणगुणत होते,”जब दीप जले आना,जब शाम ढले आना”.तिने थांबवले मला आणि म्हणाली,” दि,ही संध्याकाळ जीव घेते गं.” तिचा तो अस्वस्थ कोपरा तिने कधीच उघडा केला नव्हता.डेव्हिड,तिचा नवरा तिला सोडून गेला होता तिला. अपघातात तिचे डोळे गेल्यानंतर त्याने तिच्या मैत्रिणीशीच लग्न केले होते अगदी अनपेक्षितपणे. आपले हे दुःख सहसा ती ओठांवर येवू देत नसे. पण कधीतरी जखमेची खपली निघून यायची अन् घाव पुन्हा ओला व्हायचा. काही दिवसांनी डेव्हिड आला होता तिची माफी मागायला. तुलाही सांभाळतो असे तिला म्हणाला. पण त्याच्या बोलण्यातली ती वरवरची भावना तिला जाणवली अन् तीने नकार दिला. डेव्हिडचे तिला सोडून दुसरे लग्न करणे हेच तिच्यासाठी इतके वेदनादायक होते की आता तिलाच तो तिच्या आयुष्यात पुन्हा नको होता. डेव्हिड खट्टू होवून परत गेला. काही दिवसांनी हिला आलेल्या अंधपणामुळे संपत्तीची देखभाल करण्यासाठीची पॉवर ऑफ अँटर्नी डेव्हिडने कोर्टाकडे मागितली आणि ही आतून उन्मळून आली. तरिही ठाम निर्णय घेऊन तिच्या संपत्तीचा तिच्या नावे अंध मुलांसाठी ट्रस्ट करण्याचा निर्णय तिने घेतला. या काळात डेव्हिडने दिलेल्या मानसीक यातना कमी होत्या की काय म्हणून डेव्हिडने हिच्या म्रुत्यूचा कट रचला असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेनंतर ती आतल्याआत मिटत गेली.अबोल होत गेली.

मधल्या काही दिवसांत कामाच्या व्यापामुळे मला तिच्याकडे जाणेच जमले नाही. तिच्याकडूनही काही निरोप आला नाही. अशाच एका पावसाळ्यातल्या ओल्या संध्याकाळी तिच्या बाबांचा भेटून जाण्यासाठी निरोप आला. मी दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी गेले. तिच्या रुमची खिडकी बंद होती. घरही जणू फिकूटले होते.”हे तुझ्यासाठी.”तिच्या बाबांनी एक पँकेट माझ्या हातावर ठेवले अन् म्हणाले ,”हे तिने तुला द्यायला सांगितले होते. मोठाच आघात झाला होता तिच्यावर. डेव्हिडवर जिवापाड प्रेम केले तिने. त्याच्या विश्वासघाताने उन्मळली होती पोर.पण फार धिराने घेतले तिने आणि स्वतःसोबत तिने मलाही सांभाळलं. अंधधशाळेत जाऊन रहायचा,तिथल्या मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेऊन तिने स्वतःला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलयं.” एवढं बोलून तिचे बाबा शांतपणे स्वतःतली खळबळ लपवत चिरूटाच्या धुरात डोळ्यातले पाणी लपवत राहिले. मी थोडीशी सुन्न, थोडी अस्वस्थ होऊन परत यायला निघाले. तिचा थोडा राग ही आला होता. मला एका शब्दानं बोलली नाही कधी. की आपला हा निर्णय मला कळवलाही नाही. मनात विचारांच्या वावटळी उठल्या होत्या. का नाही बोलली ती मला? का इतकं सगळं एकटीने सहन केलं? मला आठवलं, ती मला नेहमी म्हणायची,”माणंसानं आभाळ व्हावं आणि आपल्या साऱ्या माणसांच्या चुका पोटात घ्याव्यात. आभाळ नाही का साऱ्या पृथ्वीला आपल्या छायेत सामावून घेतं. खरतर आभाळ ही एक मोठ्ठी छत्री आहे जी आपल्या लेकरांच्या साऱ्या बऱ्यावाईट गोष्टी आपल्यात सामावून घेते. आपल्या मनाला हे मोठेपण बहाल करते. सगळ्यांना समजून घेण्याचं कसब शिकवते. ही निळी छत्री जगणं शिकवते..मलाही अशी आभाळाची छत्री व्हावस वाटत बरेचदा.

याच विचारांत मी भरकटताना सहजच माझे लक्ष आभाळाकडे गेलं तर उगाचच एक ब्लू अम्ब्रेला वाऱ्यावर उनाडताना दिसली. भरल्या डोळ्यांनी घरी आले अन् हातातले पँकेट उघडले तर त्यात एक पत्र होते माझ्यासाठी. त्यात लिहिलं होतं,”दि मी जातेय ब्लू अम्ब्रेला व्हायला. मलाही आभाळ होऊन जगायचेय. जमल तर स्वतःला शोधायचेय. मला खात्री आहे की माझ्या निर्णयात तू नेहमीच माझ्या सोबत आहेस. मुद्दाम तुला न भेटता जातेय नाहीतर कधीच बाहेर पडू शकले नसते. मला समजून घेशील ही खात्री आहे. तुझीच बेला.”

पत्रासोबत सोनेरी बॉर्डर असलेली एक वही होती अन् त्यावर लिहिले होते,

तुझीच
‘ब्लू अम्ब्रेला’..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: