बोन्साय

एका छानश्या रविवारी माझे अतिशय जवळचे मित्र श्री इंगळे यांच्या घरी सहकुटुंब भोजनाचे निमंत्रण असल्याने जाण्याचा योग आला. खूप दिवसांनी जात असल्याने वैभवला (त्यांचे ५ वर्षीय चिरंजीव) त्याचा आवडता खावू म्हणून काजू बर्फी घेतली. माझ्या पत्नीनेही काहीतरी घेतल्याच मी पाहिलं. “काय हो काय घेतलय” विचारताच गालात मिस्कीलपणे हसत तिने मला गाभोळलेल्या चिंचांचे कडे दाखवले आणि म्हणाली “काय, कळल का?”

मी ही मनापासून हसलो. खरच एखादी स्त्री जेंव्हा अश्या चिंचा मागते तेंव्हा त्या चिंचा अधिक तजेलदार दिसतात अस आपल मला तरी वाटत बुवा.

आज आम्ही छान मूड मध्ये होतो. रमत गमत जात असताना पत्नीने हळूच मॉल मध्ये जाण्याचा प्रस्ताव मांडून अमलातही आणून घेतला. या मॉलच्या दारात रस्त्याच्या कडेलाच दोन तीन खूप जुनी अशी वड आणि चिंचेची झाडे होती. खर तर ती खूप वर्षापासून आपला नैसर्गिक तजेलदार मॉल पशु पक्षी आणि पान्थस्थांसाठी उघडून विनामूल्य सेवा देत होती. पण आता त्यांच्या मोठ्या मोठ्या अनेक फांद्या निर्दयपणे छाटून मानवी मानवी मॉल व्यवस्थित दिसेल याची काळजी घेतली गेली होती. आणि वर कढी म्हणजे त्यातल्याच काही छोट्या फांद्या मॉलमध्ये कुंड्यातून लावून आतील भाग अधिक नैसर्गिक वाटेल अशी योजना करण्यात आली होती. पण मला मात्र वाटत होत कि बाहेरून ते वृध्द वृक्ष आपल्याच विलग झालेल्या अंग-फांद्यांकडे विवशतेने अश्रू ढाळत पहात असावेत.

आम्ही मॉलमध्ये फिरत असताना चित्रविचित्र पोशाख केलेले विदुषक वेगवेगळे पोशाख करून आणि रंगविलेले मुखवटे घालून फिरत होते. आमच्या मुलाचं आकर्षण ठरला एक डूगुडूगु करत चालणारा, माकड चेष्टा करणारा, बुटकासा असा तो विदुषक. खरेदी चालू होती, मी एका बाकावर बसलो होतो, तर तो विदुषक माझ्या जवळ आला आणि शेजारी बाकावर बसला. मुखवट्या आडून पहाताना तो बराच थकलेला दिसला. मी आपलं सहजच त्याला नांव विचारल तर तो म्हणाला साब मेरा नाम बहादूर दारासिंग विदुषक है. मला आश्चर्य वाटलं म्हटलं आरे काय विदुषक तेरा आडनाव है (सरनेम हो!) ? तो म्हणाला हां साब हमारी तीन पिढीयोमे कोई लंबे कदका पैदा नही हुवा तो मजबुरन मेरे दादा परदादा साभिको विदुषक ही बनना पडा तो सरनेम भी विदुषक पडा.ऐकून वाईट वाटलं. खरच इतरांप्रमाणे वाढ होत नसल्याने आणि तरीही जे लाभलंय ते पोसावच लागत असल्याने शोभेची वस्तू होवून वावराव लागत यांना. असो.

बाहेर पडत असताना पाहिलं तर मॉलच्या कुंपणाची जी झाड होती त्यांची काट छाट चालू होती. यातून परत तेच. यांना वाढू दिल जात नव्हत त्यामुळ ती फुल फळ निर्मितीचा आनंद घेवू शकत नव्ह्ती , हो पण शोभेची वस्तू म्हणून छान दिसत होती.

चला भरभर, ऊशीर होतोय, भावोजी वाट बघत असतील! अस म्हणत सौ ने विचार श्रीन्खला तोडली आणि आमचा प्रवास झपाट्याने सुरु झाला. विचार पुन्हा वर डोक काढू लागले आणि एक गोष्ट आठवली.

माझ्या एका मित्राने सांगितल होत त्यांच्या गावात एक अतिशय पुरातन मारूतीच देवूळ आहे. तेथील हनुमानाची मूर्ती खूपच भव्य आणि उंच आहे. पुढे तो म्हणाला खर तर हा मारुती अजून मोठा दिसला असता. काय गमतीशीर हकीगत अथवा दंत कथा आहे सांगू? हो म्हणताच त्याने सांगितले- त्याच अस झाल, हा मारुती एका दैवी सिद्धी प्राप्त झालेल्या मूर्तीकाराने आपल्या दैवी साक्षारातून मिळालेल्या प्रेरणेने मूर्ती रुपात तयार केला. परंतु ह्या मूर्तीची स्थापन झाल्या पासून तो हनुमान तिळा तिळाने वाढत होता. पुढे तो इतका मोठा झाला कि पुजाऱ्याला पूजा करणे अवघड झाले, लोकांना त्याच्या मुख दर्शनासाठी मान वाकडी करावी लागू लागली आणि मुख्य म्हणजे तेथील राजा जेंव्हा दर्शनाला येई तेंव्हा त्याला मारुतीला हार घालावयाचा असे व दिवसेंदिवस ते कठीण होवू लागले. राजाने आपल्या प्रधान्जीना विचारले, प्रधानाजीनी मूर्तीकाराला विचारले आणि त्याने सांगितले त्याप्रमाणे या मारुतीच्या डोक्यावर खिळा ठोकण्यात आला आणि वाढ तेंव्हा पासून थांबली.

हु, मी म्हटल आपण कोणाला मोठ होवू देत नाही हेच खर अगदी तो देव का असेना?

आता इंगळे यांच्या घरी पोहोचलो. घर छानच आहे. नवीन इंटेरियर केलेलं दिसत होत. अर्थात बरेच दिवसांनी गेल्याने आमच स्वागत तर छान झालच पण कस घर डेकोरेटीव्ह ते दाखवल गेले आणि परत हॉलमध्ये येवून सोफ्यावर बसलो त्याचवेळी समोरची अति शोभिवंत वस्तू पाहून मन उदास झाल. दोन मोठ्या कुंड्या होत्या, त्यात एक चिंचेच आणि एक वडाच झाड होत. दोन्ही झाडे दिसायला थोराड दिसत होती. चिंचेला चिंचा तर वडाला पारंब्या आलेल्या होत्या.

मी ते पहात असताना हृदयाला खूप पिळ बसतोय अस वाटत होत, मनाला एक प्रकारची विषण्णता जाणवत होती, आणि आमचे मित्र त्याचवेळी सांगत होते – बरका अगदी सोप आहे बोन्साय करण, फक्त वेळोवेळी वरच्या फांद्या आणि खालची मुळकापत रहायची, कि जमतय छान बोन्साय. मी फक्त हु हु करत ऐकत होतो. प्रतिक्रिया देण शक्यच नव्हत.

आत वाहिनी पत्नीशी बोलताना मी ऐकत होतो. चिंचा हातात पडताच त्याचा आस्वाद घेत परंतु थोड्याश्या खिन्न मनाने वाहिनी सांगत होत्या, अग, मला खर तर हा चान्स नको होता. कारण इच्छा होती “रूढी आणि त्यांचे स्त्री मनावरील आघात” यावर एक संशोधानापर प्रबंध लिहावा. पण कसच काय यांचा हट्ट, म्हणे दोन तरी मुल हवीतच घर छान दिसत, पहिल्या मुलाला सोबती मिळतो, वगैरे वगैरे. यांच्या पुढे आणि सासुबायींच्या पुढे काहीच चालेना म्हणून मग शेवटी या बोन्सायने (म्हणजे मी ) दुसर्या पारंबीला हो म्हटल काय करणार?.

अग खर सांगते, आमच सगळ घर, घरातली आम्ही माणसे यांच्या साठी सुंदर दिसणारे बोन्साय आहोत बघ.

खरच दिसण, असण, वाढण, वाढू देण हे नैसर्गिकपणे होण आपण मान्य करणारच नाही का?.

नंदकुमार मुरडे,

One thought on “बोन्साय

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: