साथ

आमची सोसायटी तशी उच्च मध्यमवर्गीयांची. सर्व सोयी सुविधांनी युक्त. येथे छान बाग आहे, छोटस मंदिर आहे, रेक्रीयेषन होल आहे, फिरण्या साठी स्वतंत्र व्यवस्था आहे.
सार कस छान आहे.तरी पण बागेतली काही झाड जरा सुकलेली दिसताहेत, फांद्या वेड्या वाकड्या वाढल्याने आणि कंपाउंड ओलांडून पलीकडच्या सोसायटीत गेल्याने त्यांच्यात पूर्वी सारखा उमदेपणा वाटत नाहीये. फिरण्याच्या रस्त्यावर धूळ आलीय, पर्किंच्या पिवळ्या पट्ट्या धूसर झाल्यात, ग्यालरीच्या भितींवर काळे ओघळ दिसू लागलेत. तरी पण ठीक आहे.
आमचे साने आजोबा पहिल्या मजल्यावर १०२ नंबरच्या प्रशस्त सदनिकेत राहतात. साने म्हणजे अगदी फाउंडर मेंबर, गेली १५ वर्षे रहाणारे आणि चांगली १० वर्षापासून बर्यापैकी पेन्शन असणारे गृहस्थ. पूर्वी अगदी हौशी वाटणारे हे आजोबा अलीकडे जरा विचीत्रासारखे वागताहेत.

आजचीच गोष्ट बघा, सकाळी जानकी आजीनी चांगला आल घालून चहा करून दिला आणि यांचा घेताना बशीतून शर्टावर सांडला पण बोलणी मात्र आजीना. चांगले फिरून आलेत, आणि बेल बघा कशी चारदा चारदा वाजवतायेत. जानकी आजीनी दार उघडताच यांचा तोंडाचा पट्टा सुरु. “काय हे! कश्या गाड्या लोक लावतात, अगदी चालायला रस्ता सोडणं नाही, नीटपणे वाहन उभी करण नाही. कोणाला कसली शिस्तच राहिली नाही. तुला सांगतो जानकी एकेकाला चांगले फटके मारले पाहिजेत त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.” तरी जानकी आजी समजुतीच्या स्वरात “अहो हो हो” म्हणत पाणी देतात, ते पिताना पुन्हा ठसका लागतो, तरी तोंड चालूच. आजी पाठीवरून हात फिरवत समजुतीच्या स्वरात म्हणतात, कळतंय हो मला,पुढच्या आठवड्यात आपल्या उदयचा वाढदिवस आहे आणि त्याच्या आठवणीने तुम्ही अस्वस्थ झालात. पण शांत राहा असा त्रागा करून फक्त स्वतः ला त्रासच होतो ना. समजुतीच्या सुरात म्हणाल्या, अहो अस बघा, आता तो अमेरिकेला गेल्याला ८/९ वर्ष झालीत, त्यामुळ तशी त्याच्या नसण्याची आपल्याला सवय करून घ्यायला हवी. द्या ना सोडून तो विषय. दुसर कश्यात तरी मन रमवा. तो पेपर आलाय, तो वाचा अथवा टीव्ही बघा.
आजोबा तरी ओरडतात. अग काय त्या पेपरमध्ये नुसत्या चोर्यामार्या,खून, बलात्कार यांच्याच बातम्या आणि तो टीव्ही तर नुसत्या ओंगळवाण्या गोष्टींच प्रदर्शन. नकोच ते. हे वाचून पाहून वाटत जगात काही चांगल घडतच नसाव. जानकी अगदी नको नकोस झालय बघ सगळ.

आजी बाहेरचा कानोसा घेतात, खिडकी बाहेरच्या मोठ्याश्या झाडाची जुनाट फांदी झोम्बणार्या वार्याच्या धक्क्याने कुरकुरत असते.
आजी खिडकीतून बाहेर डोकावतात आणि सांगतात आहो पाहिलत का नवा माळी आलाय ना तो त्या फांदीला आधार देवून निट करतोय आणि बघा बघा फांदीला फुटलेली नवी पालवी किती छान वाटते बघायला. पण आजोबा मात्र ठाम. काही सांगू नकोस, आज दिसलेली पालवी उद्या गायब झालेली असेल आणि पुन्हा तेच सुकलं खोड पहात बसाव लागेल आणि अस म्हणत बेडरूम मध्ये निघून जातात. आता आजी थोड्याश्या नाराजीने त्यांच्या कडे बघत स्वैपाक घरात जायला निघतात तेवढ्यात दारावरची बेल वाजते आणि या उघड्या दारासमोर एक लोभस तरुण उभा असतो.
आजी मी आनंद. आजच शेजारी राहायला आलोय. सामान लावून आंघोळ वगैरे उरकलं फ्रेश झालो, ग्यास पेटवला, पाणी घालून चहाच भांड शेगडीवर ठेवल आणि लक्षात आल कि इतर सार सामान आणलाय पण मुख्य साखरच राहिली. आजी प्लीज चमच्या भर साखर देता का? आता खाली जावून आणायचं म्हणजे पाणी पार आटून जाईल.

आजी भान विसरून ते त्याच भारावणार बोलणं तन्मयतेने ऐकत होत्या त्यांना वाटत होत आपल्या विनयचेच बोल या जुन्या भिंतीतून प्रतिध्वनित होतायत. खरच हा अगदी विनय सारखा बोलतोय आणि तसाच वाटतो. परत मनाशीच म्हणतात काहीतरीच बाई मनाचे हे खेळ दुसर काय!
आता हळू हळू आनंदच येण जाण वाढू लागल. त्याच प्रेमळ वागण आजीना भावू लागल. बाहेरच्या बागेत या श्रावणात पारीजातकाला जरा जास्तच टपोरी फुल आल्याच वाटू लागल. आज सकाळी तर फिरून येताना सान्यांनी ओंजळ भर फुलही आणली. आणि फुल ठेवता ठेवता म्हणाले जानकी आज काल तुझ त्या आनंदशी आगदी आपल्या विनय सारख सुत जमलय. तरी लक्ष्यात आसू दे अस जीव लावण आपल्या नशिबी परत दुखः टाकून जाईल. तेंव्हा सावध हां!

मनातून उभयतांना कितीही धास्ती, भीती आणि अस्थिरता वाटत असली तरी या आनंदी फुला भोवती त्यांच मन आता चांगलच फेर धरू लागल. मायेचा मकरंद चाखताना फुलाची निगा राखण्यासाठी एक हळवी थरथर ताल धरू लागली. या श्रावणात आलेल्या सणांना दारापुढे रांगोळी बहरली, देवाला मनापासून नेवेद्य मिळाला. भाद्रपदात गणपतीची आरास गौरी पेक्षा उजवी झाली. आणि अश्विनातली दिवाळी सोन पावलांनी आली. या पाडव्याला सान्यांनी आपल्या जानकी साठी साडी बरोबर गजराही आणला.आणि गंमत म्हणजे जानकी आजींनी सान्यांसाठी कानटोपी विणताना त्यांच्या कडून चक्क आनंदाच्या मापाच टोपडे कसे विणल गेल हे त्यांच त्यांनाच कळलच नाही. आणि पुढची गंमत म्हणजे आनंद ते घालून घरभर नाचला. खरच यंदा सोसायटीतल्या बागेला छानच बहर आला. पण आताश्या उन्हाळा जाणवू लागला. कडक उन्हात झाडांची पानगळ सुरु झाली. मधूनच एखादी धुळीची वावटळ डोळे घट्ट मिटवायला लावी.

अशाच एका दुपारी साने आराम खुर्चीत बसता बसता जानकी आजीना म्हणाले अग दोन दिवस आपले आनंद महाराज दिसत नाहीत ते? काय तो कुठे गावाला गेला कि काय आणि तेही न सांगता!
जानकी आजी हळव्या आवाजात सांगू लागल्या आहो काही कळत नाही, कोणी म्हणत आनंदची कुठल्याश्या गावी बदली झालीय आणि तो तिकडे गेलाय म्हणे.
त्याच्या ऑफिस मधेही विचारल पण कोणी नीटपणे उत्तर देत नाही. तसे त्याचे कोणी मित्र माहित नसल्याने कोणाला काय विचारणार. आहो काही कळत नाही आता आठवडा झाला.
एवढ्यात आनंदच्या ऑफिस मधले कांबळे आनंदची चौकशी करत येतात आणि दाराला कुलूप पाहून सान्यांच्या कडे विचारण्यासाठी आत येतात. साने त्यांना बसायला सांगून विचारणा करतात तर कांबळे म्हणतात आहो आनंदची बदली झाली हे खर पण आजून त्याने ना प्रमोशानच ना बदलीच पत्र घेतलय आणि आठवड्याची रजा काढून कोठे गेलाय काही कळत नाही. फार गोड सालस मुलगा त्यामुळ न राहून विचारयला आलो पहातो तर घराला कुलूप. खरच सांगायचं तर आज वर्तमान पत्रात अपघाताची बातमी पाहून मी हादरूनच गेलो. कुणाची नाव नसल्याने मनात पाल चुकचुकली आणि म्हटल येथे घरी येवून तरी पहाव. म्हणजे तस काही नसेल पण…

हे संभाषण चालू असताना अस्वस्थ होत साने तर कोसळलेच. आजी ओरडल्या कांबळ्यानी त्यांना सावरत पाणी तोंडावर शिंपडल जरा साने उठून नीट बसतात तो पर्यंत शेजारची मंडळीही आली. बरेच सोपस्कार झाले आणि वातावरण थोड स्थिरावलं.
आज आणखी दोन दिवस झालेत. सोसायटीतली काही मंडळी सान्यांच्या कडे येवून बसलीत. आणि हळव्या आवाजात साने म्हणाले आहो हि मुल प्रेम देतात आणि आपण प्रेमाची भुकेली मंडळी त्यांच्यावर जीव ओवाळून ठेवतो. खर तर आता त्यांना कळायला हव आम्हाला फक्त मानसिक आधार हवा असतो, तुमच्या जीवनात आम्हाला स्थान आहे एवढ्या एका जाणीवेवर आम्ही जीवन कंठीत आसतो. मुलांनी प्रगती करावी, जगात कुठेही फिराव, काही दिवसांसाठी नव्हे काही वर्षासाठी बाहेर रहाव, हरकत नाही पण आमची अशी अवस्था होणार नाही याची काळजी घ्या. अस अगदी तोडू नका रे! तुमच्या प्रगतीत आम्ही स्वतः ला पहात जगत असतो हे विसरू नका.अरे मुलानो साऱ्या सुख सुविधा मिळतील पण माया, आपुलकी, भावनिक ओलावा फक्त आपल्या आणि आपल्याच माणसात असतो.

सूर्य मंडळातील नवग्रहच पहा. सूर्या पासून अलग झालेत पण आसमंतात फिरताना सुध्दा जबरदस्त गुरुत्वाकर्षणाने एकमेकांना घट्ट बाधून ठेवूनच वावरतात, आणि म्हणून अवाढव्य आसमंतात न भरकटता हजारो वर्ष आपला परीघ आणि पर्यायान आपल अस्तिव टिकवून आहेत. असच कुटुंबाच नाही का. कस रे मुलानो तुम्हाला लक्षात येत नाही. खरच कठीण आहे.
असेच काही उदासवाणे दिवस काळवंडत नि प्रदीर्घ होत सरले आणि आजचा रविवार उगवला तोच मुळात हवेत थोडा गारवा घेवून. साने मफलर गुंडाळूनच फिरायला निघाले. सोसायटीच्या गेटच्या बाहेर एका बुके बनविणाऱ्याने नवीनच दुकान थाटल दिसल. गुलाब आणि जजबेरीच्या फुलातून काही सुंदरसे बुके तयार करून त्यावर त्याने चमकी फवारल्याने ती जरा अधिकच प्रफुल्लीत दिसू लागली. तसेच आज “संदेश स्न्याक्स सेंटर” मधून जरा अधिक खमंग पोहे झाल्याच जाणवत होत. वातावरण अस संमिश्र होत. तरी पण फिरून परतताना कोण्या दुचाकीच्या stand ची ठेच पायाला जराशी लागली आणि सान्यांचा पारा चढला. खटाखट बेल वाजवत आणि आपला संताप व्यक्त त्यांची बडबड सुरु झाली. त्यांचा आवाज आज इतका वाढला होता कि शेजारचे जोशी आणि इतर चारपाच मंडळी घरात आली आणि सान्यांची समजूत काढू लागली. जानकी आजीनां माहित होत आज अस काही तरी घडणारच. कारण विनयाचा आज वाढदिवस होता आणि गेले चार पाच वर्ष या दिवशी असच काहीतरी होत असे. त्यातच आनंदच ते तस वागण त्यामुळ ह्यांचा आक्रस्ताळे पणा खूपच वाढला दिसतोय.
आणि अचानक त्या गर्दीतून आवाज आला आहो आजोबा सांभाळा स्वतःला आस रागावून संतापून कस चालेल. शांत व्हा. साने गरकन फिरले आणि अधिक आवाज चढवीत ओरडले या आमची गंमत पाहायला आलात काय शहाणे?

तसे तर सारेच आवाक झाले होते. जानकी आजी तर डोळे विस्फारून पहातच राहिल्या होत्या.
कारणही तसच होत. सोसायटीतील बहुतेकांना ज्याच्या विषयी एक आपले पणा वाटत होता,आणि सान्यांच्या कुटुंबातलाच एक घटक होवून बसलेला, सालस, सोज्वळ, मनमिळावू तसाच रुबाबदार तरुण दाराशी उभा होता. आहो दुसरा तिसरा कोणी नाही प्रत्यक्ष आनंद झपाट्याने आत आला होता.
साने मात्र थांबायला तयार नव्हते. चिडून ओरडलेच. आमची आणि आमच्या मनाची बिलकुल फिकीर नसलेल्या अति शहाण्या कशाला रे साळसूद पणे आलास. दूर हो. आलास तसा आता परत जा बघू.
पण जानकी आजी पुढे येत म्हानाल्या आहो अस एकदम ओरडू नका बर.बसा तिथे खुर्चीवर शांतपणे कसे.
तेव्हड्यात जोशी काका पुढे येवून म्हाणाले आरे आनंदा तुझ्या अचानक जाण्याने साने आजोबांनी तर हायच खाल्ली होती बघ, असा अचानक गायब कसा आणि कुठे झाला होतास बाबा.
आजी आजोबा जरा शांत पणे ऐका. आणि तुम्हाला झालेल्या त्रासा बद्दल मला क्षमा करा. खर तर माझी प्रमोशन वर बदली झालेली तेंव्हा माझ्यापुढे दोनच पर्याय होतेते म्हणजे माझ्यावर मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे साने कुटुंब अथवा प्रमोशन. भांबावल्या अवस्थेत मी काही दिवस मित्राकडे राहिलो खूप विचार केला आणि या निर्णयाप्रत आलो कि ईश्वराने पदरात जे मायेच दान टाकल आहे त्याचाच आदर पूर्वक स्वीकार करायचा व माझा येथे परतण्याचा निश्चयपक्का झाला.
काय प्रमोशनवर पाणी ?, बाबा आनंदा एवढ मात्र सहन होत नाही रे. अरे आता आम्ही मनाची तयारी केलीय बर. तुम्हा पोरांनी आम्हा म्हातार्या, टाकावू आणि निकामी धडांना दिलेल्या डागण्या खूप सोसून झाल्यात. आता बास. तेंव्हा सांगतो परत असा आघात झाला तर या कुडीत प्राण इतके तडफडतील कि सहन नाही करता येणार.

आनंद सान्यांच्या पायाशी बसत म्हणाला आजोबा आणि तुम्हीही सारेजण ऐका. मी मुळचा गुजरातचा. दीड वर्षा पूर्वीच्या भूजच्या भूकंपात माझे आई वडील ,छोटी बहिण आणि अत्यंत प्रेम करणारे आजी आजोबा सर्वजण एका क्षणात नाहीसे झाले, मला एकट्याला सोडून कारण मी नोकरी निमित्त परगावी होतो.
ते सार दुःख इतक प्रचंड होत कि कोणी कल्पना सुद्धा करू शकणार नाही.
त्यातून सावरून येथे आलो आणि मला आपण भेटलात. एवढी माया, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा गेल्या वर्षभरात जो लावलात ते सार काही हे प्रमोशन हिरावून घेणार होत. आता मलाही परत तो भूकंप नको होता. म्हणून मी ते प्रमोशन नाकारून फक्त या ठिकाणी तुमच्या सान्निध्यात आणि सेवेत आजन्म राहाण्यासाठी परतलो.
कोणी विश्वास ठेवा अथवा न ठेवा.
साने भानावर येत म्हणाले आरे बाळानो इतकही प्रेम आमच थकल शरीर सहन नाही करणार. अरे आमच्या सारख्या म्हातार्यांना तुमच्या जीवनात स्थान आहे इतपत जरी तुमच्या वागण्या बोलण्यात आम्हाला जाणवल तरी आम्ही आसपासच्या छोट्या मोठ्या गोष्टीतून आनंद घेवू, त्यान जगण जगल्या सारख वाटेल आणि मरणाची खंत राहणार नाही भीती वाटणार नाही.
जानकी आजी खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवत सांगू लागल्या अहो बघा हो आंब्याला यंदा मोहोर किती छान आलाय आणि पक्ष्यांच्या त्या घरट्यात गोडसा चिवचिवाट पण ऐकू येवू लागलाय. किती छान ना!

त्याच वेळी आनंद आनंदाने म्हणाला आजी आता या वसंताच आपण सारेजण मिळून गोडस स्वागत करू या. बघा मी सर्वांसाठी आईस्क्रीम आणलय त्याचा छानसा आस्वाद घेत सारे मिळून गावू या —

आंनदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, जिकडे तिकडे चोहीकडे.

योगायोग पहा, तेवढ्यात पावसाची या अवेळी सुद्धा हलकीशी सर आली जिने सोसायटीची बाग मोहोरून टाकली, अगदी नववधू सारखी.

साथ हि एकांकिका संगीता व्होरा यांनी लिहलेली असून त्याचे कथेत रूपांतर नंदकुमार मुरडे यांनी केले आहे.

One thought on “साथ

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: