पुनर्जन्म

स्टेशनवर गर्दी तशी तुरळकच होती आज. सुट्टीचा दिवस असल्याने चाकरमान्यांची लगबगही थंडच होती. दुपारची २. ३५ वाजताची गाडी सुपर स्टेशनमधे येण्याची वेळ झालीच होती.
अमीत ने फलाटावरून ट्रॅकवर उडी मारली आणि तो ट्रेन येण्याच्या दिशेला धावू लागला.
धाड ऽ धाड ऽ धाड आवाज जवळ येवू लागला, तशी अमीतच्या ह्रदयाची धडधडही वाढली. आता काही क्षणांचाच अवधी बाकी होता. ट्रेन अगदी जवळ आली; अमीत तिच्या पुढ्यात उडी मारणार एवढ्यात तितक्याच वेगाने मागे मागे ओढला गेला.
आपल्याला कोणी ओढलं हे त्यानं क्षणमात्र मागे वळून पाहिलं आणि तो संतापला. एका मध्यमवयीन भिका-याने त्याला मागे ओढलं होतं; पर्यायाने त्याला जीव देण्यापासून रोखलं होतं..” का मला मागे ओढलं? मला मागे ओढणारे तुम्ही कोण ? माझा जीव आहे मी त्याचं काहिही करेन.मला अडवण्याचे कारणच काय ? …”अमीतच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्या माणसाने एका मंद स्मितात दिली. “असं समज की तू त्या रेल्वेखाली येवून मेलास.आता माझ्यासमोर जो कोणी उभा आहे तो पुर्णपणे तुला अनोळखी आहे.मी तुझा जीव वाचवला जो तू संपवायला चालला होतास.म्हणून इथूनपुढे असे समज की तू तुझ्या इच्छेप्रमाणे जीव दिलास आणि मी वाचवला म्हणून तुझे आयुष्य आता माझे आहे.तुझ्या आयुष्यावर माझा अधिकार असणार आहे.मी जे सांगेन ते तुला करावेच लागेल.”
असे म्हणून अमीतच्या हाताला धरून तो भिकारी त्याला आपल्या झोपडीत घेऊन गेला व एका थाळीत भाकरी घेवून अमीतला म्हणाला. .” चल.. दोन घास खाऊन घे..”
मनावरच्या अती ताणाने अमितच्या डोळ्यांसमोर अंधेरी आली…ब-याच वेळाने अमितने डोळे उघडले..तेव्हा तो आपल्याच खोलीत होता आणि शेजारी बसलेली बायको त्याच्या केसांतून हात फिरवत होती. …..
” एका बाबांनी तुम्हाला घरी आणून सोडलं. तापाने पुर्ण फणफणला होतात..आता विश्रांती घ्या.” बायको म्हणाली.
या घडलेल्या घटनेचा अमित पुन्हा पुन्हा विचार करत होता…का वाचवले गेलो आपण ? खरतरं जगण्याचे सगळे मार्ग आपण बंद करून गेलो होतो.सगळे बंधही तोडले होते…प्रयत्नपुर्वक…स्वतःला संपवायचा इरादा केला होता.तरिही मी का जीवंत आहे अजुनही ?? काय म्हणाला तो माणूस..” मरायचेच असेल तर मनाने मर. मारून टाक हव्यास.., स्वतःबद्दलच्या अवास्तव अपेक्षा..आणि सामोरा जा आयुष्याला..तू असलास तरी जगरहाटी चालूच राहिल आणि नसलास तरी काही फरक पडणार नाही..तेव्हा जर फरकच पडणार नसेल तर जगलास काय आणि मेलास काय..दोन्ही सारखेच..मग कशाला पळतोस दिशाहीन ? जा सामोरा आयुष्याला..त्याच्या डोळ्यांत डोळे घालून बघं आणि सांग मी घाबरत नाही तुला…ये आजमावून बघ मला…मी उभा राहीन तुझ्यासमोर..ते ही ताठ मानेने….”
अमित आता संपुर्ण बदलल्यासारखा वाटत होता.काय झालं होतं काय माहित ? पण तो बदलला होता एव्हढे मात्र नक्की…!! त्याचे अनेक प्राॅब्लेम्स त्याने नव्याने हाताळायला सुरवात केली.काळाच्या ओघात काही अडचणी लगेच दूर झाल्या , काही कालांतराने सुटल्या तर काही तशाच राहिल्या. अमित मात्र पुढे पुढे चालत राहिला.त्याच्या व्यवसायातही तो हळूहळू स्थिरावत होता.यशस्वी होत होता.अनेक नव्या आयामांनी त्याचा व्यवसाय विस्तारत होता.पुर्वीचा नकारात्मक जगणारा अमित कुठेतरी गायब झाला होता.आत्ताचा प्रत्येक गोष्ट धडाडीने करणारा हा अमित कोणी वेगळाच होता..जणू पुनर्जन्मच झाला होता त्याचा.
बराचकाळ लोटला होता…….अमित शहरातील सन्माननीय व्यक्तिंपैकी एक झाला होता.सर्व सुखं पायाशी लोळण घेत होती.अनेक समाजोपयोगी कार्यांत तो सहभागी होत होता.आज त्याने तयार केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून अद्ययावत सोयी असलेला मोठा दवाखाना व मुलांसाठी बांधण्यात आलेल्या शाळेचे उद्घाटन होते.कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मैदानावर मोठे व्यासपीठ उभारण्यात आले होते.उद्घाटनानंतर अमितचाही मोठा सन्मान करण्यात येणार होता…अमित मात्र आज गप्प गप्प विचारांत हरवला होता….
अचानक त्याचे लक्ष मैदानाच्या एका कडेला असलेल्या झाडाकडे गेली.तो त्या झाडाखाली उभ्या असलेल्या व्यक्तीकडे एकटक पाहू लागला.कुणाला काही कळायच्या आत तो त्या झाडाच्या दिशेने चालू लागला.झाडाजवळ पोचताक्षणीच त्याने त्या व्यक्तीच्या पायावर डोके ठेवले.त्या व्यक्तीने मंद स्मित करत अमितला उठवले आणि ह्रदयाशी धरले.दोघांचेही डोळे आनंदाश्रूंनी झरत होते.बघणारे सगळेच आश्चर्यचकित झाले होते..” आज मी जो कोणी आहे तो या बाबांमुळेच ..मित्रांनो तेव्हा जर त्यांनी मला अडवले नसते तर आज मी इथे नसतो..” असे म्हणून अमितने वीस वर्षापुर्वी घडलेली ती घटना सर्वांना सांगीतली. सर्वांचेच डोळे पाणावले होते.अमितने बाबांना व्यासपीठावर नेले. त्यांच्याहस्ते दवाखाना आणि शाळेचे उद्घाटन होईल असे जाहिर केले. आता बाबा मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले…..
” अमितने जी काही आजवर प्रगती केली ते त्याच्या बुद्धीमत्ता आणि कष्टाचे फळ आहे. मी फक्त निखा-यावर फुंकर घालण्याचे काम केले.एका क्षणाचाच अवधी होता.त्यावेळी जर मी त्याला मागे खेचू शकलो नसतो तर …परिस्थितीने गांजलेला अमित नाहिसा झाला असता कदाचित्…मी जे केलं ते नकळत केलेली कृती होती…आमित तेव्हाही संपला.पण संपलेला अमित हा अडचणींनी त्रासलेला..आयुष्याची लढाई हरलेला … नकारात्मक जगणारा होता.आज जो अमित दिसतोय ..यशस्वी , सकारात्मक , आयुष्याच्या हातात हात घालून चालणारा..तो त्याचा नवा जन्मच तर आहे.मी तेव्हा त्याला बोललो होतो ” असं समज की ; पूर्वीचा तू मेलास आणि आताच्या तुझ्या या नवीन जन्मावर माझा अधिकार आहे..कारण मी तुला वाचवलयं तेव्हा मी सांगेन ते तू करायचसं.पण..अमितने माझे ऐकले.आणि आज हा नवा जन्म तो खूप चांगल्या पद्धतीने जगतोय.त्याच्या या प्रवासाला मदत करणारे मी एक माध्यम ठरलो याचा मला आनंद आहे. माझा आशिर्वाद सदैव त्याच्या पाठी राहिल.एवढे बोलून बाबा थांबले आणि क्षणार्धात गर्दित दिसेनासे झाले.बाबांच्या बोलण्याने वातावरणात एक गहिवर पसरला होता.आणि अमित……मिळालेल्या पुनर्जनामाचे आणि तो देणा-या बाबांचे मनोमन आभार मानत होता……..!!

© मानसी चिटणीस

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Create your website with WordPress.com
सुरु करूया
%d bloggers like this: