ऋणानुबंध

“आई मी निघाले ग…येते…”आईच्या उत्तराची वाट न पहाता सावी घराबाहेर पडलीसुध्दा.
“अगं डब्बा तरी घेऊन जा..”म्हणत कुसुमताई स्वयंपाकघरातुन बाहेर येईपर्यंत सावी गेटच्या बाहेर पडलेली होती.
“हिचं हे नेहमीचचं आहे… कसं होणार हिचं ही कायमची काळजी लागुन राहिली आहे…”अस स्वत:शीच पुटपुटत त्या घरात आल्या.

सावी, एक नामवंत वकील होती. तिच्याकडे येणारया घटस्फोटाच्या केसेसमधे यशस्वीपणे घटस्फोट मिळतात अशी तिची ख्यातीच होती. तसे तर लहान वयातच तिने नाव कमावले होते.
सावी घाई घाईने आँफिसमधे आली. तिने नव्याने जाँईन झालेल्या शिपायाला आवाज दिला.
“सकाळपासुन कोण कोण आलं होत? आणि आज देशपांडे मँडम अजुन आल्या नाहीत का? काही मेसेज आहे का त्यांचा?” सावी टेबलवरची कागद पहात म्हणाली.
“देशपांडे मँडम उशीरा येणार आहेत. बाकी दोन जणांना दुपारनंतर यायचं आहे, फोन करुन येतो म्हणाले आहेत…हे साहेब बाहेर आले आहेत…”असं म्हणत त्याने एक कार्ड समोर धरलं.
कार्डाकडे बघुन क्षणभर तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. शिपाई तसाच तिच्याकडे पहात उभा आहे हे पाहुन तिला अजुनच राग आला. पण तसे न दाखवता “पाठवा त्यांना आत…”असं म्हणत तिने त्याला जायला सांगितलं. काही क्षणात तो आलाच,”मी आत येऊ शकतो का ?”
“या..”असं म्हणत तिने त्याला हातानेच बसण्याची खुण केली.

“मी पराग पवित्रे… आमच्या एका कार्यक्रमासाठी तुमचा वेळ हवायं…”त्याने तिच्याकडे बघत सरळ मुद्दयाच विचारलं.
हे ऐकुन तिने त्याला विचारलं,” नेमकं कार्यक्रमाचं स्वरुप काय असेल मला कळेल का?”
त्याने मान हलवली व तो बोलु लागला,”आमची कंपनी महिलांसाठी एक समुपदेशनाचे सेशन ठेवत आहे. महिला सक्षमीकरणाविषयी शिकवताना त्यांचे वैयक्तिक आयुष्य कश्यारितीने जपता येईल….दुसरयाच्या मतांचा आदर करणे, परिस्थितीशी जुळवुन घेणे, अँटजेस्टमेंट करणे हे देखील शिकवणे गरजेचे आहे…नाहीतर आजकाल नातं दिवसेंदिवस दुरावत चाललं आहे…. मी पणा वाढत चालला आहे…प्रत्येक गोष्टीचा शेवट हा घटस्फोटच असतो असे नाही ना…”

त्याचे हे बोलणे ऐकुन ती हलकेसे हसली.
“म्हणजे मी घटस्फोट ह्या विषयातली पारंगत समजले जाते व ते माहिती असुनही तुम्ही मला हा विषय सुचवत आहात, ह्याला मी चेष्टा समजु की खोडसाळपणा?” तिने त्याच्याकडे पहात जरयाश्या रागाने विचारले.
तो शांतपणे बोलु लागला,”तुम्ही कशात पारंगत आहात ह्याविषयी ही चर्चा सुरु नाहिये मँडम…माझी एक मागणी आहे की स्त्रियांना तुम्ही अश्याप्रकारे समजवावं…बसं'”
तिच्या चेहरयावर राग दिसत होता.
“तुम्ही स्वत:ला काय समजता मि.पराग ??”तिने शक्य तितका राग कंट्रोल करत विचारलं.
“मी स्वत:ला काय समजतो ह्याचा प्रश्न नाहिये मँडम…तुम्ही मला कसं समजुन घेताय ह्यावर बरंच काही अवलंबुन आहे…”तो शांतपणे म्हणाला.
“मँडम…माझी घटस्फोटाची केस सुरु आहे.त्यामुळे अश्याप्रकारच्या समुपदेशनाचे किती आवश्यकता आहे हे मला माहीती आहे.”
क्षणभर ती काहीच बोलली नाही.

तोच पुढे बोलत होता,”तुम्ही जरा माझं मत समजुन घ्याल का? खरंतर माझे मत पक्के होते की जर आपले कोणाशी पटत नसेल तर आपण त्याच्यापासुन दुर जावे. जरासा त्रास होईल पण जमेल…” एवढं बोलुन त्याने काही क्षणाचा पाँझ घेतला. तिने त्याच्याकडे पाहिले तसे तो पुढे बोलु लागला,
“माझा आणि माझ्या बायकोचा प्रेमविवाह. काँलेजमधे असल्यापासुनच आमचे एकमेकांवर प्रेम जडले. आम्ही लग्नापुर्वी पण भांडत नव्हतो असे नाही कारण आधीपासुन दोघांचाही स्वभाव तसाच होता, तो थोडीच लग्नानंतर असा अचानक बदलणार आहे? म्हणजे तथ्य असे आहे की आमचे आधीही मतभेद झाले की आम्ही भांडायचो. पण लग्नानंतर हळुहळु हे चित्र बदलु लागलं. अपेक्षा डोकावु लागल्या व नकळतच नात्यात दुरावा येऊ लागला. मतभेद परवडतात पण मनभेद नको. मतभेद व मनभेद ह्याच्यातली सीमारेषा कळली नाही व आम्ही विभक्त व्हायचे ठरवले. रोजचा ताणच नको. स्वतंत्रपणे आपण आपल्या मनाप्रमाणे राहुयात म्हणत आम्ही एकमेकांना मोठेपणाने मोकळीक दिली. गेले तीन महिने आम्ही एकमेकांशी भेटलो नाहिये,बोललो नाहिये…”

एवढं बोलुन तो एकदम गप्प झाला. ती त्यांच्या चेहरयावर दिसणारी चलबिचल टिपत होती. त्याने अस्वस्थपणे केसातुन हात फिरवला व तो तिच्याकडे बघुन म्हणाला,”साँरी…जरा भावनिक झालो…तुम्ही वकील आहात.. घटस्फोट घेणे हा एक कागदोपत्री व्यवहार आहे मला माहिती आहे. पण लग्नाची गाठ देवा ब्राम्हणादेखत का बांधतो त्याचे कारण मला ह्या तीन महिन्यात कळले आहे. ह्या नात्याची पवित्रता कळली आहे.”
तिने त्याच्याकडे पाहिले. तो खुपच अस्वस्थ होता. त्याच्याकडे पाहुन तिला भरुन आलं पण तसं न दाखवता तिने पाण्याचा ग्लास समोर दिला. त्याने थँक्स म्हणत ग्लास हातात घेतला व तो गटागटा पाणी प्याला.
“तुमचे वैयक्तिक जीवन व कार्यक्रम हे एकत्र करु नका…तुमच्या कार्यक्रमाला मी येऊ शकत नाही…”तिने शांतपणे सांगितले.
“वैयक्तिक असे जीवन अाता राहिले नाहिये मँडम…कोर्ट कचेरी सगळीकडे पार सांगुन झालंय…पण काही फायदा नाहिये…सहा महिन्याच्या काळात तुम्ही दुर राहु शकलात तर तुम्हाला घटस्फोट मिळेल म्हणाले आहेत. पण हा काळ दोघांसाठीही फारच वेगळा गेला आहे. त्यात दोघांनाही जाणिव होणे गरजेचे आहे की नाही? सांगा ना तुम्हाला काय वाटते ते…”तो म्हणाला.
ती क्षणभर विचारात पडली. तो तिच्याकडे टक लावुन पहात होता. ती अस्वस्थ झाली.
“मी एकदा सांगितलं ना…मी नाही येऊ शकणार तुमच्या कार्यक्रमाला…ही काय जबरदस्ती आहे का?” असे म्हणत त्याची नजर चुकवण्यासाठी ती पटकन खुर्चीवरुन उठली व बाजुच्या खिडकीतुन काही तरी पहात आपण त्याला ऐकत आहोत अशी पाठमोरी उभी राहिली. तसा तो उठला व त्याने पुढे होऊन ती काय म्हणेल ह्याची पर्वा न करता तिला गच्च मिठी मारली व तो म्हणाला,”जबरदस्ती करायची असती तर तीन महिने दुर राहिलो नसतो…”
तिचे अश्रु त्याच्या हातावर बरसले हे पाहुन त्याने तिला स्वत:कडे वळवतं पुन्हा विचारले,”पुर्वा…खरंच जगु शकशील का ग तु माझ्याविना? मी मान्य करतो की माझे पण चुकले आहे. पण आपण एकमेकांना समजुन घेऊन आयुष्य जगता येणार नाही का? वेगळा राहुन मी तर सैरभर झालोय…दुर गेलो की प्रश्न सुटतात हा माझा समज मलाच आज चुकीचा वाटतोय..तुला नाही वाटत आहे का? बोल ना ग…तीन महिन्यांनी भेटतोय तुला…”
त्याचे बोलणे ऐकुन ती घळाघळा रडु लागली. काहीही न बोलता ती त्याच्या मिठीत शिरली व ती आश्वासक मिठी बरच काही बोलुन गेली. त्याचेही डबडबते डोळे वाहु लागले.
“चल, सोड…आँफिस आहे हे…देशपांडे मँडम कधीही येतील …”असे म्हणत ती हळुच त्याच्या बाहुंच्या विळख्यातुन दुर होणार तेवढ्यात आपल्या हातांची पकड घट्ट करत तो हसत म्हणाला,”अगं देशपांडे मँडमनी पण मि.देशपांडेंना कधी तरी अशी भावुक मिठी मारलीच असणार आहे…समजुन घेतील त्या…असे क्षण आल्याशिवाय संसार सुखी होतच नसतो…” त्याचे हे बोलणे ऐकुन लाजत तिने त्याच्या कुशीत तोंड लपवले….

शुभं भवतु…

© प्राजक्ता रुद्रवार

One thought on “ऋणानुबंध

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: