बसस्टँड…!

”आलं मनाला केलं क्षणाला नाहीतर बसलं उन्हाला”..असंच घडतं नेहमी माझ्या बाबतीत सुटीचा दिवस होता म्हणून रात्री चंद्र ताऱ्यांना गवसणी घालण्यात जरा जास्तच वेळ लागला असावा..म्हणून झोपेतून उशिरा उठलो, मित्रमंडळी बाहेर गेली होती. जग एवढं व्यस्त झालंय की आपण एवढे त्रस्त का ? हा एक प्रश्नच आहे.. थोडं पुस्तक वाचलं पण मन काय घरात रमेना..म्हणून वाट दिसेन त्या वाटेने भटकंती करायचं ठरवलं. रस्त्यावर भटकंती करताना एक जाणवलं की “रस्ता” कधी कोणासाठी थांबत नाही, तो अविरतपणे त्याचं काम करतोय.. आपण मात्र त्याचा आपल्या “सोयीप्रमाणे” वापर करतो. दुपारचे बारा वाजले होते, आणि माझी भटकंती अहमदनगर (माळीवाडा) बसस्टँडवर पोटाची रकरक थांबवण्यासाठी येऊन स्थिरावली होती. स्वारी पुरी भाजीवर फस्त झाली आणि पुन्हा बसस्टँड मधील गर्दीत सामावून गेली..माणसांची गर्दी अन् त्यांचा गोंगाट मी लक्ष्य देऊन ऐकत होतो. प्रवाशांची हालचाल व त्यांची घाई खरंच एक वेगळं जग असल्याची भावना मनात निर्माण करीत होती. ”कोण येणारा होता तर कोण जाणारा..” पण या ‘महाकुंडाची’ एवढी गर्दी की बसमध्ये चढण्यासाठी प्रत्येकजण जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. या प्रवाशांना बघताना मला एक वेगळाच अनुभव आला…बसस्टँडच्या बाजुला एक रिक्षा स्टँड आहे, रिक्षावाले सारखे ओरडतात दिसायचे.. येययय पाईपलाईन…दिल्ली गेट…एम आय डी सी…त्यांचा सुर कानात सांगत होता की ‘माणसांना त्यांची जागा दाखवून देयची’ असेल तर ओरडावं लागतं..अधून-मधून लहान मुलांचा रडण्याचा आवाज तर कधी “तळीराम” आपले सूर अवळताना दिसत होता. एक येडा येऊन सारख्या येरझाऱ्या मारत होता. आणि मनाशीच बोलत होता. त्याला पाहून मला त्याचा थोडा हेवाच वाटला..आजकाल माणसाला माणसाशी बोलायलाच वेळ नाही आणि हा बाबा स्वतःशीच अगदी जग जिंकल्याच्या अविर्भावात बोलत होता..कदाचित आपणही आपल्यातील “वाद” संपवून “संवाद” करू अशी आशा वाटली. तेवढयात माझी नजर एका नवीन जोडप्याकडे गेली. नवीन यावरून की त्यांचं वय आणि संवाद..आणि मला त्यांच्याकडे लक्ष्य देण्यास भाग पडलं..ते जोडपं पुण्याला जायच्या तयारीत दिसत होतं. तो तिला पुण्याला चल म्हणून पिंगा घालत होता, तर ती मात्र येण्यास नकार देत होती. आपण पाथर्डीतच राहुयात असं तिचं म्हणणं होतं…आणि मला हवी असणारी गोष्ट मला मिळाली होती, त्यामुळे मी त्यांना जरा जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की त्यांचा “प्रेमविवाह” झालेला असावा. ती त्याला समीर म्हणायची आणि तो तिला तेजु.. पुन्हा मला असं वाटायला लागलं की त्यांच्यात कायतरी गैरसमज निर्माण झालेले आहेत, म्हणून ते भांडत आहेत..तो तिला पोटतिडकीने सांगत होता की, पाथर्डीत आपलं जगणं मुश्कील होऊन जाईल. आणि पुण्यात आपण अगदी आपल्या मनाप्रमाणे आनंदाने जगू..पण तिला त्याच्यावर संशय आला होता, की त्याच्या कामातील एका मुलीशी त्याचं लफडं आहे म्हणून. त्यामुळेच ती आता पुण्याला येण्यास स्पष्ट नकार देत होती. पाथर्डीत आईवडीलांकडे राहायचं तिने पक्क केलं होतं. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता की त्याचं फक्त तिच्यावर प्रेम आहे, आणि कोणत्याच मुलीशी काहीही संबंध नाही म्हणून..तिच्यासकट अनेकांच्या शपथा घेतल्या. पण ती मानायला तयार नव्हती..आता मला एवढं कळालं होतं की दोघेही एकाच गावातील आहेत आणि कॉलेजमध्ये त्यांचं ‘प्रेमजीवन’ बहरून आलंय..तो तिला हसवण्याचा..मिठीत घेण्याचा प्रयत्न करीत होता..पण ती त्याला कसलाच प्रतिसाद देत नव्हती. उलट ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. आजूबाजूची माणसं त्यांना बघून निघून जात होती..त्यावेळेला ते दोघेही अगदी शांत बसत होती..पण नंतर लगेच भांडायला सुरवात करीत होती. आणि मी मात्र एका कोपऱ्यात उभा राहून नकळतपणे सगळं पाहत होतो.. त्याने तिच्यासाठी सफरचंद आणून दिलं, आणि स्वतः अर्ध खाऊन तिला खायला सांगितलं..तरीही तिने नकार दिला.अचानक ती रडायला लागली, मग त्याने तिला हळूच हाताने स्पर्श केला…यावेळेला मात्र तिने नकार दिला नाही..! ती त्याच्या हातात हात देऊन खांद्यावर स्थिरावली होती.. त्यालाही थोडं हायसं वाटलं, मग त्याने तिला प्रेमाने सांगायला सुरुवात केली..की अगं तुझी शपथ माझं कोणत्याच मुलीशी कसलाच संबंध नाही, मी फक्त तुझ्याशी प्रेम केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहीन..आणि म्हणून तर आपण लग्न केलं ना..? आपण आता पुण्याला जाऊत, वाटल्यास मी ती रूम आणि ती कंपनी देखील चेंज करतो..मग तर झालं ना राणी…पण आता रडणं बंद कर प्लिज..हास ना थोडं..माणसं बघत्यात आपल्याला..तुला आवडतं का असं माणसांनी बघितलेलं अं..आता तो तिचा हात हातात धरून घट्ट पकडत होता..तीही नकळतपणे साथ देत होती..आणि सांगत होती की..मला सोडून तू दुसऱ्या मुलीशी बोललेलं मला नाही आवडत..मी खूप त्रास सहन केलाय रे तुझ्याशी लग्न करण्यासाठी..मी पुण्याला येईन पण यापुढे त्या मुलीचा फोन किंवा मेसेज आला नाही पाहिजे..आणि काम झालं की लगेच घरी यायचं..असं बोलताना ती खूप सुखावली होती…आणि तो तिचं सगळं मान्य आहे असं म्हणत होता,आणि तिच्या हाताशी..खांद्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होता. आता तीही त्याला साथ देत होती…त्यांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगत होते..एक अनामिक ओझं कमी झाल्यासारखं वाटतं होतं त्यांना पाहून.. दोघेही आता पुण्याला जाणारी बस शोधण्यासाठी निघून गेले..अन् मी मात्र त्यांना पाहतच राहिलो…असं कधी वाटलंच नव्हतं की, बसस्टँडवर मला असा प्रसंग पाहायला मिळेल. आणि मी त्यात एवढा तल्लीन होईल..ते तर निघून गेले होते..पण मी मात्र आता वेगळ्याच दुनियेत जाऊन पोहचलो होतो. मन विचार करायला लागलं की प्रेम, लग्न आणि संशय याचा उगम का आणि कुणी केला असेल..? या जोडप्याला आधी पाहिलं तेंव्हा असं वाटलं की ते खूप भांडत आहेत..पण थोडयावेळाने तर ती गळ्यात गळे घालून निघून गेली…मग माझं मन बोलायला लागलं..यालाच “प्रेमविवाह” म्हणतात..!! खूप भांडण करूनही खूप प्रेम करण्याची एक वेगळीच ताकद असते यामध्ये..आयुष्यात प्रेम न होणं ‘बॅड लक..’ प्रेम होणं ‘गुड लक..’ आणि झालेलं प्रेम हेच मृत्यूनंतरही टिकणं “गॉड लक..” वेळ बराच झाला होता.. मी आता परतीच्या मार्गाने निघालो होतो..परंतु मनात पुन्हा-पुन्हा तोच प्रसंग येत होता. आजचा बसस्टँड वरील हा प्रसंग कदाचित मला माझ्या उद्याची चाहूल देत होता की काय..? काहीही असो…पण मला मात्र एका वेगळ्या जगात घेऊन जाण्यास सार्थ ठरला हे नक्की..!!

- रहेमान पठाण, अहमदनगर

One thought on “बसस्टँड…!

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: